Saturday, October 7, 2023

बारा गावांना सौर उर्जेच्या पुरवठ्याचा ध्यास घेतलेला अवलिया!


भारनियमाने त्रस्त शेतकऱ्यांना फायदा :विहामांडवा गावातील अनोखा प्रयोग




#REinIndia,@eathjournalism  औरंगाबादः दैनंदिन वीज भारनियमाने त्रस्त असलेल्या पैठण तालुक्यातील बारागावातील शेतकऱ्यांना विहामांडवा येथील सौरउर्जा प्रकल्पाने मदतीचा हातच जणू दिला आहे. चार एकरवर उभारलेल्या या सौरउर्जाप्रकल्पामुळे दिवसाही सहज,स्वस्त आणि किफायतशीर वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसून येत आहे. या अवलियाने या अनोखा प्रयोग केला असून औरंगाबाद परिसरात हा प्रयोग इतरांसाठी दिशादर्शक म्हणता येईल.

अर्थ जर्नालिझम नेटवर्क(ईजीएन)तर्फे नुतनीकरण उर्जा अर्थात रिन्युएबल एनर्जीविषयी महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा औरंगाबाद येथे घेण्यात आली. याच अंतर्गत सहभागी पत्रकारांना संयोजकांनी या अनोख्या प्रयोगाच्या ठिकाणी भेटीस नेले. राज्यातील वीज भारनियमन हा काही नवीन विषय नाही, ग्रामीण भागातील गावकरी, शेतकऱ्यांना तर नेहमीच या समस्येला तोंड द्यावे लागते. दिवसा वीज राहणे हे त्यांच्यासाठी क्वचितच घडते भारनियमन हे तर त्यांच्या पाचवीच पूजलेले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण हिच समस्या पैठण तालुक्यातील उद्योजक अजय सिसोदिया,सुनिल सिसोदिया या बंधूच्या लक्षात आली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी वेगळे काही करण्याच्या उद्देशाने कालीका जिनिंग अँन्ड प्रेसिंग प्रा.लिमिटेड या कंपनीने मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून चार एकरवर सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरवले.या उभारणीसाठी आदित्य ग्रीन एनर्जी प्रा.लिमिटेडचे संचालक आणि निवृत्त अधिकारी अदिनाथ सांगवे यांची महत्वपूर्ण मदत,मार्गदर्शन लाभले.

अन् उभा राहिला दिमाखदार प्रकल्प

सिसोदिया बंधूनी आपल्या शेतात प्रकल्प उभारण्याचे निश्चित केल्यानंतर पर्यावरणपुरक सर्व नियमांना अधिन राहून नियोजन केले. २०११ ला चार एकरवर दोन मेगावँटच्या या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. दोनशे किलोचे दहा इनर्व्ह्रटर असून त्याद्वारे साठवणूक व अन्य प्रक्रीया होते. सुरवातीला कमी असणाऱ्या या पॅलनची संख्या नंतरच्या काळात वाढविण्यात आली आहे. आज जवळपास सातहजार(३३५ वॅटचै) पॅनल बसवले आहे.  वर्षाला सोळा लाख युनिट मेगावँटची निर्मिती होते, या निर्मितीच्या साठवणूकीतून विहामांडवा परिसरातील बारा गांवा दिवसा(साडेनऊ ते साडेपाच) सौर उर्जा पुरवठा केला जातो. त्यामुळे दिवसाच्या भारनियमनातून शेतकऱ्यांची एकप्रकारे मुक्तताच झालेली आहे.  .

एकदाच गुंतवणूक,रोबोटद्वारे सफाई

सुरवातीच्या काळात काही चीनमधील यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आली आज मात्र सर्व साहित्य हे भारतीय बनावटीचेच वापरले जाते. जवळपास सात कोटीची प्रकल्पाची गुंतवणूक आहे. सौरउर्जा प्रकल्पाच्या पॅनलची सफाई हा देखील एक किचकट भाग असतो. पण सिसोदिया बंधूनी यातही अत्याधुनिक रोबोट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे एकदा सेटिंग करून दिली कि रोबोटद्वारे पॅनलची पूर्ण सफाई रोबोकडून करण्यात येते, सफाईचे हे अनोखे तंत्रही आश्चर्यकारक म्हणता येईल.विशेष म्हणजे या प्रकल्पाची २५ वर्षाची किमान गॅरंटी असून त्यानंतरही प्रकल्पांतील साहित्याच्या प्रत्येक पार्टचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो असे अदिनाथ संगवे यांनी सांगितले.. मोबाईलच्या माध्यमातून पॅनलमध्ये काही नादूरूस्ती झाली किंवा किती युनिट निर्मिती झाली, याची सविस्तर आकडेवारी उपलब्ध होत असते,देखभाल,दूरूस्तीचा खर्च तसा येतच नसल्याचे अजय सिसोदीया यांनी सांगितले. यावेळी ईजीएनचे व्यवस्थापन जॉयदिप गुप्ता,समन्वयक अतुल देऊगांवकर यांचा संयोजकातंर्फे सत्कार करण्यात आला.

चौकट

सौरउर्जेच्या प्रोत्साहनासाठी पुढाकार

भारनियमाच्या मुक्ततेसाठी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची मुख्यमंत्री सौरउर्जा संरक्षित योजनेचा दुसरा टप्पाही सुरु झाला आहे. तसेच केंद्र शासनाने सुध्दा याच धर्तीवर कुसुम योजना कार्यन्वित केली आहे. सौरउर्जा प्रकल्प उभारण्यास कुणी इच्छुक असल्यास त्याची जागा असल्यास भरीव असे अनुदान दिले जाते तसेच सर्व साहित्याची खरेदी, विमा यासाठी अनुदान दिले जात आहे. किमान आठ तास विज उपलब्ध व्हावे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

---------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment