"ती फुलराणी', "नातीगोती', "चार दिवस प्रेमाचे', "झुलवा', "रणांगण', "एक
झुंज' यांसारख्या मराठी आणि नव्यानेच सादरीकरण झालेल्या "गझब तेरी अदा'तील हिंदी
नाट्यविष्काराद्वारे रसिकांच्या मनावर छाप पाडणारे दिग्दर्शक, नॅशनल स्कूल ऑफ
ड्रामाचे संचालक प्रा. वामन केंद्रे... सतत नावीन्याच्या शोधात आणि सापडलेल्या
विषयांचे, कथांचे झोकून देऊन काम आणि सोनं करणारा मराठी माणूस. कलावंतांसाठी
अडीचशेहून अधिक कार्यशाळा व प्रशिक्षण घेणारा हा माणूस वेगळ्या धाटणीतील विषय
हाताळण्याच्या त्यांच्या शैलीमुळेच मराठीसह हिंदी नाटकांतही ते आता परिचित होत
आहेत. आपलं थिएटर, रंगभूमी आणि देशीपण जगासमोर मांडण्याची वेळ आली आहे, असं त्यांना
वाटतं. "सकाळ'शी दिलखुलासपणे संवाद साधताना त्यांनी विविध मुद्यांवर स्पष्टपणे मत
मांडले.
श्रीकृष्ण कुलकर्णी
-------------------
नाटक हा एक
सृजनांचा आविष्कार आहे. त्यातून आपली भाषा, कला व संस्कृतीची ओळख होते. प्रेक्षक
ज्या वेळेस अशा नाट्याविष्कार, कलाकृती सादरीकरणाला मनसोक्त दाद देतात त्या वेळेस
मिळणाऱ्या आनंदाची तुलनाच होऊ शकत नाही. मी पैशासाठी नव्हे, तर लोकांचे भावविश्व
नाटकांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच नाटकासाठी विषय निवडल्यानंतर
ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोचण्याच्या प्रवासात जीव ओतून झोकून देऊन काम करतो.
त्यातूनच सर्वोत्कृष्ट कलाकृती निर्माण होण्यास मदत होते. केरळमध्ये मी इंडियन नेस,
इंडियन नेशन या विषयांचे संशोधन करताना भारतीय विधी-परंपरा, लोकनाट्य, संस्कृती व
आपला देशीपणा शोधण्याचा प्रयत्न केलाच नाही, तर तो आशय, विषय व संस्कृती नाटकात कशा
पद्धतीने येईल यावर भर दिला. त्यामुळेच नाटकात वातावरण, गंध, दरवळ हे का असायला
हवे, हे मला समजले आणि मी त्याचा जमेल त्या पद्धतीने नाट्य, कलाक्षेत्रात वापर
करणार आहे.
* नाटक आशय, विषय अशा सर्वच बाबी बदलत आहेत. या परिस्थितीविषयी
काय वाटते?
प्रा. वामन केंद्रे ः भारतातील नाट्यक्षेत्र, चळवळ आज खरोखरच
वेगळ्या अंगाने जात आहे. प्रत्येक नाटकाचे विषय, कथा व आशय वेगळा आहे. प्रत्येक
कलावंत, संस्था आपली वैविध्यता जपण्याचा प्रयत्न करताना दिसते. पूर्वीपासूनच ठराविक
साच्यात नाट्यक्षेत्र कधीही अडकले नाही. वेगळे विषय हाताळण्याची क्षमता
नाट्यसंस्था, कलावंतांत असून, ती सादरीकरणातही दिसते. दिग्दर्शनाबरोबरच नेपथ्य,
वेशभूषा, पात्राला साजेसे संवाद आणि संगीत, दिग्दर्शनाकडे लक्ष ते देताना दिसतात.
सध्या रसिक मनावर बिंबविले जातील असे विषय पुढे येत असून, ही चांगली बाब आहे.
* नाटकांमधून करिअर करू इच्छिणाऱ्या उदयोन्मुख कलावंत व संस्थांबद्दल
"एनएसडी'चे धोरण कसे?
प्रा. केंद्रे ः "एनएसडी'मध्ये सहभागी प्रत्येक
विद्यार्थ्याला उच्चतम प्रशिक्षण देऊन त्याला सर्वांगाने घडविणे, हा आमचा मुख्य
उद्देश आहे. मात्र, केवळ देशभरातील 25-30 विद्यार्थांपुरतेच हे काम मर्यादित आहे.
नाट्य, चित्रपट क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या उदयोन्मुख, हौशी कलावंत, संस्थांची
संख्या वाढत असल्याने "एनएसडी'चे काम मर्यादित न राहता व्यापक बनले आहे. यादृष्टीने
आम्ही विविध नव्या केंद्रांद्वारे त्या-त्या भागातील टॅलेंट शोधून त्यांना योग्य
दिशा देण्याचे काम आगामी काळात करणार आहोत. देशातील भाषांत नाट्य प्रशिक्षण,
मार्गदर्शनाची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे.
* व्यावसायिक, प्रायोगिक नाटक हे आपापल्या ठिकाणी असले, तरी त्यांचे
स्वरूप, वाटचालीला पूरक ठरते का?
प्रा. केंद्रे ः व्यावसायिक नाटकांनी
रंगभूमीला वेगळा नावलौकिक, दर्जा मिळवून दिला आहे. ही फार मोठी उल्लेखनीय बाब
(ऍचिव्हमेंट) म्हणता येईल. केवळ विनोदी, कौटुंबिक असे एकच विषय, आशय घेऊन सादरीकरण
झाल्यास ते फार काळ तग धरू शकत नाही, पण आता व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांचे
स्वरूप बदलत असून, नाट्यकलावंत, संस्था ज्वलंत विषयांना प्राधान्य देऊन सादरीकरण
करताना दिसत आहेत. त्यामुळेच अशा नाट्याविष्कारांची राज्य, राष्ट्रीय व आता
आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड होऊन त्यांचा गौरव होताना दिसतो. नवीन प्रयोग गाजले
पाहिजेत त्याशिवाय नाटकांवर चर्चा होणार कशी? चांगले नाट्याविष्कार रंगभूमीला पुढे
नेतात. पूर्वी "वाडा चिरेबंदी', "घाशीराम कोतवाल', "महानिर्वाण', "रणांगण', "जांभूळ
आख्यान', अशा कितीतरी नाटकांनी रंगभूमी गाजवली. "ती फुलराणी', "एक झुंज', "झुलवा'चा
प्रत्येक प्रयोग वेगळा ठरला. व्यावसायिक, प्रायोगिक समांतर प्रयोगांद्वारे एक स्थान
मराठी रंगभूमीला मिळवून दिले.
* प्रांत, भाषिक नाटकांचा वाढता विस्तार व
त्याला लाभत असलेल्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल?
प्रा. केंद्रे ः आपण नाट्य,
कला क्षेत्राचे वैश्विक रूप लक्षात घ्यायला हवे. शेवटी नाटक हे केवळ ठराविक वर्ग,
प्रांतापुरते मर्यादित नको. प्रांत, भाषिक नाटकांची संख्या वाढलीच पाहिजे. एका
भाषेची नाटके ही दुसऱ्या भाषेत आल्यास, त्यांचे सादरीकरण झाल्यास त्यात गैर काही
नाही. या भाषांच्या देवाणघेवाणीमुळे रंगभूमी समृद्ध होण्यास मदत होईल. ही
देवाणघेवाण जोपर्यंत होत नाही तोवर नाटक सर्वांगाने समृद्ध, विकसित झाले, असे
म्हणता येणार नाही.
* तुम्ही करत असलेल्या नव्या निर्मितीबद्दल काही सांगा?
प्रा. केंद्रे ः मी नुकतेच "गझब तेरी अदा' हे हिंदी नाटक आणले. पहिल्या
महायुद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकाला आदरांजली म्हणून हे नाटक केले आहे. "वुमेन
अगेन्स्ट वॉर' अशी उत्तर हिंदुस्थानात गाजत असलेल्या बाबीचाही त्यात समावेश आहे.
"मोहे पिया', "पिया बावरी' यांसारखे नाट्याविष्कारही दाद मिळविणारे ठरले आहेत.
-------------------