Wednesday, March 6, 2013

दुष्काळामुळे खंडोबाचे स्नान टॅंकरने


येत्या सोमवारी अमावास्या आल्याने जेजुरीत खंडोबाची सोमवती यात्रा भरणार असून, दुपारी बारा वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. यंदा महाशिवरात्रीला जोडून सोमवती आल्याने जेजुरी दोन दिवस भाविकांच्या गर्दीने गजबजणार आहे.

सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास कऱ्हा नदीवर स्नानाचा कार्यक्रम होणार आहे. यंदा नाझरे धरणात पाणी अत्यल्प असल्याने उत्सवमूर्तींना टॅंकरच्या पाण्याने स्नान घालण्यात येणार आहे.

सोमवती यात्रेच्या तयारीसाठी देवसंस्थान व ग्रामस्थ मंडळाची बैठक झाली. त्या वेळी देवसंस्थानचे मुख्य विश्‍वस्त सुधीर गोडसे, खांदेकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे आदी उपस्थित होते.

सोमवती यात्रेवर दुष्काळाचा परिणाम जाणवण्याची शक्‍यता आहे. त्यात सोमवती स्नानाची मोठी समस्या असणार आहे. देवसंस्थानने भरउन्हात पालखी सोहळा असल्याने जागोजागी खांदेकऱ्यांसाठी सरबत व पिण्याच्या पाण्याची सोय केल्याचे गोडसे यांनी सांगितले. खांदेकऱ्यांना पायाला चटके बसू नयेत, म्हणून पालखी मार्गावर काही ठिकाणी पाण्याचा शिडकावा केला जाणार आहे.

तिरूपतीच्या हुंडीत पाचशे कोटी


देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान असे बिरुद मिरवणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या हुंडीत आगामी वर्षभरात भाविकांच्या दानशूर हातून तब्बल 859 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. तिरुपती भगवंताने मनोकामना पूर्ण केल्यानंतर भाविकांकडून सढळ हाताने हुंड्यांमध्ये गुप्तदान करण्याची प्रथा आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तिरुपती देवस्थानच्या अमाप उत्पन्नावर नुकताच प्रश्‍न उपस्थित केला होता. देशावर आणि आंध्र प्रदेशातील "आयटी' कंपन्यांवर मंदीचे सावट असताना तिरुपती देवस्थानाच्या हुंडीमध्ये गेल्या वर्षी तब्बल 731 कोटींचे दान पडले होते. त्यामुळेच देवस्थानाने 2013 मध्ये हुंडीदानातून सुमारे साडेआठशे कोटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
देवस्थानच्या प्रशासकीय मंडळाने अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. देवस्थानने यंदा दोन हजार 248 कोटींचा अर्थसंकल्प तयार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 258 कोटींची वाढ करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात देवस्थानचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. भाविकांकडून मुंडण झाल्यानंतर जमा होणारे केस आणि लड्डू प्रसादम या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश करण्यात आला आहे. देवस्थानला गेल्या वर्षभरात हंडीमधून 73 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले.
भाविकांमध्ये वाढता सामाजिक तणाव आणि अनिश्‍चिततेतून या निधीत वाढ होत असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षी विशेष दर्शनासाठी प्रतिभाविक तीनशे रुपये आकारण्यात आले. यातून 181 कोटींचा निधी जमा झाला होता. तोच निधी आगामी वर्षात 250 कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यातून देवस्थानला अधिक गतीने सामाजिक कामे करता येऊ शकतील, असा विश्‍वास देवस्थानाचे मुख्य पुजारी डॉ. ए. व्ही. रामना दीक्षितुलु यांनी व्यक्त केला.

"स्वीस'चे विशेष घड्याळ उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधत देवस्थानने जगविख्यात स्वीस कंपनीसोबत करार केला आहे. या कंपनीकडून तिरुमला तिरुपतीचे चित्र असलेली मर्यादित 333 आलिशान घड्याळे तयार करण्यात येणार आहेत. प्रतिघड्याळ 27 लाख रुपये किंमत निश्‍चित करण्यात आली असून, यातून देवस्थान निधी गोळा जमवणार आहे. 

गरीबांच्या बेटीला वाचवा

 उल्हासनगरमधील गरीब कुटुंबातील सात वर्षांच्या मुलीवर हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. शस्त्रक्रियेसाठी सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम उभी करणे या कुटुंबासाठी अशक्‍यप्राय बाब असल्याने या मुलीवरील शस्त्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते, सजग नागरिक आणि काही सामाजिक संस्था या चिमुरडीच्या मदतीसाठी पुढे आल्या असून, आतापर्यंत सुमारे एक लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. उर्वरित रक्कम उभारण्यासाठी नागरिकांनी साह्य करावे, असे आवाहन तिच्या आई-वडिलांनी केले आहे. 
उदरनिर्वाहासाठी भटकंती करून खुर्च्या रंगविण्याचे काम करणाऱ्या निळू थोरात आणि निर्मला थोरात यांच्या सात वर्षांच्या मयूरीची ही कहाणी आहे. ती टेट्रॉलॉजी ऑफ फॅलो या सायअनॉटिक कंजेनायटल हार्ट डिसीझने (जन्मजात हृदयाचा आजार) ग्रस्त आहे. तिच्यावर पुण्यातील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तातडीने हृदय शस्त्रक्रिया (इंट्रा कार्डिऍक रिपेअर ओपन हार्ट सर्जरी) करावी लागणार आहे. अंदाजे अडीच लाख रुपये खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रियेसाठी 9 फेब्रुवारी हा दिवस ठरला होता; मात्र तेवढी रक्कम जमविणे कठीण असल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती थोरात यांनी डॉक्‍टरांना केली. 

खारीचा वाटा 
मयूरीच्या आई-वडिलांची व्यथा मिलिंद मोरे आणि नंदा नांद्रकर या गायकांना आणि प्रफुल्ल केदारे, प्रकाश जाधव या सामाजिक कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी पुढाकार घेऊन मदत जमा करण्यासाठी संगीत मैफल आयोजित केली. साहित्यिक प्रा. विठ्ठल शिंदे यांनी 10 हजार रुपये आणि महापालिकेचे "बुलडोझर मॅन' युवराज भदाणे यांनी 5 हजार रुपये मदत दिली. मिलिंद सेळमकर, अण्णा रोकडे, राजू धावारे, प्रकाश थोरात, मुरलीधर शिर्के, जसवंत ढकोलिया, सरस्वती ऐवळे, प्रवीण वाघमारे यांनीही खारीचा वाटा उचलला. असे एकूण 40 हजार रुपये जमवून थोरात यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे सिद्धिविनायक ट्रस्टने 25 हजार रुपये, साईबाबा शिर्डी संस्थानने 25 हजार रुपये आणि ठाणे मेडिकल असोसिएशन यांनी 10 हजार रुपये असा मदतीचा हात दिला. अशा प्रकारे आतापर्यंत एक लाख रुपये जमा झाले असले, तरी आणखी दीड लाख रुपयांची गरज आहे.