Wednesday, March 19, 2025

उधळूया रंग, जरी होतोय बेरंग!



        राजकारण’` हा केवळ एक भाग,क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला विषय नाही. क्षेत्र कुठलेही असो प्रत्येक क्षेत्रात आपल्याला `राजकारण` हे चांगल्या-वाईट अशा वेगवेगळ्या अंगाने पहायला मिळते. मात्र  राजकीय पुढाऱ्यांची मग ते सत्तारूढ असो कि विरोधक यांच्याइतकी रंगाची उधळण कुणीच करत नाही, त्यामुळेच ते काय चेष्ठेचे, गंमतीचे आणि चर्चेचे विषय बनतात. आपण नेते आहोत, जनतेचे प्रतिनिधी आहोत याचं भान विसरून काही नेते, पक्षश्रेष्ठी, सतत आपले शिवराळ भाषेचे रंग उधळत असतात. अमक्याला संपवून टाक, तमक्यांचा कोथळा बाहेर काढू वगैरे वगैरे `अशोभनीय` रंग वारेमापपणे उधळतात. काहीजण देशाबाहेर जाऊन आपल्याच देशाची बदनामी करणारे `दुर्देवी` रंग उधळत असतात. आपल्या समाजापुरता विचार करून  आपल्याच कोत्या मनाचे रंगही काहीजण उधळतात तर कुणी दुर्देवी हत्येचे अप्रत्यक्ष समर्थन करून `बेशरमपणाचे` तर कुणी दादागिरीचे, दहशतीचे रंग उधळत असतात....प्रातिनिधीक स्वरूपात रंगपंचमीच्या निमित्ताने विद्यार्थी व शिक्षकांच्या संवादातून ही अनोखी रंगांची उधळण मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न....श्री राजेश अग्नीहोत्री, लेखक,संवादक,प्रशिक्षक(9975455454)

-------------------------------------------

 शिक्षक:  मुलांनो,सांगा बरं....रंगपंचमी कधी असते ते?

विवेक:  मी सांगु सर ?  मी सांगू ?

शिक्षक:  सांग बघू, परंतु भिंतीवरच्या कॅलंडरवर पाहून नको सांगूस

विवेक:  नाही सर, रंगपंचमी कधी असते ते आजकाल कॅलंडर न पाहताच सांगता येतं.

शिक्षक: अरे वा, ते कसं?

विवेक:  कारण आजकाल रोजचं रंगपंचमी खेळली जाते.

शिक्षक: रोजंच, म्हणजे रोजंच रंगपंचमी असते?

 विवेक :  हो सर.

शिक्षक: अरे बाळा फाल्गुन मासात कृष्ण पक्षात जी पंचमी तिथी येते ती रंगपंचमी!

 विवेक:  तुम्ही सांगत आहात तो रंगपंचमींचा सण!

पण तुम्ही विचारलं होतं रंगपंचमी कधी असते? म्हणून सांगितलं की रोजचं असते.

शिक्षक: म्हणजे तुझ्या मते रोज रंगपंचमी खेळतात?

विवेकः माझ्या मते रोज रंग उधळले जातात म्हणून त्या अर्थाने रोजचं रंगपंचमी खेळली जाते.

शिक्षक: रोज रंग उधळले जातात?  कुणाकडून?

विवेक:- सर तुम्ही वर्तमानपत्रे वाचत नाहीत? वृत्तवाहिन्या पहात नाही?  सोशल मिडीयावर सुध्दा तुमचं अकाऊंट नाही ?

शिक्षक:   मी तर दररोज वर्तमानपत्र वाचतो, रात्री टिव्ही वर बातम्या पहातो,शिवाय सोशल मिडीयावर पण आहेच, पण असं का विचारतो आहेस?

विवेक:  सॉरी सर,पण तिथे तुम्हाला दिसत असेलच की काही राजकीय नेते, काही तथाकथित बुध्दिजिवी, विविध आंदोलने चालवणारे काही नेते दररोज रंगांची उधळम करत असतातच की!  खंड पडतो का कधी?

शिक्षक:  विवेक,मलां असं वाटतं की तुला जे म्हणायचं आहे तु स्पष्टपणे सांगावसं, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुध्दा बोध होईल.

विवेक:  ठीक आहे सर, सांगतो तसं. पण माझं काही चुकत असेल तर माफ करावं.

शिक्षक: अरे तू सांग तर आधी. सांग बरं तु म्हणतोस तसं काही राजकीय नेते दररोज रंग कसा उधळतात?

विवेक: सर, पहा ना, आपण नेते आहोत, जनतेचे प्रतिनिधी आहोत याचं भान विसरून काही नेते, पक्षश्रेष्ठी, सतत आपले शिवराळ भाषेचे रंग उधळत असतात. अमक्याला संपवून टाक, तमक्यांचा कोथळा बाहेर काढू वगैरे वगैरे `अशोभनीय` रंग वारेमापपणे उधळत असतात. तर काहीजण रोज सकाळी पत्रकारपरिषद घेऊन `अकलेचे तारे तोडणारे` रंग उधळत असतात. काही नेते दररोज जातीयवादाचे रंग उधळत असतात तर काही देशाबाहेर जाऊन आपल्याच देशाची बदनामी करणारे `दुर्देवी` रंग उधळत असतात. मला सांगायला पण लाज वाटतेय, परंतु काहीजण बायका-भानगडी यातून निर्लज्जपणाचे रंग उधळत असतात तर काही जण सर्वांची मते घेऊन फक्त आपल्या समाजापुरता विचार करून  आपल्याच कोत्या मनाचे रंग उधळत असतात. कुणी दुर्देवी हत्येचे अप्रत्यक्ष समर्थन करून `बेशरमपणाचे` रंग उधळत असतात तर कुणी दादागिरीचे, दहशतीचे रंग उधळत असतात. कुणी जाहीरपणे महिलांबद्दल असभ्य भाष्य करून आपल्या विकृत रंगाची उधळण करत असतात तर कुणी परंपरांची थट्टा करत,अशोभनीयपणे स्टेजवर काखा खाजवत `असंस्कृतपणाचे` रंग उधळत असतात.

शिक्षक: अरे बास बास. राजकीय नेत्यांची रंगाची उधळण आली लक्षात, परंतु बुध्दिजीवी वर्ग तर समाजाचे प्रबोधन करणारा असतो. तू म्हणतोस ते देखील असले रंग उधळतात?

विवेक:  माफ करा सर, परंतु मला असं वाटतं की यातले कित्येक जण स्वयंघोषित बुध्दिजीवी असावेत. निवडणूका आल्या की निर्भय बना मोहिम चालवायची, मग निवडणुका संपल्यावर ती मोहिम बासनात गुंडाळून ठेवायची, निवडणूकांचे निकाल लागल्यावर ईव्हीएम च्या नावाने बोंब मारायची मात्र निवडणूक आयोगाने यंत्र तापसणीचं आवाहन केल्यावर तोंड लपवायचं, असल्या समाजाची दिशाभूल करणाऱ्या रंगाची उधळण करणाऱ्या मंडळींना भाबडे लोक बुध्दिजीवी समजतात. यातले काही केवळ वयाने जेष्ठ असलेले लोक आपल्या अपेक्षेचे सरकार निवडून नाही आले तर जनतेने आता प्रतिसरकार स्थापन करावे  असे `केविलवाणे`  रंग उधळत असतात.

शिक्षक: आलं लक्षात विवेक. परंतु आंदोलन करणारे नेते तर समाजहितासाठी झटत असतात ते सुध्दा....?

विवेक:  माफ करा सर, परंतु आंदोलनाचा मूळ विषय राहतो बाजूला आणि पुन्हा सुरु होते ती जातीयवादाची शिवराळ भाषा, धमक्या देण्याची भाषा, इतर जातीला हिणवण्याची भाषा. आपणच समाजाचे सर्वेसर्वा आहोत हा गैरसमज करून घेऊन एल्गार पुकारण्याची भाषा.....ही अवघ्या समाजात असंतोष पसरवणाऱ्या रंगाची उधळण नव्हे का?

शिक्षक:  खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे विवेक. परंतु इयत्ता आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांला एवढी समज कुठून आली?

विवेक:  सर, तुलनेने जरी आम्ही वयाने लहान असलो तरी आजुबाजुला काय घडतंय हे न उमजण्याइतकी आमची लहान नक्कीच नाही. आम्ही उद्याचे मतदार आहोत. या मंडळीनी असल्या गैर रंगाची उधळण करणं थांबवलं नाही तर यांचा भवितव्याचा बेरंग केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बुरा न मानो.... होली है  असं वर्षातले ३६५ दिवस कुणी हेच म्हणू लागलं.......`तो  हमे बुरा लगेगा!

No comments:

Post a Comment