Wednesday, March 7, 2012

शांताबाईना सलाम....





तेलमालिश...दाढी...कटिंग सारखे शब्द पुरुषी आवाजातच बरे वाटतात...पण कोल्हापुरच्या शांताबाई यादव यांनी फक्त हे पुरुषी शब्द आपलेसे केले नाहीत तर पुरुषी मक्तेदारी असलेला हा व्यवसाय २५ पेक्षा जास्त वर्ष यशस्वीपणे करुन दाखवला....जगण्यासाठी सारं काही असं म्हणत जगणाऱ्या शांताबाईंच्या वेगळ्या वाटचालीवर साम मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट...

कोल्हापुराच्या वेशीवर असलेली गावं खरंतर कर्नाटकाच्या जवळ ...पण गावातल्या चालीरितीत मात्र कोल्हापुरी रांगडेपणा....अशाच या हसूर सासगिरी गावातल्या ह्या अगदी साध्या घरात राहतात...६५ वर्षांच्या शांताबाई यादव...लहानपणापासून करावे लागलेले कष्ट...हालअपेष्टा...यामुळे चेहऱ्यावर सुरुकुत्या आल्यात...पण अजूनही कामाची जिद्द काही जात नाही...अर्थात चुलीच्या आसापासचा रांधा वाढा....उष्टी काढा..ची दिनचर्चा संपली..की शांताबाई आपल्या पोटापाण्याच्या धंद्याला लागतात...(टॉवेल बांधताना...दाढी करतानाचे फास्ट शॉट्स....) पाहून आश्चर्य वाटलं ना...पण घाबरु नका..बाई अगदी सराईत आहेत...२५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव त्यांच्या सहजतेत दिसून येतो.......कोल्हापुरातल्या रांगडेपणा इथे मात्र एकदम साबणाच्या फेसासारखा मऊसूत होऊन जातो...(पुन्हा काही शॉट्स) न्हाव्याचा वडिलोपार्जित व्यवसाय..पतीच्या आकस्मिक निधनामुळे बंद झाला...चार पोरींच्या लग्नाची जबाबदारी असलेल्या शांताबाईंनी खरंतर काहीशा नाईलाजास्तव हा व्यवयाय स्वीकारला....या क्षेत्रात असलेली पुरुषांची मक्तेदारी लक्षात घेता आपल्याला हे जमेल का असा विचारही शांताबाईंच्या मनात आला.

सुरवातीला चर्चा झाली..पण हळूहळू शांताबाईंनी हसूरवाडी, हिडदुग्गी, कडाळ या गावात जावून लोकांची हजामत करण्यास सूरुवात केली. वर्षाला 30 किलो धान्यावर काही जणांनी त्यांच्याकडून वर्षभर केस कापून घेतले...हळूहळू शांताबाईंचा हात बसला आणि याच व्यवसायावर त्यांनी चारही पोरींची चांगल्या ठिकाणी लग्न केली..त्यांच्या या वेगळ्या कामगिरीबद्दल आणि जिद्दीबद्दल त्यांना पुरस्कारानेही गौरवण्यात आलं..पण आता मात्र त्या थकल्य़ा आहेत...गावातली दुकानं वाढल्याने ग्राहकांची संख्याही कमी झालीय...

बाई लय जिद्दी हाय..या शब्दात गावकरीही त्यांचं कौतुक करतात...

थंडगार आलीशान, ब्युटी सलून्स चालवणाऱ्या हायक्लास ब्युटिशियन्सना शांताबाईंच्या कामाचं नक्कीच कौतुक नसेल..पण गेल्या २५ पेक्षा जास्त वर्षांपासून खेडेगावात हजामत करुन आपल्या घरावर आलेली संकटं दूर करुन , गावातल्या माणसांबरोबर आपल्या कुटुंबाचं जगणंही त्यांनी सुंदर बनवलंय...एक नवा आदर्श निर्माण केलाय...








Wednesday, February 22, 2012

`नवाबा`चा असाही तोरा


कुलाबा येथील हॉटेल ताजमधील "वसाबी' रेस्टॉरंटमध्ये दोनच दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन साथीदारांनी दक्षिण आफ्रिका सरकारच्या वाणिज्य आणि गुंतवणूक विभागाचे माजी उपमहासंचालक आणि त्यांचे "बायपास' शस्त्रक्रिया झालेले सासरे यांना मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सैफ आज दिवसभर पोलिसांना सापडला नाही; अखेर सायंकाळी उशिरा त्याला नरिमन पॉइंट येथून कुलाबा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अटक करून रात्री जामिनावर सोडून दिले. हॉटेल ताजमधील "वसाबी' रेस्टॉरंटमध्ये काल मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सैफ, करिना कपूर, करिष्मा कपूर, मलायका अरोरा खान, अमृता अरोरा आणि अन्य सहा जण बसले होते. त्यांच्या शेजारच्या टेबलावर इक्‍बाल नवीन शर्मा (43) त्यांच्या पत्नी, सासू-सासरे आणि दोन मित्र भोजन घेत होते. अनिवासी भारतीय असलेले शर्मा व्यवसायानिमित्त नेहमी भारतात येतात. यापूर्वी ते दक्षिण आफ्रिकेच्या वाणिज्य दूतावासात 10 वर्षे कार्यरत होते. मुंबईत आल्यावर ते "वसाबी' येथे भोजनासाठी आले होते. त्या वेळी शेजारच्या टेबलाभोवती बसलेले सैफ आणि त्याची मित्रमंडळी मोठ्या आवाजात बोलत असल्याने शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ लागला. त्याबाबत शर्मा यांनी दोनतीनदा रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली; मात्र त्यानंतरही सैफ आणि त्याच्या मित्रमंडळींचा गोंधळ कमी न झाल्याने शर्मा यांनी दुसऱ्या टेबलाकडे जाण्याचे ठरवले. खालच्या मजल्यावरील टेबलाकडे खाद्यपदार्थ घेऊन येण्याची सूचना त्यांनी व्यवस्थापकाला दिली. शर्मा कुटुंब तिथून निघत असताना आधीच बाहेर गेलेला सैफ दारातच त्यांच्या समोर आला. 'माझी तक्रार हॉटेल व्यवस्थापनाकडे करता काय? मी कोण ते ओळखत नाही का? रेस्टॉरंटमध्ये आवाज होणारच, शांतता हवी तर वाचनालयात जा'', असे म्हणत सैफने त्यांना धक्काबुक्की केली. त्याच्या दोन साथीदारांनीही शर्मा यांना मारहाण सुरू केली. सैफचा ठोसा बसल्याने शर्मा यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. हा प्रकार पाहून त्यांच्या सासऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ठोसा तोंडावर बसून तेसुद्धा खाली पडले. रेस्टॉरंटचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटांना रोखले. त्यानंतर काही वेळातच सैफ मित्रमंडळींसह निघून गेला. जखमी झालेले शर्मा कुटुंबीयांसोबत गोकुळदास तेजपाल रुग्णालयात गेले. नाकाचे हाड मोडल्याचे समजल्यावर आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात जाऊन सैफ आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सैफ आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे आज सकाळपासूनच हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. सैफला अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके वांद्रे, जुहू आणि खार येथे गेली; मात्र सैफ घरात नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. संपूर्ण दिवसभर पोलिसांना न सापडलेला सैफ सायंकाळी उशिरा कुलाबा पोलिसांना शरण जाणार होता. त्यासाठी सायंकाळी 6.30 वाजता तो या परिसरात आला; मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून तो पुन्हा नरिमन पॉइंट येथील त्याच्या वकिलांच्या कार्यालयात गेला. तेथे तो वकिलांसोबत चर्चा करीत असतानाच कुलाबा पोलिसांचे पथक पोचले. त्यांनी सैफला पोलिसांच्या गाडीतून कुलाबा पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात त्याचा जबाब नोंदविल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळत असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा त्याची जामिनावर सुटका केली.

विद्यार्थ्यांना दिलासा


इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवरील प्रवेशाचे दडपण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलताना केंद्रीय मनुष्यबळ विभागाने सर्व विभागांसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विविध राज्यांच्या शिक्षण मंडळांच्या गुणांकन पद्धतीमध्ये फरक असल्याने निकालामध्ये होणारी तफावत दूर करण्यासाठी ही प्रवेश परीक्षा महत्त्वाची असेल. डॉ. रामस्वामी यांच्या समितीने दिलेल्या अहवालावर या शिफारशी आधारित आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांबरोबर बुधवारी बैठक घेतली. राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांना राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक परीक्षेत (सीईटी) समान मूल्य असेल. या परीक्षेच्या माध्यमातून "कॅपिटेशन फी'च्या प्रकारात घट होईल. तसेच, विविध प्रवेश परीक्षांसाठी तयारी करण्याचे दडपणही विद्यार्थ्यांवर येणार नाही, असे सिब्बल यांनी सांगितले. मात्र, राज्य पातळीवरील शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी राज्यातील शिक्षण मंडळाचे गुण आणि "सीईटी'चे गुण यांचे मूल्य काय असेल, हे ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला असेल. सध्या दिल्ली, उत्तराखंड, हरियाना आणि चंडिगड यांनी या नव्या परीक्षा पद्धतीला मान्यता दिली आहे, तर तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पुद्दुचेरी आणि पश्‍चिम बंगाल यांनी या प्रस्तावावर अधिक विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे.
अशी असेल परीक्षा - या "सीईटी'साठी शिक्षण मंडळातील गुणांना 40 टक्के "मूल्य' - उर्वरित गुण हे दोन टप्प्यांत घेतल्या जाणाऱ्या "सीईटी'मधील - "सीईटी'तील पहिला टप्पा हा मुख्य परीक्षेचा, तर दुसऱ्या टप्प्यात "ऍडव्हान्स्ड' परीक्षा - या तीनही टप्प्यांतील गुण एकत्र करून राष्ट्रीय "मेरीट लिस्ट' तयार करणार - राष्ट्रीय पातळीवरील अशा प्रकारची पहिली परीक्षा पुढील वर्षी होणार - पहिल्या परीक्षेत 100 महाविद्यालयांचा समावेश



जीवनप्रवास मांडण्याचा प्रयत्न


रमाबाई आंबेडकर, सिंधूताई सपकाळ, अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर उलगडण्यात आला होता. त्या चित्रपटांना रसिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला होता. त्यानंतर आता
मराठी चित्रपटसृष्टीत अशा प्रकारच्या चरित्रपटांनी जणू काही आता लाट येणाराच.
थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले आणि तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनपट दोन दोन चित्रपटांद्वारे रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणाराय. या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट मनोरंजक आणि उद्‌बोधक ठरेल हे लवकरच स्पष्ट होईल. रेन्बो प्रॉडक्‍शन हाऊसतर्फे विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित "विठाबाई नारायणगावकर' हा चित्रपट बनवण्यात येतोय. संतोष राऊत हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. दुसरा विठा हा चित्रपट "नम्रता एण्टरटेन्मेंटतर्फे तयार होतोय. दिनेश अग्रवाल आणि प्रीतम अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहे. या चित्रपटात ऊर्मिला कानेटकर विठाबाईची भूमिका करणारांय.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरही दोन चित्रपट येतायत. त्यापैकी एक चित्रपटाचे आहेत निर्माते दीपक चव्हाण हे तर दुसरा चित्रपट निर्मात्या सुचिता मालणकर काढत आहे. या चित्रपटात सावित्रीबाईंची भूमिका स्मिता शेवाळे करणार आहे. तर महात्मा फुलेंच्या भूमिकेत डॉ अमोल कोल्हे असतील.

Saturday, February 11, 2012

हक्काचं मॅनिज बंद....

१९४८ पासून एकाच ठिकाणी असलेले मॅनिज हे पुस्तकांचं दुकान तब्बल ६३ वर्षांनंतर बंद होणार आहे. वर्षानुवर्ष वाचकांमध्ये प्रसिध्द असलेल्या या दुकानासोबत अनेक जण जोडले गेले आहेत. त्यामुळे या सगळ्या वाचकांसाठी एक चांगला मित्र दुरावल्याची भावना आहे.
मॅनिज...63 वर्षांची परंपरा असलेलं हे दुकान... 1948 ला मानिक मनी यांच्या वडिलांनी पुस्तकाच्या एका छोट्या दुकानापासून सुरुवात केली. मानिक यांच्या वडिलांना लष्कर, सुरक्षा तसंच इंग्लिश लिटरेचरची आवड होती. सुरुवातीला मल्टिनॅशनल कंपनीत काम केल्यानंतर १९७० मध्ये मानिक यांनी या व्यवसायात लक्ष घालायला सुरूवात केली....सतत बाजारात काय हवं आहे, काय नाही याचा अभ्यास करत वाचकांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांनी आपल्या कलेक्शनमध्ये बदल केले.
मानिक मनी यांनी आपल्या दुकानाच्या कामात पूर्ण झोकून दिल्याने त्यांचं कौटुंबिक जीवन थोडं हरवलं. म्हणूनच आता इतक्या वर्षांनंतर त्यांनी आणि त्यांची पत्नी बिना यांनी आता कामातून रजा घेऊन घरच्यांबरोबर वेळ घालवायचा निर्णय घेतलाय.
मॅनिजबरोबर एक वेगळाच ऋणानुबंध जुळलेल्या वाचकांचं मन मात्र या बातमीने भरून आलं. मॅनिज बंद झालं तर पुढे काय हा प्रश्‍न त्यांना भेडसावतोय.
मॅनिज हे बुक शॉप हे जणू वाचकांसाठी ऑलटाईम फेव्हरिट कथा आहे...पण या कथेचा असा शेवट त्यांना नक्कीच चटका लावून जातोय..

अशाही नव्या घोषणा


निवडणुकीत कोण कुठल्या पद्वतीचे फंडे वापरून प्रचार करेल, हे सांगता येत नाही. डिजिटल फ्लेक्सच्या जोडीला गेल्या काही वर्षापास्न गाण्याच्या रिमेकचाही वापर होऊ लागलाय. यात घोषणा तरी कशा मागे राहतील. पारंपरिक घोषणा जाऊन त्यांनाही आता अत्याधुनिक`टच` मिळालाय. त्यामुळे शक्कल लढवून तयार केलेल्या या भन्नाट पण तितक्याच गंमतीशीर घोषणामुळे प्रचारात रंगत वाढलीय....
ताई माई अक्का विचार करा आणि पंजा, कमळ, घड्याळ, धनुष्यबाणावर मारा शिक्का... ही पारंपरिक जुनी घोषणा असो की एखाद्याचं नाव घेऊन तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांची घोषणा असो... या घोषणा आता मागे पडल्यात. यंदाच्या महापालिका निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांचा जोशच अधिक दिसून येतोय. पक्ष उमेदवार आणि निशाणी मतदारांपर्यत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांची सध्या एकच लगीनघाई उडालीय. धनुषच्या कोलावरी डी आणि वाट माझी बघतोय रिक्षावाल्याचा आधार भाजपनं घेत गाण्याची सिडी काढली. तर इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रचलेल्या घोषणांही वैशिष्टपूर्ण आहे. या घोषणामध्ये अगदी खाद्यपदार्थ, दैनंदिन वापरावयाच्या वस्तूंबरोबरच देवीदेवतांनाही सोडलं नाहीय.
पाव किलो खारी....भाऊ सब से भारी
एक किलो शिरा...भाऊ है सच्चा हिरा
एक किलो पावडर....भाऊ है ऑलराऊंडर
या काही भन्नाट घोषणांनी उमेदवार कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन प्रचार करतायत...
आई मला भात दे, मनसेला मत दे
एक नारा दिलसे, मनसे मनसे
या घोषणेद्वारे मनसेनं मतदारांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केलाय तर शिवसेनेच्या घोषणांमध्ये....
थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते
विरोधकांचे मिटवू नामोनिशाण, पालिकेवर फडकणार भगवे निशान
बघतोस काय रांगाने,पंजा मारला वाघाने
कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसनंही वेगळ्या घोषणांची रचना करत, खास स्टाईलमध्ये युतीला हटवण्याचं आवाहन मतदारांना केलय त्यात....
बंद करा नाटक, युतीला दाखवा फाटक
हाताला हात साथ द्या, युतीला मात द्या
सेना-भाजप युती बेहाल, पालिका झाली कंगाल
घोषणाबाजीच्या या युद्वात अपक्ष,बंडखोरही मागे नाहीत. त्यांनीही वेगवेगळी शक्कल लढवलेली दिसते
आमची निशानी बॅट, विरोधकांची लावणार वाट..
विरोधकांची वाट लावण्याची अपक्ष,बंडखोरांची ही घोषणा भन्नाटच आहे. प्रचारासाठी तीनच दिवस शिल्लक राहिल्यानं घोषणाबाजीचा कार्यकर्त्याचा जोश आणि होश उडवणारं हे महायुद्व अधिक रंगतदार होण्याची चिन्हय...

Wednesday, September 28, 2011

अनावश्यक कॉल्सची डोकेदुखी संपली...पण दर वाढणार


(मोबाईलसंदर्भात प्रत्येकाने वाचावा असा माहितीपूर्ण वाचनिय लेख....)
देशातील 90 कोटी मोबाईलधारकांची अनावश्यक 'कॉल्स' आणि 'एसएमएस'ची डोकेदुखी बंद झाली आहे. केव्हाही येणार कॉल्स आणि एसएमएस यावर ट्रायने कडक
उपाययोजना केल्या आहेत. टेरिफ रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (टीआरएआय) 27 सप्टेंबरपासून कोणत्याही 'सिम'वरुन एका दिवसाला 100 एसएमएस पाठविण्‍यावर प्रतिबंध घातले आहे. दिपावली, ईद आणि यासारख्या इतर मोठ्या सणांना मात्र मोबाईलधारकानांना सूट दिली जाणार आहे. सणासुदीला 100 पेक्षा जास्त एसएमएस पाठवू शकता येतील. बिनकामाचे कॉल्स आणि एसएमएसपासून तमाम मोबाईलधारकांचा सुटका करण्याचा विचार करताना ट्रायला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले.
अनावश्यक एसएमएस आणि कॉल्सपासून मोबाईलधारकांची सुटका करण्यासाठी सर्व मोबाईल यूजर्सवर हे प्रतिबंध लावण्यात आले आहेत. मात्र तरीही भविष्यात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे मत ट्रायशी संबंधित अधिकार्‍यांनी व्यक्त केले.
ट्रायने पाच सप्टेंबरला अनावश्यक एसएमएस आणि कॉल्सवर प्रतिबंध घालण्यासाठी शिफारस केली होती. मात्र, त्यावेळी 'सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया' ('सीओएआय')ने ट्रायकडे आपल्या अहवालावर फेरविचार करण्याची विनंती केली.
मोबाईलधारकांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा:
'ट्राय'द्वारा अनावश्यक एसएमएस आणि कॉल्सवर लावण्यात आलेले प्रतिबंध म्हणजे मोबाईलधारकांच्या मुलभूत हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे, असे सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने ('सीओएआय') म्हटले आहे. सीओएआयचे महाव्यवस्थापक राजन एस. मॅथ्यूज यांच्यामते ट्रायद्वारा निश्चित करण्यात आलेली 100 एसएमएसची मर्यादा ही देखील मोबाईलधारकांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. अनेक मोबाईलधारकांच्या मते 100 एसएमएसची ‍मर्यादा फारच कमी आहे.
'एसएमएस' संवादाचे सोपे माध्यम:
संवाद साधण्यासाठी 'एसएमएस' हे अत्यंत सोपे माध्यम आहे. मोबाईलधारक एखाद्या वेळेस एसएमएस पाठवून संकटातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो. जर त्याचा 100 एसएमएसचा कोटा संपल्यानंतर मात्र त्याच्याजवळ कोणताही पर्याय राहत नाही. यावरुन मोबाईलधारकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. असे सीओएआयचे महाव्यवस्थापक राजन एस. मॅथ्यूज यांनी ट्रायला गेल्या आठवड्यात लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
'डू नॉट कॉल' रजिस्टरमध्ये नोंद करा आणि चिंतामुक्त व्हा:
'डु नॉट कॉल' रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या मोबाईलधारकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. डू नॉट कॉल रजिस्टरमध्ये नोंदणी केलेल्या मोबाईलधारकांना जाहिरातींचे एसएमएस अथवा कॉल्सची चिंता करण्‍याचे कारण नाही. ट्रायने केलेल्या शिफारशीमध्ये मोबाईलधारकांना 'डू नॉट कॉल रजिस्टरमध्ये नोंद करण्याची आवाहन केले आहे.
नोंदणी केलेल्या ग्राहकांना जर असे जाहिरातींचे कॉल्स आलेच तर याबाबत त्याच्या टेलिफोन ऑपरेटरला तक्रार केल्यास त्या टेलिमार्केटिंग कंपनीला मोठा दंड भरावा लागेल.
पोस्टपेड कनेक्शनसाठी एका महिन्याला तीन हजार एसएमएस:
ट्रायने दिलेल्या शिफारसीमध्ये म्हटल्याप्रमाणे पोस्टपेड कनेक्शन असणार्‍या मोबाईलधारकांना एका महिन्यात केवळ 3,000 एसएमएस पाठविण्याची मुभा असावी. त्यापेक्षा जास्त एसएमएस पाठविण्याची त्यांना टेलिफोन ऑपरेटर्सने परवानगी देऊ नये.
दोन पर्याय:
अनावश्यक कॉल्स आणि एसएमएसच्या डोकेदुखीपासून मोबाईलधारकांची सुटका करण्यासाठी ट्रायने दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
पहिला पर्याय:
मोबाईलधारक 'फुली ब्लॉक्ड कॅटेगरी'ची निवड करू शकतो. हा पर्याय 'डू नॉट कॉल' रजिस्टर सारखाच आहे. 'फुली ब्लॉक्ड कॅटेगरी'ची निवड केल्यानंतर आपल्याला कोणताही व्यावसायिक कॉल्स अथवा एसएमएस येणार नाही. मोबाईलधारकांना नोंदणी करण्‍यासाठी इंग्रजीत कॅपिटल अक्षरात 'स्टार्ट' हा शब्द लिहून त्यानंतर एक स्पेस देत शून्य (0) हा अंक लिहावा. त्यानंतर हा एसएमएस 1909 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
दूसरा पर्याय:
मोबाईलधारक पार्शियली ब्लॉक्डची निवड करू शकतो. हा पर्याय निवडल्यानंतर त्याला काही निवडक व्यावसायिकांचेच एसएमएस येतील. यासाठी त्या ग्राहकाला आपल्या आवडीनुसार कंपन्यांची निवड करावी लागेल.
ट्रायने केली विभागणी:
पार्शियली ब्लॉक्ड पर्यायानुसार ट्रायने आठ भागात विभागणी केली आहे. बॅंकींग, विमा, क्रेडीट कार्ड, रियल एस्टेट, शिक्षण, आरोग्य, ग्राहक उपयोगी वस्तू व ऑटोमोबाईल, संचार, प्रसारण, मनोरंजन, पर्यटन आणि आयटी असे विभाग मोबाईलधारकांसाठी उपलब्ध असतील. संबंधीच्या सेवा पुरवणार्‍या टेलिमार्केटिंग कंपन्या त्यांच्या जाहिरातीचे एसएमएस अथवा कॉल्स करू शकतील.
...टेलिकॉम कंपन्यांचे धाबे बसणार परिणामी एसएमएसचे दर वाढतील?
ट्रायने मंगळवारी (27 सप्टेंबर) लागू केलेले प्रतिबंध टेलीकॉम कंपन्याच्या फायद्याचे नाही. कंपन्यांच्या मते यामुळे एसएमएस पाठवणार्‍या मोबाईलधारकांवर परिणाम होऊन त्यांची संख्या रोडावणार आहे. परिणाम तोटा भरून काढण्यासाठी टेलीकॉम कंपन्या एसएमएसच्या दरात वाढ करण्‍याची शक्यता आहे......(सौजन्य-दिव्य मराठी)