Friday, July 15, 2016
बहुआयामी मित्रवर्य राजेश
ट्रु फ्रेंडशिप इज रेअर,व्हर्च्युअस् बिकम फ्रेल....अर्थात खरी मैत्री ही दुर्मिळ असते. या मैत्रीपुढे मराठमोळ्या,अस्सल गावराण भाषेत बोलायचे झाले तर अगदी मातीचे ढेकळंसुध्दा अशा मैत्रीपुढे ठिसूळ होऊन जातात,फुटतात...असं विख्यात लेखक,विचारवंत अॅटीस्ट्रॉटलनं म्हटलं आहे...असाच मैत्री या शब्दाला जागणारा,व्हर्सटाईल,गुणी,लेखक,व्याख्याता अन् हो कार्टुनिस्टसुध्दा असलेले व्यक्तीमत्व म्हणजे राजेश अग्निहोत्री....एखादं लेक्चर असो,कार्टुन काढणं असो की ऐनवेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच सादरीकरण असो...प्रत्येक बाबतीत राजेश पुढेच. त्यामुळेच त्याचा मला अभिमान वाटतो. अशा या गुणी मित्राला समाजातील युवादोस्तासाठी सर्वच बाबतीत मदतीचे ठरेल,अशा अंगाने दैनिक सकाळच्या नव्यानेच सुरु झालेल्या युवारंगमध्ये काहीतरी कॉलम सुरु करण्यास मी सूचविले. या दोस्तांनंही क्षणाचाही विलंब न करता तात्काळ होकार दिला आणि सकाळच्या आवृत्यांमध्ये प्रसिध्द होत असलेले हे सदर अल्पावधीतच प्रसिध्द झालं. युवादोस्त,नागरीकांसाठी ते मार्गदर्शन ठरत आहे. गोष्टींच्या रूपाने मांडण्याच शैली आणि फारच सुरेख लिखान यामुळे ते अनेकांना भावते आहे...खास माझ्या युवादोस्त आणि मित्रमंडळींसाठी युवारंगमध्ये प्रसिध्द झालेल्या राजेशच्या या सदरातील भाग खाली देत आहे. आपणाला आवडते तर आपली प्रतिक्रीया पुढील मोबाईल,ईमेलवर जरूर नोंदवा एवढंच सांगावंस वाटतं, (मोबाईल-9975455454 अथवा agnihotriraj@rediffmail.com....)
Thursday, July 14, 2016
अघोषित संपत्ती आणि काळा पैशावरील कर
केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत जाहीर केलेली अघोषित संपत्ती आणि काळा पैशावरील कर हा त्या व्यक्तीकडे शिल्लक राहिलेल्या अघोषित संपत्तीतून भरता येणार नाही व असे आढळून आल्यास गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारने दिला आहे.
सरकारने इन्कम डेक्लरेशन स्कीमविषयी चौथ्या टप्प्यातील प्रश्नोत्तरांचा सेट प्रसिद्ध केला. एखाद्याने अघोषित संपत्तीतील काही रक्कम कर, अधिभार व दंड स्वरुपात भरल्यास दंडाचे प्रमाण 45 टक्क्यांऐवजी 31 टक्क्यांवर येते. परंतु या दरात कोणताही बदल करण्याचा हेतू नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यासाठी अर्थविधेयकातील कलम 184 व 185 चे उदाहरण देत स्पष्टीकरण देण्यात आले.
उदाहरणार्थ, एका व्यक्तीने 100 लाख रुपयेएवढी अघोषित संपत्ती जाहीर केली. त्यावर त्याला 1 जून 2016 पासून दंड स्वरुपातील 45 लाख रुपयांची रक्कम ऊर्वरित अघोषित संपत्तीतून भरावी लागणार आहे. परंतु ते 45 लाख रुपयेदेखील अघोषित संपत्तीतच मोडत असल्याने त्यावरील करात कोणतीही सूट दिली जाणार नाही. त्या व्यक्तीला एकुण 145 लाख रुपयांवर 65.25 लाख रुपयांचा वेगळा कर भरणे बंधनकारक असणार आहे.
मधुमेहावर नियंत्रण ठेवता येणे शक्य
मधुमेह हा कधीही बरा न होणारा रोग आहे, असे सांगितले जाते. मधुमेहामुळे अन्य व्याधी, आजार रुग्णाला होण्याची शक्यता असते. मात्र, आता संगणकाच्या मदतीने
मधुमेहावर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार असून, मधुमेहींचे आयुष्यमानही वाढू शकते, असा दावा यावर संशोधन करणाऱ्या आरोग्यविषयक संस्थांनी केला आहे.
भारतातील "एम्स‘, "पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया‘, "रोलिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ‘ आणि अमेरिकेतील अटलांटा येथील इमोरी विद्यापीठ या संस्थांनी या संदर्भात अभ्यास केला आहे. संगणकाच्या साह्याने त्यांनी एक प्रारूप तयार केले असून, त्याद्वारे मधुमेहींना शरीरातील रक्त व साखरेचे प्रमाण योग्य राखण्यास व रोगावर नियंत्रण ठेवता येणार आहे. हे सर्व त्यांना स्वतः करणे शक्य होणार असून, डॉक्टरकडे जाण्याचीही गरज उरणार नाही, असे सांगण्यात आले. ही पद्धती खर्चिक नसल्याने गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी उपयुक्त आहे.
भारत व पाकिस्तानमधील दहा आरोग्य केंद्रांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. मधुमेहावर नियंत्रित व ज्यांचे मधुमेहावर फारसे नियंत्रण नाही, अशी हृदयरुग्णांची तपासणी करण्यात आली. सामान्य व परंपरागत उपाय करणाऱ्यापेक्षा आधुनिक उपायांनी मधुमेह नियंत्रणात ठेवणाऱ्या गट या अभ्यासाच्या उद्दिष्टांपर्यंत अधिक जवळ पोचला असल्याचे व त्यांना धोका कमी असल्याचे या चाचणीत निदर्शनास आले. "एम्स‘मधील अंतस्त्रावशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निखिल टंडन यांनी ही माहिती दिली. या प्रकारात नवीन किंवा महागड्या औषधांची गरज नसते. तरीही रोगावर स्वतःच नियंत्रण ठेवण्याची रुग्णाची शक्ती वाढते, असे त्यांना सांगितले.
यासंदर्भातील शोधनिबंध "ऍनाल्स ऑफ इंटरनल मेडिसीन‘च्या बाराव्या आवृत्तीत प्रसिद्ध झाला आहे. टंडन हे याचे वरिष्ठ लेखक आहेत. जेथे स्रोत कमी आहेत आणि मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे, अशा दक्षिण आशियात "बहुघटक मधुमेह योजना‘ (यात अवैद्यकीय उपचार समन्वयक व निर्णय सहायक इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदणी सॉफ्टवेअर यांचा समावेश आहे.) विरुद्ध परंपरागत उपचार यांचा अभ्यास करून त्याचे परिणाम या अभ्यासगटाने नोंदविले आहेत, असे टंडन यांनी सांगितले. या प्रकारे एक हजार 150 रुग्णांवर अडीच वर्षे उपचार करण्यात आले. कमी व मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये अशा प्रकारची व्यापक मधुमेह व्यवस्थापनाची प्रथमच चाचणी घेण्यात आली.
आधुनिक पद्धतीचे निष्कर्ष - रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्टेरॉलवर नियंत्रण शक्य
- शरीरातील विषमता कमी होते
- हृदयरोग, नेत्ररोग, मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका कमी होतो.
वाढता विळखा... 41 कोटी 50 लाख जगभरात
07 कोटी भारतात
75 टक्के कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये
Tuesday, January 6, 2015
आशयघन,संस्कृतीपुरक नाट्यनिर्मितीचा अविष्कार,रंगभूमी बदलतेय

"ती फुलराणी', "नातीगोती', "चार दिवस प्रेमाचे', "झुलवा', "रणांगण', "एक झुंज' यांसारख्या मराठी आणि नव्यानेच सादरीकरण झालेल्या "गझब तेरी अदा'तील हिंदी नाट्यविष्काराद्वारे रसिकांच्या मनावर छाप पाडणारे दिग्दर्शक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक प्रा. वामन केंद्रे... सतत नावीन्याच्या शोधात आणि सापडलेल्या विषयांचे, कथांचे झोकून देऊन काम आणि सोनं करणारा मराठी माणूस. कलावंतांसाठी अडीचशेहून अधिक कार्यशाळा व प्रशिक्षण घेणारा हा माणूस वेगळ्या धाटणीतील विषय हाताळण्याच्या त्यांच्या शैलीमुळेच मराठीसह हिंदी नाटकांतही ते आता परिचित होत आहेत. आपलं थिएटर, रंगभूमी आणि देशीपण जगासमोर मांडण्याची वेळ आली आहे, असं त्यांना वाटतं. "सकाळ'शी दिलखुलासपणे संवाद साधताना त्यांनी विविध मुद्यांवर स्पष्टपणे मत मांडले.
श्रीकृष्ण कुलकर्णी
-------------------
नाटक हा एक सृजनांचा आविष्कार आहे. त्यातून आपली भाषा, कला व संस्कृतीची ओळख होते. प्रेक्षक ज्या वेळेस अशा नाट्याविष्कार, कलाकृती सादरीकरणाला मनसोक्त दाद देतात त्या वेळेस मिळणाऱ्या आनंदाची तुलनाच होऊ शकत नाही. मी पैशासाठी नव्हे, तर लोकांचे भावविश्व नाटकांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच नाटकासाठी विषय निवडल्यानंतर ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोचण्याच्या प्रवासात जीव ओतून झोकून देऊन काम करतो. त्यातूनच सर्वोत्कृष्ट कलाकृती निर्माण होण्यास मदत होते. केरळमध्ये मी इंडियन नेस, इंडियन नेशन या विषयांचे संशोधन करताना भारतीय विधी-परंपरा, लोकनाट्य, संस्कृती व आपला देशीपणा शोधण्याचा प्रयत्न केलाच नाही, तर तो आशय, विषय व संस्कृती नाटकात कशा पद्धतीने येईल यावर भर दिला. त्यामुळेच नाटकात वातावरण, गंध, दरवळ हे का असायला हवे, हे मला समजले आणि मी त्याचा जमेल त्या पद्धतीने नाट्य, कलाक्षेत्रात वापर करणार आहे.
* नाटक आशय, विषय अशा सर्वच बाबी बदलत आहेत. या परिस्थितीविषयी काय वाटते?
प्रा. वामन केंद्रे ः भारतातील नाट्यक्षेत्र, चळवळ आज खरोखरच वेगळ्या अंगाने जात आहे. प्रत्येक नाटकाचे विषय, कथा व आशय वेगळा आहे. प्रत्येक कलावंत, संस्था आपली वैविध्यता जपण्याचा प्रयत्न करताना दिसते. पूर्वीपासूनच ठराविक साच्यात नाट्यक्षेत्र कधीही अडकले नाही. वेगळे विषय हाताळण्याची क्षमता नाट्यसंस्था, कलावंतांत असून, ती सादरीकरणातही दिसते. दिग्दर्शनाबरोबरच नेपथ्य, वेशभूषा, पात्राला साजेसे संवाद आणि संगीत, दिग्दर्शनाकडे लक्ष ते देताना दिसतात. सध्या रसिक मनावर बिंबविले जातील असे विषय पुढे येत असून, ही चांगली बाब आहे.
* नाटकांमधून करिअर करू इच्छिणाऱ्या उदयोन्मुख कलावंत व संस्थांबद्दल "एनएसडी'चे धोरण कसे?
प्रा. केंद्रे ः "एनएसडी'मध्ये सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला उच्चतम प्रशिक्षण देऊन त्याला सर्वांगाने घडविणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. मात्र, केवळ देशभरातील 25-30 विद्यार्थांपुरतेच हे काम मर्यादित आहे. नाट्य, चित्रपट क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या उदयोन्मुख, हौशी कलावंत, संस्थांची संख्या वाढत असल्याने "एनएसडी'चे काम मर्यादित न राहता व्यापक बनले आहे. यादृष्टीने आम्ही विविध नव्या केंद्रांद्वारे त्या-त्या भागातील टॅलेंट शोधून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम आगामी काळात करणार आहोत. देशातील भाषांत नाट्य प्रशिक्षण, मार्गदर्शनाची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे.
* व्यावसायिक, प्रायोगिक नाटक हे आपापल्या ठिकाणी असले, तरी त्यांचे स्वरूप, वाटचालीला पूरक ठरते का?
प्रा. केंद्रे ः व्यावसायिक नाटकांनी रंगभूमीला वेगळा नावलौकिक, दर्जा मिळवून दिला आहे. ही फार मोठी उल्लेखनीय बाब (ऍचिव्हमेंट) म्हणता येईल. केवळ विनोदी, कौटुंबिक असे एकच विषय, आशय घेऊन सादरीकरण झाल्यास ते फार काळ तग धरू शकत नाही, पण आता व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांचे स्वरूप बदलत असून, नाट्यकलावंत, संस्था ज्वलंत विषयांना प्राधान्य देऊन सादरीकरण करताना दिसत आहेत. त्यामुळेच अशा नाट्याविष्कारांची राज्य, राष्ट्रीय व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड होऊन त्यांचा गौरव होताना दिसतो. नवीन प्रयोग गाजले पाहिजेत त्याशिवाय नाटकांवर चर्चा होणार कशी? चांगले नाट्याविष्कार रंगभूमीला पुढे नेतात. पूर्वी "वाडा चिरेबंदी', "घाशीराम कोतवाल', "महानिर्वाण', "रणांगण', "जांभूळ आख्यान', अशा कितीतरी नाटकांनी रंगभूमी गाजवली. "ती फुलराणी', "एक झुंज', "झुलवा'चा प्रत्येक प्रयोग वेगळा ठरला. व्यावसायिक, प्रायोगिक समांतर प्रयोगांद्वारे एक स्थान मराठी रंगभूमीला मिळवून दिले.
* प्रांत, भाषिक नाटकांचा वाढता विस्तार व त्याला लाभत असलेल्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल?
प्रा. केंद्रे ः आपण नाट्य, कला क्षेत्राचे वैश्विक रूप लक्षात घ्यायला हवे. शेवटी नाटक हे केवळ ठराविक वर्ग, प्रांतापुरते मर्यादित नको. प्रांत, भाषिक नाटकांची संख्या वाढलीच पाहिजे. एका भाषेची नाटके ही दुसऱ्या भाषेत आल्यास, त्यांचे सादरीकरण झाल्यास त्यात गैर काही नाही. या भाषांच्या देवाणघेवाणीमुळे रंगभूमी समृद्ध होण्यास मदत होईल. ही देवाणघेवाण जोपर्यंत होत नाही तोवर नाटक सर्वांगाने समृद्ध, विकसित झाले, असे म्हणता येणार नाही.
* तुम्ही करत असलेल्या नव्या निर्मितीबद्दल काही सांगा?
प्रा. केंद्रे ः मी नुकतेच "गझब तेरी अदा' हे हिंदी नाटक आणले. पहिल्या महायुद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकाला आदरांजली म्हणून हे नाटक केले आहे. "वुमेन अगेन्स्ट वॉर' अशी उत्तर हिंदुस्थानात गाजत असलेल्या बाबीचाही त्यात समावेश आहे. "मोहे पिया', "पिया बावरी' यांसारखे नाट्याविष्कारही दाद मिळविणारे ठरले आहेत.
-------------------
"एनएसडी'चे महाराष्ट्रात लवकरच केंद्र
वामन केंद्रे मुलाखत (Word Count : 465 CC : 33 Page Baskets: Unicode_Test Locations: -) | |||
समवेत फोटो आहे....81451 "एनएसडी'चे महाराष्ट्रात लवकरच केंद्र संचालक प्रा. केंद्रे यांची माहिती ः महोत्सव, कार्यशाळा, प्रशिक्षणातून सहभागाची संधी श्रीकृष्ण कुलकर्णी ः सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. 26 ः आज मनोरंजन "इंडस्ट्री' बनली असून, तिचे स्वरूप व्यापक होत चालले आहे. त्यामुळे प्रत्येक भाषेत तयार होणाऱ्या नाटक, सिनेमांची, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थी, उदयोन्मुख कलावंतांची संख्याही वाढत चालली आहे. या सर्वांना नाट्यांशी संबंधित एकाच ठिकाणी सादरीकरण, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा यांसारख्या घटकांबाबत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी)मध्ये प्रशिक्षण देणे अवघड बनत चालले आहे. त्या त्या विषयाचे प्रशिक्षण व अन्य बाबींचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी एनएसडीने पुढाकार घेतला असून, देशात बंगळूर, सिक्कीम व आगरतळा येथे केंद्रे सुरू केली आहेत. अजून दोन केंद्रे नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील पहिले केंद्र महाराष्ट्रात असेल, अशी माहिती प्रसिद्ध दिग्दर्शक व एनएसडीचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी "सकाळ'ला दिली. "एनएसडी'च्या महोत्सवासाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रा. केंद्रे यांनी विविध मुद्द्यांवर "सकाळ'शी संवाद साधला. "एनएसडी' ही नाट्य, कला क्षेत्राशी निगडित असलेल्या जगातील प्रमुख संस्थांपैकी एक आहे. अशा संस्थेच्या संचालकपदी सन्मानाने मराठी माणसाची निवड होणे ही एक ऐतिहासिक घटना म्हणता येईल, असे नमूद करून प्रा. केंद्रे म्हणाले, की या निवडीमुळे मराठी मंडळींना आनंद होणे स्वाभाविक असून, माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. देशातील 25 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना तीन वर्षे सर्व प्रकारचे उत्तम प्रशिक्षण देतो. पण या 25 विद्यार्थ्यांच्या पलीकडे मोठे राष्ट्र आहे, हे विसरता येणार नाही. पूर्वी "एनएसडी'चे स्वरूप मर्यादित होते. त्या वेळेस रोजीरोटीचा प्रश्न होता मात्र मनोरंजन इंडस्ट्री बनल्याने हे स्वरूप भव्यदिव्य, व्यापक झाले आहे. या इंडस्ट्रीला खऱ्या अर्थाने नावारूपास आणण्याबरोबरच कलागुणांना वाव देण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण 25 विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित न ठेवता या क्षेत्रांकडे "करिअर' करू इच्छिणाऱ्यांसाठी "कनेक्शन इन्स्टिट्यूशन विथ द नेशन' ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार "एनएसडी' प्रयत्न करत आहे. बंगळूर, सिक्कीम आणि आगरतळा येथे केंद्र सुरू केले असून, लवकरच दोन केंद्रे कार्यरत होतील. त्यातील एक महाराष्ट्रात असेल. त्या त्या भाषेत स्थानिक उदयोन्मुख कलावंतांना प्रशिक्षण मिळावे, त्याची पाळेमुळे त्या त्या भाषेत रुजवावीत हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. गावागावापर्यंत पोचणार ते म्हणाले, की "एनएसडी'चे काम गावापर्यत वैश्विकस्तरावर पोचविण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळेच या महिन्यात बारा महोत्सव आम्ही घेत असून, त्यातीलच एक नाशिकला होत आहे. जात, भाषा, प्रांताच्या पलीकडे नाटक, सिनेमा पोचला पाहिजे. या क्षेत्रातील उदयोन्मुख कलावंत, संस्थांना यानिमित्ताने पोचण्याचा "एनएसडी'चा प्रयत्न तर आहेच पण त्याहीपेक्षा नाटकांचे संहिता, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजनांसह नेमके सादरीकरण कसे असावे, या बाबींची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित प्रयोगांचे सादरीकरण होत आहे. आगामी काळात प्रशिक्षण, कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे. चौकट राज्य नाट्य स्पर्धा स्तुत्य उपक्रम सांस्कृतिक संचालनालयातर्फे महाराष्ट्रात होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. नाट्यमहोत्सवाचे आयोजन करणारे देशात महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. ही एक सार्वत्रिक (युनिक) बाब असून, जगात अशा प्रकारचे कुठेच आयोजन केले जात नाही. चारशे ते साडेचारशे नाटकांचे सादरीकरण करणे हे मोठे आव्हान नाट्यसंस्था, कलावंत खंबीरपणे पार पाडत आहेत. अशाच नाटकांमधून चांगले दिग्गज कलावंत, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञान निर्माण झाले असून, त्यामुळे प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीस हातभार लागत असल्याचे केंद्रे यांनी नमूद केले. |
Subscribe to:
Posts (Atom)