Saturday, November 27, 2010

मराठी बाणा जपणारा लोकशाहीर

लोकशाहीर विठ्ठल उमप....उर्फ सर्वांचे अण्णा....महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा ठेवा जपणारा ऐंशी वर्षाचा एक उमदा...कलावंत...आपल्या जेष्ठत्वावर मात करत तरूणांना लाजवेल असंच जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तीमत्व...शाहीरीला जागतिकस्तरावर वेगळं स्थान, नावलौकीक मिळवून देणारे लोकशाहीर आपल्यातून इतक्या सहजपणे जातील, याची कुणालाही कल्पना नव्हती....
नाशिकला कालीदास कलामंदीरात झालेल्या एका कार्यक्रमांसाठी उमप आले होते...त्याचे जांभुळ आख्यान नाटक आणि मी मराठी हे अलिकडच्या काळातील कलाविष्कार मी पाहिले होते. त्यामुळं त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती...पण त्यांच्याभोवती असलेल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळं ते सहज शक्य होत नव्हतं...अखेर पत्रकार असल्यानं आपल्या पत्रकारितेचा त्यांच्या भेटीसाठी वापर करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांच्याच जवळच्या एका कार्यकर्त्यांला जवळ घेऊन शाहीरांशी गप्पा मारण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे हवी, असं सांगितलं. त्या कार्यकर्त्यांनंही लगेच शाहीरांच्या कानात निरोप सांगितला आणि काय आश्चर्य काही वेळानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर पडून ते बॅक स्टँजला असलेल्या कक्षात आले आणि मग काय सुरु झाली गप्पाची मैफल...कौटुंबिक परिवार, शालेय शिक्षण, शाहीरीची सुरवातीपासून तर जांभुळ आख्यान आणि अगदी अलिकडच्या मी मराठी कलाविष्कारापर्यत गप्पाची मैफल रंगत गेली...मध्येच मी गाण्यांची फर्माईश करत आणि शाहीरानीही मोठ्या अदबीनं फु बाई फु, माझी मैना गावाकडं राहिली,फाटकी नोट, ए दादा आवर ये...अशी गाण गात मला सुखद अनुभव दिला...आंबेडकरी चळवळीतील आठवणी सांगतांना त्यांनी हा माझ्या भीमरायाचा मळा...हे गाजलेले गीत ऐकवत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा महिमाच माझ्यासमोर कथन केला....एवढ्या वयांतही त्यांच्या आवाजातला एक वेगळा बाज मला अनुभवायला मिळत होता...केवळ विचारलेल्या प्रश्नांनाच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक माहीती मला त्यांच्या बोलण्यातून जाणवली...त्यांचे काही काही प्रसंग तर थक्क करून सोडणारं होते....पोवाडा, कव्वाली भारूड, गझल अभंग की छक्कड लावणी असो असे सारंच प्रकार प्रभावीपणे सादर करण्याचां त्यांचा वेगळा हातखंड मला पहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाला...गप्पाची मैफल सुरु असतांनाच मध्येच आपल्या स्वयंसेवकांकडून कार्यक्रमांच्या तयारीचा आढावाही ते घेत होते....मी त्यांच्याकडं फक्त दहा मिनिटांची वेळ मागितली होती मात्र शाहीरांनी माझ्याशी तब्बल पंचवीस मिनिटे गप्पा मारल्या...गप्पानंतर ते लगेचच आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी रंगमंचाकडे गेले...मात्र जाण्यापूर्वी त्यांनी माझं नाव पुन्हा एकदा विचारलं...मी नाव सांगितलं श्रीकृष्ण कुलकर्णी...श्रीकृष्ण म्हणजे किसना, कृष्णा होय...बरं बघ तुझ्यावरही मी एक गाणं रचलय..मी लगेचच म्हटंल कुठले ते...आणि त्यांनी लगेचच कृष्णा धमाल रे...हे प्रसिध्द गाणं म्हणतं गात रंगमंचाकडं जाण्यास सुरवात केली...मी फक्त त्यांच्या या अनोख्या व्यक्तीमत्वाकडं पाहतंच राहिलो....

Monday, September 13, 2010

भाजप नेते म्हणतात योगायोग...

अलाहाबाद उच्च न्यायालयानं अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या निकालासंदर्भात २४ सप्टेंबर ही तारीख निश्चित केलीय. म्हणजे अयोध्यप्रश्नी पक्षनेते लालकृष्ण अडवानी यांनी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेचा विसावा वर्धापनदिन २३ तारखेला एक दिवस अगोदर आहे. असं असलंतरी भाजप या निकालाबाबत आशावादी आहे.अयोध्याप्रश्नी भाजपमध्ये सध्या शांतता आहे. हा निकाल न्यायालयात असल्यानं भाजप नेते कुणीही या वक्तव्यावर मत व्यक्त करण्यात तायर नाही. निकालाबाबत पक्षानं वेट अँन्ड वॉचची भूमिका स्विकारलीय.
हे खरं असलं तरी अडवानी यांनी आपल्या ताज्या ब्लॉगवरील लेखात अयोध्यानिकाल आणि आपल्या रथयात्रेला वीस वर्ष पूर्ण याविषयी विवेचन केलय. या दोन्ही घटना एक दिवसाआड पाठोपाठ येत आहे. अडवानींनी म्हणतात,माझे रोल मॉडेल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मतारीख 25 सप्टेंबर आहे. सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्राही 1990 मध्ये त्याच दिवशी काढली. त्याच दिवशी मी अजूनही नियमितपणं सोरटी सोमनाथाच्या दर्शनासाठी जातो. आता तर अयोध्या प्रकरणाचा निकाल 25 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला जाहीर होणारांय. हा सर्व योगायोग असल्याचे मी मानतो असं नमूद केलय. अयोध्या प्रकरणी पक्षनेते काहीही बोलण्यास तयार नाही,असं असलंतरी दर आठवड्याला भाजप मुख्यालयाशेजारी आंग्लभाषिक पत्रकारांचा दरबारच भरलेला दिसतो. त्यामुळं पक्षने त्यांची गोची झालीय. त्यांना पत्रकारांना काहीच माहिती देता येत नाही.
पक्षाध्यक्ष पद स्विकारल्यानंतर नितीन गडकरीनी अयोध्या प्रश्‍न घटनेच्या चौकटीत सुटावा, असं मत मांडलं होतं. भाजपमध्ये सध्या गडकरी गट विरूध्द राजनाथसिंह गट यांच्यात शीतयुद्धाचं वातावरण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निकालानंतर गडकरी यांचे ते मत कायम राहील काय, काय पडसाद उमटतात याबाबतही उत्सुकता आहे. निकाल विरोधात गेल्यास काही वरिष्ठ नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दरवाजा ठोठावण्याचं निश्चित केलंय. अयोध्या प्रकरणाबाबत लिबरहान आयोगाचा अहवाल फेटाळणाऱ्या भाजपची केंद्रात सहा वर्षे सत्ता होती. त्यावेळेस हा अहवाल का आणला गेला नाही, अयोध्या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल त्या काळात का लागला नाही, या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे नाहीत.

Saturday, September 11, 2010

हे वागणं बरं नव्हं...!

कुठल्याही स्पर्धेचा उद्घाटन, पारितोषिक वितरण समारंभ म्हटला की,राजकारण्यांचा सहभाग असतोच,किंबहुना त्यांच्या सहभागाशिवाय असे सोहळे पार पाडणं म्हणजं जरा जिकरीचंच....याला राष्ट्रकुल स्पर्धेची क्विन्स बॅटन तरी कशी अपवाद असू शकते...राज्याच्या दौ-यावर असलेल्या या बॅटनच्या निमित्तानं सध्या राजकारण्यांची चमकूगिरी हा सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय.
खेळ, खेळाडू, संघ आणि पुढारी...हे एक एकमेकांशी संबंधीत घनिष्ट नातचं. त्यामुळंच स्थानिक,राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच खेळांच्या संघटनावर खेळाडू, प्रशिक्षकांपेक्षा पुढारीच पदाधिकारी दिसतात. किंबहुना त्यांच्या आर्शिवाद, मार्गदर्शनाशिवाय संघटनांचं कार्य चालणं तसं अवघडच. आणि मग स्वभाविकच त्यांना स्पर्धा मग ती गल्लीतली असो कि दिल्लीतली प्रत्येक कार्यक्रमांसाठी बोलवणं अपरिहार्यच... कार्यक्रमास न बोलवणं, सत्कारासह योग्य आदरातिथ्य न ठेवल्यास त्यांचे रूसवे-फुगवे आणि संबंधितांवर काट धरत उट्टे काढणं आलेच....
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा बिगुल आता जोरात वाजू लागलंय. बॅटन रिले या स्पर्धेच्या संयोजन आणि उद्घाटन सोहळ्याचा महत्वपूर्ण भाग आहे, त्यामुळेच खेळाडू, प्रशिक्षक आणि संयोजक या बॅटनची सर्वजण काळजी घेतांना दिसताय, हे खरं असलंतरी बॅटन स्वागताच्या निमित्तानं राजकारण्यांची चमकूगिरी दिसून येतेय. खेळाडूंपेक्षा बॅटन हातात घेऊन धावतांना आपलीच छबी वृत्तपत्रात, वाहिन्यांवर कशी झळकेल याची काळजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापौरांसह इतर पुढारी घेतांना दिसतात. त्यासाठी अगदी खेळाडूं, जेष्ठ प्रशिक्षकांनाही मागे हटवून स्वतः पुढे येण्यासाठी चढाओढच पहायला मिळते, अगंदी आपणच स्पर्धेचं मुख्य संयोजक, यजमान आहोत, अशा थाटात हे सर्व पध्दतशीर सुरुय.
बॅटनचा कोल्हापूर, पुण्यामार्ग मुंबईत प्रवास सुरु झाला. या तिन्ही ठिकाणी राजकारण्यांच्या चमकूगिरी पहायला मिळाली. बॅटनचे जल्लोषात स्वागत झाले.सोहळा आटोपला आणि आपले फोटोसेशन कम्पिलट झाल्याची खात्री झाली की, हे सगळे चमकू पुढारी झाले एकदाचे मोकळे.....मग खेळाडू, प्रशिक्षक बॅटन पुढे घेऊन गेलेत की नाही, बॅटनचा प्रवास व्यवस्थित सुरुय की नाही, याचं त्यांना काही देणं घेणं नाही.
स्वतःच्या प्रसिध्दी नव्हे तर आपल्या शहर, जिल्ह्यात ही बॅटन आल्यानं तिचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्यच, असं स्वागताच्या कार्यक्रमातच ठामपणे सांगायलाही हे पुढारी विसरत नाही. प्रत्येकजण स्वागताच्या कार्यक्रमांशी संबंधीत आपलं मत ते ही अगदी सोयीस्करपणे मांडतांना सध्या दिसत आहे. ईद, गणेशोत्सवासारखे उत्सव असल्यानं बॅटनचा मुंबईतला प्रवास कमी केला. अन्यथा मुंबईत प्रत्येक भागातल्या पुढा-यांनं आपल्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाद्वारे बॅटनच स्वागत केलं असतं, एवढ्यावरच न थांबता आपली छबी चमकेल कशी याकडं केंद्रीत केलं असतं. बॅटननं २५ जूनला भारतात प्रवेश केला. आतापर्यत १६ हजार ६५२ किलोमिटरचा प्रवास पूर्ण झालाय. सर्व राज्यात खेळाडू, प्रशिक्षक,संघटनापेक्षा राजकारण्यांची चमकूगिरीच पहायला मिळाली. अनेक ठिकाणी बॅटनबरोबरच राष्ट्रकुलमध्ये झालेल्या गैरव्यवहारांवर टीका झाली. पण त्यांला सोयीस्कर बगल देण्याचाही प्रयत्न संयोजकांच्या माध्यमातून पहायला मिळाला. बॅटन स्वागताच्या निमित्तानं अगदी महाराष्ट्रातसुध्दा हा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांला पध्दतशीरपणे टाळले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रचार प्रसारास सर्वाधिक प्राधान्य संयोजन समितीनं दिलं, बॅटनच्या जोडीला आता कॉमनवेल्थ ट्रेनचाही प्रवास सुरु झालाय़. या प्रवासातही क्रीडाप्रेमींच्या जोडीला पुढा-यांची चमकूगिरी पहायला मिळतेय...पुढा-यांशिवाय क्रीडासंघटना, संस्थाचं पान हलत नाही...हे जरी खरं असलंतरी पुढा-यांनी खेळाडू, प्रशिक्षकांचा असलेल्या बॅटन स्वागताच्या कार्यक्रमात किती चमकूगिरी करावी हा एक प्रश्नच आहे.

Thursday, June 24, 2010

आदर्शवत उपक्रम...पण कायम स्वरूपी हवा


गोदावरीच्या स्वच्छतेतून सामाजिक-अध्यात्मिक क्रांती करण्याचा संकल्प श्री समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकऱ्यांनी सोडलायं. "सकाळ माध्यम समूहा' च्या "गोदावरी वाचवा-प्रदूषण थांबवा' या अभियानात केंद्राने सहभाग घेतला.
तीन दिवस राबवलेल्या स्वच्छता मोहीमेची सांगता `गंगादशहरा` उत्सवानं झाली. गोदावरीपूजनासाठी गोदाकाठी श्री समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकरी एकत्र आले होते. केंद्र प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंनी विधीवत गंगापूजन केलयं. पर्जन्य सुक्ताचं पठण सेवेकऱ्यांनी केल्यानंतर महाआरती झाली.
आरतीनंतर गोदामाईला आर्घ्य देण्यात आलं. यावेळी राजकीय मतभेद विसरून सर्वांनी गोदावरी स्वच्छतेत योगदान देण्याचा शब्द दिला. गुरुमाऊलींनी स्वच्छतेचा उपक्रम दरमहा राबविण्याची सूचना सेवेकऱ्यांना केली. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्‍लांनी पौरोहित्य केलयं. सामुदायिक सहभागातून गोदावरीची स्वच्छता हेच गोदापूजन होयं, असा संदेश देत गंगादशहरा उत्सवानं दिलायं. गंगापूजनावेळी स्वच्छतेच्या कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करण्याची आग्रही भूमिका सेवेकऱ्यांनी मांडलीयं. स्थैर्य, शांतता, समाधानाच्या जोडीलाच नैसर्गिक आपत्तीपासून मुक्त राहाण्याची शक्ती गोदामाईनं द्यावी, अशी प्रार्थना करत या अनोख्या उत्सवाची सांगता झालीयं.

एकच झेंडा घ्या हाती...

शिवसेना कार्यप्रमुख उद्वव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी काही ज्येष्ठ शिवसैनिक तसंच मनसैनिकांनी चळवळ सुरु केलीय. माझी चळवळ मी महाराष्ट्राचा या फोरमखाली ही चळवळ सध्या सुरुय. याच चळवळींतर्गत मुंबईत शिवसैनिक आणि मनसैनिकांचा मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्यात उद्वव आणि राज यांना एकत्र आणण्याचा पुन्हा निर्धार करण्यात आला
राज आणि उद्वव ठाकरे हे दोन्ही भाऊ काही कारणांमुळं एकमेकांपास्न दूरावलं गेले. या भावाच्या विभक्तपणाचा शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना मोठा फटका बसतोय. त्याचप्रमाणं हिंदुमतांचीही विभागणी होऊ लागलीय. हेच लक्षात घेऊन या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी 16मे रोजी ज्येष्ठ शिवसैनिक सतिश वळूंज आणि त्याच्या सहा मित्रांनी माझी चळवळ मी महाराष्ट्राचा या फोरमद्वारे या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
याच चळवळीअतंर्गत वाळूंज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच राज आणि उद्वव यांना एक आवाहनात्मक पत्र पाठवलंय. शिवसेनाप्रमुख आणि त्यांच्यासोबत राज आणि उद्वव असलेलं हे छायाचित्र आम्हाला हवंय. ते साकार व्हायला हवं असं वाळूंज यांची संकल्पना आहे.
यानिमित्तानं मेळाव्यास्थळी उभारण्यात आलेल्या पोष्टरवरही कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करत राज आणि उद्वव यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय.या मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. याचअंतर्गत आगामी काळात एसएमसद्वारे तसंच नव्यान वेबसाईट सुरु करून सर्वसामान्य कार्यकर्ता आणि गावपातळीपर्यत पोहचण्याचं ध्येय निश्चीत करण्यात आलंय.

Sunday, March 7, 2010

मथुरेतली कपडा फाड होली...


होळी हा पारंपारिक सण ठिकठिकाणी आपापल्या पद्धतीनं साजरा होतो. याला अर्थातच श्रीकृष्णाची मथुरानगरीही अपवाद नाही. मथुरेत हा उत्सव तीन-चार दिवस चालतो. धुलीवंदनानंतरचा हा दिवस`कपडा फाड होली` म्हणून परिचित आहे. यात महिला पुरुषाचे चक्क कपडे फाडतात...आपला विश्वास बसत नसेल पण हे सत्य आहे...
आपल्याकडे देश-प्रांतभागानिहाय सण,उत्सव साजरे करण्याची वेगळी परंपरा आहे. होळी,धुलीवंदन,रंगपंचमीसारखे सण म्हणजे नागरीकांच्या उत्साह,आनंदाला उधानच येते. श्रीकृष्णाच्या मथुरेसह इतर प्रांतात होळी,धुलीवंदनापासून सुरु होणारे हा उत्सव ४५ दिवस चालतो.
स्थानिक उत्सव समिती होळीच्या दिवसापासून रंगपंचमीच्या दिवसांपर्यत विशेष नियोजन करते. जास्तीत जास्त नागरीकांना या उत्सवात सहभागी करून घेतले जाते. मथुरावासिय सहकुटुंब या उत्सवात सहभागी होतात. सध्या तिथं हा अनोखा रंगोत्सव पहायला मिळतोय. त्यासाठी स्थानिक समितीनं दहा हजार किलो रंग उपलब्ध करून दिला आहे.
एकमेकांना रंग लावून तसेच या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
होळी,धुलीवंदनानंतरचा दिवस हा कपडा फाड होली म्हणून परिचित आहे. गेल्या काही दिवसांपासून मथुरावासिय हा दिवस कपडा फाडदिन म्हणून साजरा करतायं. महिला पुरुषांना रंग लावण्याबरोबरच त्यांचे चक्क कपडे ओढतात,फाडतात आणि त्यांना नखशिखांत भिजवतात. भगवान श्रीकृष्ण बलरामासोबत हा उत्सव पाहण्याचा आनंद घेतात. या दोघांच्या आनंदासाठीच हा नटखट,छेडछाडीचा उत्सव असतो.अशी येथील नागरीकांची श्रध्दा आहे.
या अनोख्या कपडा फाड होळीची ख्याती जगभर पसरलीय अनेक परदेशी पर्यटकही हा आगळावेगळा होलीत्सव पाहण्यासाठी आवर्जुन हजेरी लावलात. एवढंच नव्हे तर आपल्या कॅमेऱयात ही दृश्य बंदीस्त करतात.

Friday, February 19, 2010

आणि रिक्षाचालक बनला हायटेक

चेन्नईतल्या सॅमसन हा रिक्षाचालक परदेशी पाहुण्यांसाठी जवळचा मित्र बनलाय. त्यानं स्वतःच संकेतस्थळ तयार केलंय. इंटरनेटवरून नोंदणी करण्याबरोबरच मोबाईलवरून संपर्क साधल्यास तो सेवा देतो. याशिवाय पर्यटकांच्या एसएमएसलाही त्याच्याकडून त्वरीत प्रतिसाद मिळतो
१९९७ मध्ये चेन्नई दौऱ्यावर आलेल्या एका ब्रिटीश परदेशी पाहुण्यानं सॅमसनच्या रिक्षात बसून चेन्नई फिरण्याचा आनंद घेतला. याच प्रवासादरम्यान परदेशी पाहुण्यानं सॅमसनला इंग्रजी भाषा शिकण्याचे तसंच ग्राहकाला कस तयार करायचा याबाबतच्या काही टिप्स दिल्या.अर्थात सँमसनही या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत नंतरच्या तीन वर्षात इंग्रजी भाषा अवगत केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं एका जपानी पर्यटकांच्या इंटरनेटवर आपला ई-मेल आयडी तयार केला. त्यांच्या मेलला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानं पुढे२००६ मध्ये ब्रिटीश पर्यटकाच्या माध्यमातून ट्युकटेस्टींक डॉम कॉम नावाचं संकेतस्थळ तयार केले आणि चेन्नईतला हा रिक्षाचालक हायटेक बनला.
सॅमसनच्या संकेतस्थळाला दररोज किमान सोळा ते अठरा हजार लोक भेट देतात, अनेकजण आँनलाईनच आपली नोंदणी सॅमसंगकडे करतात. चेन्नईतल्या विविध स्थळांची माहीती घेतात, एवढेचं नव्हे तर त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून, तसंच एसएमएस पाठवून रिक्षा बोलावून घेतात, चेन्नईत येणारे परदेशी पाहुणे त्यांचे चांगले मित्र बनलेय, तो अशा परदेशा पाहुण्यांना आपल्या रिक्षातून संपूर्ण चेन्नई दर्शन घडवतो, त्यांच्या सेवेवर परदेशी पाहुणेही खुश असतात अत्याधुनिकतेशी नाळ जोडलेल्या सॅमसनची परदेशी पाहुण्यांना रिक्षाची सेवा उपलब्ध करून देतांना दमछाक होते सॅमसंगनं एवढ्यावरच न थांबता विविध भाषा शिकून घेतल्या. अर्थात या भाषांचा त्याचा व्यवसाय वाढीसाठी फायदा होतोय. अतिथी देवो भव...हे तत्व स्विकारून परदेशी पाहुण्यांना सेवा पुरवणाऱ्या सॅमसंगचा आदर्श इतर चालकांनी घ्यायला हवा

Wednesday, January 6, 2010

चिमुरड्यांचे असेही धाडस...

रत्नागिरीतली एक मोठी बहिण आपल्या लहानग्या बहिणीच्या आणि शिक्षणच्या प्रेमाखातरं तिला शिक्षणात मदत करतेय. लहानग्या बहिणीसाठी स्वतः होडी वल्हवुन खाडी पार करून ती तिला शाळेत पोहचवते. पाहूयात हा चिमकुलीच्या धाडसी शिक्षणाचा प्रवास....
कोकण....समुद्र आणि डोंगरदरीत वसलेला प्रदेश...असं हे कोकण दळणवळण आणि प्रवासासाठी अद्यापही दुर्लक्षित राहिलंय. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनाही हालअपेष्टा सहन कराव्या लागतायं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्‍वर तालुक्‍यात बावनदीच्या आसपास काही गाव वसलीयत.यातल्या परचुरी गावात चौथीपर्यत सोय आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोळंबे,संगमेश्‍वर गावात जावे. या गावाकडं जाण्यास दुरचा प्रवास करावा लागतो. पुल नसल्यानं त्यासाठी वेळही खूप जातो,मात्र त्यावर मात करतं या गावचं विद्यार्थी होडीतून दररोज ये-जा करतात. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांत लिंगायत भगिनींचा समावेश आहे.;त्यातली एक मोठी बहीण अंकिता ही लहान बहीण अनुष्कासाठी चक्क होडी वलवून शाळेसाठी सोडते.शाळा सुटताना ही अंकिता आपल्या संवगड्यांनाही घरी होडीतून आणते.
परचुरी गाव.... हे जवळपास दोन हजार लोकवस्तीचं. या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यानं नागरीकांना विविध प्रश्नांना तोंड द्याव लागतंय. दररोजचा होडीतून प्रवासही त्यांच्यासाठी जिकरीचा ठरत आहे.
शिक्षणाबाबत सरकारचे धोरण,भूमिका काय हे आपणास माहित आहे. मात्र कोकणातल्या या भगिनींचे शिक्षणाविषयी प्रेम काही वेगळंच आहे. गावाजवळ पुढारी आणि अधिकाऱ्यांना पुल बांधायला अद्याप मुहूर्त सापडला नाहीय. मात्र त्याकडं दुर्लक्ष करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या लिंगायत भगिनींनी सरकारच्या डोळ्यात अंजन घातलंय असं म्हणता येईल..