Wednesday, March 4, 2009

हल्ला श्रीलंकेवर नव्हे क्रिकेटजगतावर


लाहोरमधील गदाफी स्टेडियमनजीक दहशतवाद्यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंवर हल्ला केला. खेळाडूंच्या बसला बारा दहशतवाद्यांनी चारही बाजूंनी घेरले आणि बेछूट गोळीबार केला... रॉकेट डागले...हातबॉम्बही फेकला...क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेचा जगभरातून निषेध नोंदवला जात आहे....दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला म्हणजे एकट्या श्रीलंका संघावर नव्हे तर संपुर्ण क्रिकेटविश्वावर झाल्याचं बोललं जात आहे...

मुंबईवर झालेल्या २३ नोव्हेंबरच्या हल्ल्यांशी साधर्म्य सांगणारी ही घटना विविधांगांनी उलगडून पाहता येईल. खरं तर भारतीय संघच पाकिस्तान दौ-यावर जाणार होता...पण मुंबईवरील हल्ल्यांची घटना ताजी असतांना किंबहुना या हल्ल्याचा पाकिस्तानात कट शिजला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसं अनेक पुरावेही केंद्र सरकारनं पाकिस्तानला दिलेले आहे. पाकिस्तानंनही हे अतिरेकी आपल्याच देशातून भारतात आल्याचं कबुल केलंय. उशिरा का होईना त्यांना शहाणपण सूचलेले आहे.

या दौ-यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं नकार दिल्यानं हा दौरा वाया जाऊ नये म्हणून पाकिस्ताननं श्रीलंका संघास प्राचारण केलं. खरं तर या दौ-यावर जाण्यास अनेक श्रीलंकनं खेळाडूंची इच्छा नव्हती पण तत्कालीन निवड समिती अध्यक्ष अर्जुन रणतुंगा यांच्या आग्रहावरून श्रीलंकेका संघाला पाकिस्तान दौ-यावर जाणं भाग पाडलं. एकतर्फी निर्णयामुळं त्यांची नंतर हकालपट्टी झाली हा भाग वेगळा. पण पाकिस्तानातील असुरक्षित वातावरण तेथील अस्थिरता ही सर्वांना माहीती आहे. किंबहुना त्या देशात दिवसागणिक दहशतवाद्यांकडून हल्ल्या करण्याच्या,लोकांना ठार मारण्याच्या घटना घडत आहे. असं असुरक्षेचे वातावरण असतांनाही श्रीलंका संघ या दौ-यावर का आला हे न सुटणारेच कोडे आहे.

या खेळाडूंची निवासव्यवस्था आणि परिसरातल्या सुरक्षेबाबत नेहमीप्रमामे पाकिस्तान क्रिकेट मंडळ,संयोजक गाफील राहीले.....आणि शेवटी टार्गेट असलेल्या श्रीलंका संघावर हल्ला झाला. हल्ल्यात खेळाडूंचा जीव वाचला हे जरी खरे असलेतरी त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झालेला आहे. त्यांच्या जखमा भरून येऊ शकतात पण मनावर झालेला आघात कसा भरून निघणार हा खरा प्रश्न आहे...अडचणीत असलेल्यांना मदत करायला जावे आणि मदतीचे हे फळ मिळावे...अशीच काहीशी अवस्था श्रीलंका संघाची झाली होती.

पुढील काळात श्रीलंका संघ कुठल्याही दौ-यात आत्मविश्वासानं खेळेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय पाकिस्तान दौ-यावर जाण्यास आता कुठला संघ सहजपणे तयार होणार आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक दौ-याबाबत नेहमी प्रश्नचिन्हच राहील हे नक्की. या घटनेमुळं आगामी आयपीएल तसंच २०११ मद्ये उपसंखडात होणा-या विश्वकरंडक स्पर्धेसमोरही सुरक्षेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सुरक्षेचे नियोजन असेल तरच मानांकित खेळाडू यात सहभागी होऊ शकतात.

या घटनेमुळे अगोदरच अंतर्गत वाद आणि अस्वस्थेनं पोखरलेल्या पाकिस्तान संघाबद्दल चिड,घ्रृणा सर्वांच्याच मनात निर्माण होणं स्वभाविकच आहे. एवढंच नव्हे तर क्रिकेट नकाशातून पाकला गायब करण्याचं नियोजनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पातळीवर सुरु असल्याचं बोललं जात आहे.

पुढील काळात श्रीलंका संघ कुठल्याही दौ-यात आत्मविश्वासानं खेळेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय पाकिस्तान दौ-यावर जाण्यास आता कुठला संघ सहजपणे तयार होणार आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक दौ-याबाबत नेहमी प्रश्नचिन्हच राहील हे नक्की. या घटनेमुळं आगामी आयपीएल तसंच २०११ मद्ये उपसंखडात होणा-या विश्वकरंडक स्पर्धेसमोरही सुरक्षेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सुरक्षेचे नियोजन असेल तरच मानांकित खेळाडू यात सहभागी होऊ शकतात. या घटनेमुळे अगोदरच अंतर्गत वाद आणि अस्वस्थेनं पोखरलेल्या पाकिस्तान संघाबद्दल चिड,घ्रृणा सर्वांच्याच मनात निर्माण होणं स्वभाविकच आहे. एवढंच नव्हे तर क्रिकेट नकाशातून पाकला गायब करण्याचं नियोजनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पातळीवर सुरु असल्याचं बोललं जात आहे.

Monday, March 2, 2009

सलाम निसर्गकवीला


ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे....अशी भव्य कल्पना घेऊन मानवी कल्याणासाठी प्रार्थना करणारे,निसर्गाबरोबरच माणसाशी तादात्म्य पावलेले निसर्गकवी नामदेव धोंडो तथा ना.धो.महानोर.यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठाननं मानाचा जनस्थान पुरस्कार देऊन नुकतच सन्मानित केलं. त्याबद्दल प्रथम निसर्गकवीला सलाम

नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणजे एक सांस्कृतिक अधिष्ठानचं. या प्रतिष्ठानची धुरा याच क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तींच्या हातात असल्यानं तात्यानंतरही खरोखरच यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. आतापर्यत नारायण सुर्वे,मंगेश पाडगांवकर,विं.दा सारख्या अनेक नावाजलेल्या महनीय व्यक्तींची दखल प्रतिष्ठाननं घेत त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. या मांदीयाळीत यंदा पळखेडच्या एका शेतक-याला अर्थात महानोरांना स्थान मिळालं आणि जनस्थान पुरस्काराच्यारूपानं त्यांच्या कवितेच्या वहीत आणखी एका मोरपिसाला स्थान मिळालं. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

महानोरांनी आपल्या ओबडधोबड जीवनाला आकार देणा-यांत तात्याचं स्थान मोठे होते असं प्रामाणिकपणे नमूद करण्याबरोबरच रसिकांनी मला लिहीण्याचं भक्कम बळ दिलं असंही कबूल करून टाकलं. कवितेसारखीच बरड माळरानावर नवी सृष्टी नवी निर्मिती करण्यातला माझा आनंद सांगता येणार नाही असंही ते सांगतात. महानोराकडे मोठेपणा फार आहे. मराठी भाषा,आपली माती आणि मायबाप रसिकांच्याप्रती त्यांचे ओतप्रेत भरलेलं प्रेमही सर्वांनाच भावते. निसर्ग आणि शेतीच्या सहवासात एकदा की महानोर गेले की मग झालचं त्यांच्या एकाग्र चिंतनातून जन्माला येतो कवितेचा नवा विषय,आशय. या स्फुरण्यातूनच त्याची सहजपणे कविता होते. पुढे कधीतरी या कवितेला चाल लावली जाते आणि ते थेट गाण्याच्या माध्यमातून चित्रपटात झळकते. महानोरांच्या ओठावर रूळलेल्या अनेक कवीता,रचनांनी नाटक,चित्रपटांत स्थान मिळवले आहे...या निसर्गकविची महती वर्णावी तेवढी कमीच ....व्वा,अप्रतिम,लाजवाब,त्यांच्या कवितांना मिळणारी दाद म्हणजे वन्समोअर...यासारके शब्दही त्यांच्यासाठी अपुरे पडतात...रसिकांचे प्रेम आणि भावाचा भूकेला असलेल्या आणि नेहमी नवनर्मितीचा ध्यास घेतलेल्या या निसर्गकवीला आपण फक्त मानाचा मुजला, सलाम एवढेच करू शकतो.....

Friday, February 27, 2009

व-हाडकार रिअली ग्रेट


मला आठवत साधारणतः ते १९९४-९५ साल होतं. ७४ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन नाशिक इथं भरलं. मराठी,हिंदी चित्रपटसृष्टीत त्यावेळी नव्यानेच फॉर्मात असलेले अभिनेते नाना पाटेकर संमेलनाध्यक्ष होते...याच तीन दिवसीय संमेलनाच्या पहिल्या दिवशी व-हाडकर देशपांडेंना आपलं व-हाड निघालंय लंडनलाचा प्रयोग ठेवण्यात आला होता...

व-हाड निघालंयचा प्रयोग.. नाशिककरांसाठी एक मेजवानीच..म्हणूनच कडाक्यांच्या थंडीतही भालेकर हायस्कूलचं मैदान खच्चून भरलेलं....बबन्या,जानराव,बाप्पा यासारखे एक दोन नव्हे तर बावन्न पात्र त्यांनी सादर केलं. एकापेक्षा एक विनोदी पात्र त्यातील प्रसंगांना टाळ्या..शिट्यांची दाद तर मिळालीच पण व-हाडकरांनी संमेलनातच घडलेल्या ताज्या किस्सांचा आधार घेत आपल्याच नाट्य,चित्रपटसृष्टीतल्या नामवंतावर कोपरखळी केली, त्यांचेसारखेच हुबेहुब आवाज काढत हास्यांची कारंजे फुलवण्याबरोबरच सर्वांनाच अक्षरशः गडबडा लोळायला भाग पाडले...

या रात्रीच्या प्रयोगांचं वार्तांकन करण्यासाठी सकाळ पेपरचा प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळाली. सिंगल कॉलम बातमी साडेअकरालाच देऊन टाकल्यानं बातमी देण्याचं तसं टेन्शन नव्हतं. हा प्रयोग रात्री दिड दोनपर्यत चालला....उशिर झाल्याचं आहे तर मग व-हाडकरांना भेटून जाऊ असं मनाशी ठरवत मी सर्व निघून गेल्यानंतर त्यांच्या मेकअप रूममध्ये गेलो. तिथंही त्यांच्या चाहत्यांची गर्दी खच्चून भरलेली...कुणी त्यांचेबरोबर वैयक्तीक,फॅमिलीसह छायाचित्र काढण्यास,कुणी स्वाक्षरी घेण्यास,कुणी त्यांना आपल्या भेटीचा प्रसंग सांगण्यात व्यस्त होते...यापैकी लगेचच मला काहीही शक्य नसल्यानं मी एका कोप-यात बाजूला उभा होतो...

ब-याच वेळानं माझा नंबर लागला. बाळ बोल तुझं काय काम आहे...असं म्हणतं देशपांडेनी संवाद साधायला सुरवात केली...पत्रकारीतेत नवीनच एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर काय बोलावं, कसं बोलावं आणि काय विचारावं हेच सूचत नव्हतं...क्षणभर स्वतःला सावरलं आणि माझी ओळख करून देत काही नाही गप्पा मारायच्या एवढंच सांगितलं...एखादी व्यक्ती असती तर एवढ्या रात्री आणि गप्पा कशाला उद्या भेटू...बहुधा असंच उत्तर दिलं असतं...पण रात्री तीन-सव्वातीनलाही देशपांडेनी माझ्यासोबत गप्पा मारल्या, होय हे खरं आहे, अगदी खरं आहे. त्यांनी गप्पा मारल्या त्या तेवढ्याच फ्रेश मुडमध्ये, मेकअप,ड्रेस काढत देशपांडे...

माझ्या प्रत्येक प्रश्न काळजीपुर्वक ऐकत उत्तर देत होते....आईचे संस्कार,घडवण्यात असलेला कुटुंबाचा हातभार,शिक्षण,प्राध्यापक असल्यानं आलेले अनुभव...यासारख्या गप्पा झाल्या.नाट्याक्षेत्रातील त्यांचे अनुभव, प्रसंग निवडून तो सादर करण्याची हातोटी खरोखरच ग्रेट. एक शिक्षक म्हणून त्यांच्याकडं असलेला कॉन्फीडेन्स दखल घेण्यासारखाच...साडेतीनपर्यत गप्पाची ही मैफल रंगली...देशपांडे माझ्या एक-एक प्रश्नांना न थकता उत्तर देत होते...अखेर माझे प्रश्न संपले, मला मुलाखत आटोपती घ्यावी लागली.. पण देशपांडे थकले नाही....अजून काही विचारायचे राहून गेले आहे का...असल्यास जरूर विचारा...मी प्रश्नांच उत्तर जरूर देईल..असं म्हणणा-या व-हाडकार खरोखरच ग्रेट आहे....मला त्यांची प्रत्येक गोष्ट भावली...असा हा नाट्यवेडा कलावंत आपल्यातून सोडून गेल्याची हुरहूर सर्वांनाच लागली आहे...त्याच्या जाण्यानं जानराव,बबन्या,बाप्पा यासारखी गाजलेली पात्र मात्र पोरकी झाली हे नक्की...

मंत्र्याचा घरचा आहेर...पण आताच?

अदिवासी समाजाचे नेतृत्व करणा-या मंत्र्यांची संख्या मंत्रीमंडळात मोठी आहे. पण खरोखरच या समाजाचे प्रश्न शासनस्तरावर मांडण्यात हे मंत्रीमहोदय यशस्वी झाले आहे काय...याचं उत्तर इतर जातींपेक्षा याच समाजातील जनता व्यवस्थित देऊ शकतील. अदिवासी समाजाचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांनी राजीनामा देत आपणच या समाजाचे खरे कैवारी आहोत हे दाखवून दिले आहे. त्याचबरोबर इतरही मंत्री,आमदार राजीनामे देतील असं म्हटलं. खर पण पिचडांचा अपवाद वगळता इतर कुणीही राजीनामा दिलेला नाही. एवढेच नाही तर पिचड यांनी नाव उच्चारलेले माजी शिक्षण मंत्री आहे. वसंत पुरके यांनी पळकुटे धोरण स्विकारत. आपण राजीनामा दिलेला नाही. पिचडांना आपल्या राजीनाम्याचं जाहीर वक्तव्य करण्याचा अधिकार कुणी दिला असा प्रश्न उपस्थित केला आहे....एक मात्र नक्की की,अदिवासी समाजाचे मंत्री, आमदार आगामी काळातील लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच राजीनाम्याचे हे नाटक करत आहे.
सर्व जणांनी सरकारला दिलेली ही राजीनाम्याची धमकी म्हणजे घरचा आहेरच आहे असं बोललं जातं...पण त्यांना आताच का ही बुध्दी सुचली...स्वतःला अदिवासी समाजाचे कैवारी म्हणून घेणा-या या मंत्रीमहोदय,आमदारांना आताच का राजीनाम्याची बुध्दी सूचली याचा विचार जनतेनं करणं गरजेचे आहे.अदिवासी मंत्री असतांना पिचड यांनी अनेक महत्वपुर्ण योजना या समाजासाठी राबवल्या आहेत. त्यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले असलेतरी अदिवासी बांधवासाठी हे निर्णय योग्यच होते. शिक्षणमंत्री वसंत पुरके यांचा कार्यकाळ सुध्दा विविध निर्णयांनी गाजला.
मंत्री विजयकुमार गावीत सध्या मंत्रीपद भूषवत चांगली कामगिरी बजावत आहे. त्यांच्याही काळात विकासाच्या अनेक योजना राबवल्या जात आहे. अदिवासी बांधवाच्या प्रश्नांसाठी आमदारांनी विविध प्रश्न उपस्थित करून विधानसभेत आवाजही यापुर्वी उठवला आहे.हे सर्व जरी खरं असलं तरी या मंत्री महोदय, आमदारांना अदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या जागांवर इतरांची बेकायदेशीर नेमणूक झाल्याचा मुद्दा आताच का सूचला आहे.
दोन आठवड्यापुर्वी नाशिकमध्ये अदिवासी संमेलन झालं. या संमेलनात अदिवासी बांधवाच्या सर्वकष बाबींचा विचार करण्यात आला. या संमेलनास बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे लक्षात घेऊन मंत्रीमहोदय,आमदारांनी आपण समाजाच्या प्रश्नांसाठी प्रसंगी राजीनामे देऊ. असं सांगत गर्दीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला...हे सगळ खरं असलंतरी या मंत्री,आमदारांचे राजीनाम्याचे नाटक हे आगामी लोकसभा निवडणूकींत समाजबांधवांची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे...पिचड यांनी राजीनामा देऊन याकामी पुढाकार घेतला आहे पण इतरांनी अजून राजीनामे दिलेले नाही. या सर्वाना समाजाची खरी कदर असेल तर त्यांनी एकाचवेळी राजीनामे सादर करणे आवश्यक होते...पण त्यांच्यातरी आपआपसात मतभेद आहे. कुठल्याही मुद्यांवर एकमत नसल्याचं यानिमित्तानं उघड झाले आहे....

Thursday, February 19, 2009

किस्सा प्रेस कॉन्फरन्सचा....


बांद्रा इथलं हॉटेल ताज लँन्ड....निमित्त बीसीसीआय गुणगौरव सोहळा आणि न्युझीलंड दौ-यापुर्वीच्या पत्रकारपरिषदचं....समोर साक्षात कर्णधार माही अर्थात महेंद्रसिंह धोनी,प्रशिक्षक गॅरी कर्स्टन,एक दिवसीय सामन्याचे व्यवस्थापक निरंजन शहा आणि बीसीसीआयचे सचिव श्रीनिवासन.....सुरु होतो एकापाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार आणि स्वभाविकच पत्रकारांच्या उत्तरांना तोंड देतात ते फक्त माही आणि गॅरी...

न्युझीलंडमध्ये दाखल होण्यापुर्वीच न्युझीलंड संघावर भारत वर्चस्व राखेल का...श्रीलंका,इंग्लंडविरूध्दची विजयी परंपरा कायम राहील का...हवामानाशी जुळवुन घ्याल का...अठरा महिन्याचं कर्णधारपद कसे वाटले...हरभजनसिंगच्या संघातील समावेशानं संघास कितपत फायदा होईल.... यासारखे हलकेफुलके प्रश्न आणि तितकीच हास्यांची कारंजे फुलवणारी उत्तरे

दोन्ही बाजूंनी असा हा हसत खेळत प्रश्नोत्तराचा संवाद सुरु आणि मध्येच माही गॅरी आणि आपल्यातील संवाद बिघडलेय.दुरावा निर्माण झालाय...त्यांचा संघातील कामगिरीवर परिणाम होतोय...क्षणभर विचार करा असा प्रश्न अपेक्षित नसतांना एकदम विचारला गेला तर गॅरी,माहीची मनस्थिती काय झाली असेल....होय हे खरंय हा प्रश्न अनअपेक्षितपणे पत्रकार परिषदेत विचारला गेला....आणि इतके वेळ व्यवस्थित सुरु असलेल्या परिषदेत सर्वच गोंधळले...माहीबरोबरच शहा श्रीनिवासनही चक्रावून गेले...पण हजरजबाबी माहीनं स्वतःला सावरत उत्तर दिले गॅरीचे संघास उत्तम मार्गदर्शन लाभते, वेळोवेळी तो सर्वांशी चर्चा करतो,संघानं सध्या मिळवलेल्या यशात गॅरीचा मोठा वाटा आहे...यासारखे खरे माहीनं सांगत गॅरी आणि भारतीय संघात सलोख्याचे संबंध आहे हेच दाखवून दिले या प्रश्नांतून सावरतोय नाही तोच

यंदा जर्सी बदलण्याचं कारण काय,जर्सी बदल्यानं आतापर्यतच्या कर्णधाराला दौ-यात अपयशच आलेले आहे...आपलं...आपल्या दौ-याचं होणार काय...हा प्रश्न येऊन धडकला....आता जर्सी बदलली आहेच मग बघू दौराच काय होते ते...हे उत्तर देत धोनीनं वेळ मारून नेली. या दोन्ही हजरजबाबी उत्तरानं माहीचं कौतुक करावं तेवढ थोडच आहे

Tuesday, February 17, 2009

राष्ट्रकुलसाठी भरीव तरतूद

स्पर्धपैकी एक असलेली मानाची स्पर्धा म्हणून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ओळखली जाते. ही स्पर्धा पुढील वर्षी दिल्लीत होत आहे. या स्पर्धेसाठी केंद्र सरकार अर्थसंकल्पात किती आर्थीक तरतूद करते. याबद्दल क्रीडाक्षेत्रात उत्सुकता होती. काल सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारनं ९६४.४२ कोटींची तरतूद केली आहे. या तरतूदीत स्टेडियम्सचे नूतनीकरण,खेळाडूंचे प्रशिक्षण, क्रीडांगणांची डागडुजी अशा काही कामांचा समावेश आहे. एक मात्र नक्की की या तरतूदीमुळं दिल्लीत क्रीडाक्षेत्र वाढीसाठी पुरक ठरतील अशा कायमस्वरूपाच्या सुविधा उभ्या राहण्यास मदत होणार आहे.
विविध क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचं काम जवळपास एक वर्षापासून विविध पातळीवर सुरु झाले आहे.संयोजक दिल्लीकर सध्या याच कामात जास्त व्यस्त असल्याचं दिसून येते. दिल्लीवर जबाबदारी असल्यानं खेळापासून तर आदरातिथ्यापर्यत सर्वच पातळीवर आपण कमी पडणार नाही. याची काळजी ते घेतांना दिसत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वच पक्षांनी एकजूट दाखवलेली दिसते.
आपली स्पर्धा असल्यांन त्यात कुठलीच कसर राहता कामा नये हाच प्रत्येकाचा हेतू आहे. त्यामुळंच स्पर्धानिधीला तरतूदीला कुणाचाही विरोध दिसला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या९६४.४२ कोंटीच्या भरीव तरतूदीशिवाय क्रीडा व युवक कल्याणसाठीचा निधीही वाढवण्यात आला आहे. हा निधी गेल्या वर्षी१५९३ कोटी रूपये होता. ती रक्कम आता १७६४ रूपयांच्या घरात गेली आहे. ही देखील चांगली बाब आहे. राष्ट्रकुलच्या रक्कमेतील६०० कोटी रूपये भारतीय क्रीडा प्राधिकरणाला स्टेडियमच्या नुतनीकरणासाठी तर शंभर कोटी रूपये संघाच्या तयारीसाठी देण्यात आले आहे. यात स्टेडियमचे अत्याधुनिकरण करण्याबरोबरच संघास प्रोत्साहन दिले आहे असं म्हणता येईल.
स्टेडियम तर अत्याधुनिक होईल पण आतील क्रीडांगणही मैदानही तितकेच सुसज्ज असायला हवे यासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. हे सर्व राजकीय सपोर्ट मिळाल्याशिवाय करणं शक्य नाही. अर्थात दिल्लीकरांचा त्यासाठी खरोखरच खूप सपोर्ट मिळत आहे. दिल्लीकर आता आठ ते नऊ महिन्याचा कालावधी राहिला आहे... कीप इट अप...

Friday, February 13, 2009

सरांचा दे धक्का....


शिवसेना कार्यकर्ता,नगरसेवक...आमदार...खासदार आणि देशातील मानाचे लोकसभेचे सभापतीपद भूषवण्याची संधी मिळालेले शिवसेना जेष्ठ नेते मनोहर जोशी. शिवसेनेंतच नव्हे तर सर्वांनाच सर म्हणून परिचित असलेल्या सरांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचं जाहीर करत सर्वांनाच दे धक्का दिला आहे.
वक्तृत्वशैली, संघटनकौशल्य, नियोजनबध्द काम आणि शिस्त,संयम आणि शांततेला प्राधान्य देणारे नेते म्हणून ते परिचित आहे. त्यामुळंच बाळासाहेबांच्या निवडक जवळच्या सहका-यांमध्ये जोशीसरांचा नंबर तसा वरचाच. शिवसेनेत बाळासाहेबाचा शब्द हा अंतिम असतो. जोशी सर देखील या अंतिम शब्दाचे प्रामाणिकपणे पालन करतांना नेहमीच दिसतात. अंतर्गत राजकारण,डावपेच तर त्यांना मूळीच पसंत नाही.
कार्यकर्ता हा तळागाळात काम करणारा आणि दिलेल्या कामाशी प्रामाणिकच हवा असं त्यांना मनोमन वाटते. पक्षात त्याचदृष्टीनं तसाच कार्यकर्ता घडवण्यावर त्यांचा भर दिसतो. असे हे सर सध्या त्यांच्या निवडणूकीच्या मुद्यांन चांगलेच चर्चेत आले आहे. सरांना तिकीट मिळणार यात शंकाच नाही. त्यादृष्टीनं कार्यकर्त्यांपासून तर अगदी नातलगापर्यत सर्वांनीच तयारी सुरु केलेली होती.
जोशी सर कुठून निवडणूक लढवता हा प्रश्न किरकोळ होता. पण दोन दिवसांपुर्वी सरांनी अचानक आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. आणि सर्वानांच आश्चर्यांचा धक्का दिला. सर निवडणूक लढवणार आणि आतापर्यतचे सर्व रेकॉर्ड मोडून प्रचंड मतांनी विजयी होणार यात शंका नाही. त्यादृष्टीनंच सर्व नियोजन झालेलं होते. मात्र सरांच्या या निर्णयानं मिडीयावले अचंबित झाले. सर असा निर्णय घेतील अस कुणालाही वाटलं नव्हते
.....युतीतील त्यातही दिल्लीतील राजकारणाची योग्य माहीती असणारे ते एक जबाबदार नेते म्हणून परिचित आहे. त्यामुळं सरांवर सभांतील प्रमुख वक्ते आणि सभा नियोजनांची जबाबदारी त्यांचेवर टाकण्याची शक्यता वर्तवली जातेय विशेषतः मुंबईच्या सभांचा प्रमुख भार त्यांचेवर असेल...आघाडी सरकारच्या अपयशाचा पाढा जनतेसमोर मांडणं. तसंच केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी हातभार लावण्याचं ध्येय असेल. याशिवाय राज्यात युतीचा भगवा फडकावण्याचं आवाहनंही त्यांचेसमोर असेल. त्यादृष्टीनं त्यांना सुत्रबध्द नियोजन करावं लागेल.