Tuesday, January 6, 2015

आशयघन,संस्कृतीपुरक नाट्यनिर्मितीचा अविष्कार,रंगभूमी बदलतेय

                                  
"ती फुलराणी', "नातीगोती', "चार दिवस प्रेमाचे', "झुलवा', "रणांगण', "एक झुंज' यांसारख्या मराठी आणि नव्यानेच सादरीकरण झालेल्या "गझब तेरी अदा'तील हिंदी नाट्यविष्काराद्वारे रसिकांच्या मनावर छाप पाडणारे दिग्दर्शक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक प्रा. वामन केंद्रे... सतत नावीन्याच्या शोधात आणि सापडलेल्या विषयांचे, कथांचे झोकून देऊन काम आणि सोनं करणारा मराठी माणूस. कलावंतांसाठी अडीचशेहून अधिक कार्यशाळा व प्रशिक्षण घेणारा हा माणूस वेगळ्या धाटणीतील विषय हाताळण्याच्या त्यांच्या शैलीमुळेच मराठीसह हिंदी नाटकांतही ते आता परिचित होत आहेत. आपलं थिएटर, रंगभूमी आणि देशीपण जगासमोर मांडण्याची वेळ आली आहे, असं त्यांना वाटतं. "सकाळ'शी दिलखुलासपणे संवाद साधताना त्यांनी विविध मुद्यांवर स्पष्टपणे मत मांडले.

श्रीकृष्ण कुलकर्णी
-------------------
नाटक हा एक सृजनांचा आविष्कार आहे. त्यातून आपली भाषा, कला व संस्कृतीची ओळख होते. प्रेक्षक ज्या वेळेस अशा नाट्याविष्कार, कलाकृती सादरीकरणाला मनसोक्त दाद देतात त्या वेळेस मिळणाऱ्या आनंदाची तुलनाच होऊ शकत नाही. मी पैशासाठी नव्हे, तर लोकांचे भावविश्‍व नाटकांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच नाटकासाठी विषय निवडल्यानंतर ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोचण्याच्या प्रवासात जीव ओतून झोकून देऊन काम करतो. त्यातूनच सर्वोत्कृष्ट कलाकृती निर्माण होण्यास मदत होते. केरळमध्ये मी इंडियन नेस, इंडियन नेशन या विषयांचे संशोधन करताना भारतीय विधी-परंपरा, लोकनाट्य, संस्कृती व आपला देशीपणा शोधण्याचा प्रयत्न केलाच नाही, तर तो आशय, विषय व संस्कृती नाटकात कशा पद्धतीने येईल यावर भर दिला. त्यामुळेच नाटकात वातावरण, गंध, दरवळ हे का असायला हवे, हे मला समजले आणि मी त्याचा जमेल त्या पद्धतीने नाट्य, कलाक्षेत्रात वापर करणार आहे.

* नाटक आशय, विषय अशा सर्वच बाबी बदलत आहेत. या परिस्थितीविषयी काय वाटते?
प्रा. वामन केंद्रे ः भारतातील नाट्यक्षेत्र, चळवळ आज खरोखरच वेगळ्या अंगाने जात आहे. प्रत्येक नाटकाचे विषय, कथा व आशय वेगळा आहे. प्रत्येक कलावंत, संस्था आपली वैविध्यता जपण्याचा प्रयत्न करताना दिसते. पूर्वीपासूनच ठराविक साच्यात नाट्यक्षेत्र कधीही अडकले नाही. वेगळे विषय हाताळण्याची क्षमता नाट्यसंस्था, कलावंतांत असून, ती सादरीकरणातही दिसते. दिग्दर्शनाबरोबरच नेपथ्य, वेशभूषा, पात्राला साजेसे संवाद आणि संगीत, दिग्दर्शनाकडे लक्ष ते देताना दिसतात. सध्या रसिक मनावर बिंबविले जातील असे विषय पुढे येत असून, ही चांगली बाब आहे.

* नाटकांमधून करिअर करू इच्छिणाऱ्या उदयोन्मुख कलावंत व संस्थांबद्दल "एनएसडी'चे धोरण कसे?
प्रा. केंद्रे ः "एनएसडी'मध्ये सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला उच्चतम प्रशिक्षण देऊन त्याला सर्वांगाने घडविणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. मात्र, केवळ देशभरातील 25-30 विद्यार्थांपुरतेच हे काम मर्यादित आहे. नाट्य, चित्रपट क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या उदयोन्मुख, हौशी कलावंत, संस्थांची संख्या वाढत असल्याने "एनएसडी'चे काम मर्यादित न राहता व्यापक बनले आहे. यादृष्टीने आम्ही विविध नव्या केंद्रांद्वारे त्या-त्या भागातील टॅलेंट शोधून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम आगामी काळात करणार आहोत. देशातील भाषांत नाट्य प्रशिक्षण, मार्गदर्शनाची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे.

* व्यावसायिक, प्रायोगिक नाटक हे आपापल्या ठिकाणी असले, तरी त्यांचे स्वरूप, वाटचालीला पूरक ठरते का?
प्रा. केंद्रे ः व्यावसायिक नाटकांनी रंगभूमीला वेगळा नावलौकिक, दर्जा मिळवून दिला आहे. ही फार मोठी उल्लेखनीय बाब (ऍचिव्हमेंट) म्हणता येईल. केवळ विनोदी, कौटुंबिक असे एकच विषय, आशय घेऊन सादरीकरण झाल्यास ते फार काळ तग धरू शकत नाही, पण आता व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांचे स्वरूप बदलत असून, नाट्यकलावंत, संस्था ज्वलंत विषयांना प्राधान्य देऊन सादरीकरण करताना दिसत आहेत. त्यामुळेच अशा नाट्याविष्कारांची राज्य, राष्ट्रीय व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड होऊन त्यांचा गौरव होताना दिसतो. नवीन प्रयोग गाजले पाहिजेत त्याशिवाय नाटकांवर चर्चा होणार कशी? चांगले नाट्याविष्कार रंगभूमीला पुढे नेतात. पूर्वी "वाडा चिरेबंदी', "घाशीराम कोतवाल', "महानिर्वाण', "रणांगण', "जांभूळ आख्यान', अशा कितीतरी नाटकांनी रंगभूमी गाजवली. "ती फुलराणी', "एक झुंज', "झुलवा'चा प्रत्येक प्रयोग वेगळा ठरला. व्यावसायिक, प्रायोगिक समांतर प्रयोगांद्वारे एक स्थान मराठी रंगभूमीला मिळवून दिले.

* प्रांत, भाषिक नाटकांचा वाढता विस्तार व त्याला लाभत असलेल्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल?
प्रा. केंद्रे ः आपण नाट्य, कला क्षेत्राचे वैश्‍विक रूप लक्षात घ्यायला हवे. शेवटी नाटक हे केवळ ठराविक वर्ग, प्रांतापुरते मर्यादित नको. प्रांत, भाषिक नाटकांची संख्या वाढलीच पाहिजे. एका भाषेची नाटके ही दुसऱ्या भाषेत आल्यास, त्यांचे सादरीकरण झाल्यास त्यात गैर काही नाही. या भाषांच्या देवाणघेवाणीमुळे रंगभूमी समृद्ध होण्यास मदत होईल. ही देवाणघेवाण जोपर्यंत होत नाही तोवर नाटक सर्वांगाने समृद्ध, विकसित झाले, असे म्हणता येणार नाही.

* तुम्ही करत असलेल्या नव्या निर्मितीबद्दल काही सांगा?
प्रा. केंद्रे ः मी नुकतेच "गझब तेरी अदा' हे हिंदी नाटक आणले. पहिल्या महायुद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकाला आदरांजली म्हणून हे नाटक केले आहे. "वुमेन अगेन्स्ट वॉर' अशी उत्तर हिंदुस्थानात गाजत असलेल्या बाबीचाही त्यात समावेश आहे. "मोहे पिया', "पिया बावरी' यांसारखे नाट्याविष्कारही दाद मिळविणारे ठरले आहेत.

-------------------



"एनएसडी'चे महाराष्ट्रात लवकरच केंद्र

 
वामन केंद्रे मुलाखत   (Word Count : 465   CC : 33  Page Baskets: Unicode_Test  Locations: -)

समवेत फोटो आहे....81451

"एनएसडी'चे महाराष्ट्रात लवकरच केंद्र
संचालक प्रा. केंद्रे यांची माहिती ः महोत्सव, कार्यशाळा, प्रशिक्षणातून सहभागाची संधी
श्रीकृष्ण कुलकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. 26 ः आज मनोरंजन "इंडस्ट्री' बनली असून, तिचे स्वरूप व्यापक होत चालले आहे. त्यामुळे प्रत्येक भाषेत तयार होणाऱ्या नाटक, सिनेमांची, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थी, उदयोन्मुख कलावंतांची संख्याही वाढत चालली आहे. या सर्वांना नाट्यांशी संबंधित एकाच ठिकाणी सादरीकरण, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा यांसारख्या घटकांबाबत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी)मध्ये प्रशिक्षण देणे अवघड बनत चालले आहे. त्या त्या विषयाचे प्रशिक्षण व अन्य बाबींचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी एनएसडीने पुढाकार घेतला असून, देशात बंगळूर, सिक्कीम व आगरतळा येथे केंद्रे सुरू केली आहेत. अजून दोन केंद्रे नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील पहिले केंद्र महाराष्ट्रात असेल, अशी माहिती प्रसिद्ध दिग्दर्शक व एनएसडीचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी "सकाळ'ला दिली.
"एनएसडी'च्या महोत्सवासाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रा. केंद्रे यांनी विविध मुद्द्यांवर "सकाळ'शी संवाद साधला. "एनएसडी' ही नाट्य, कला क्षेत्राशी निगडित असलेल्या जगातील प्रमुख संस्थांपैकी एक आहे. अशा संस्थेच्या संचालकपदी सन्मानाने मराठी माणसाची निवड होणे ही एक ऐतिहासिक घटना म्हणता येईल, असे नमूद करून प्रा. केंद्रे म्हणाले, की या निवडीमुळे मराठी मंडळींना आनंद होणे स्वाभाविक असून, माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. देशातील 25 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना तीन वर्षे सर्व प्रकारचे उत्तम प्रशिक्षण देतो. पण या 25 विद्यार्थ्यांच्या पलीकडे मोठे राष्ट्र आहे, हे विसरता येणार नाही. पूर्वी "एनएसडी'चे स्वरूप मर्यादित होते. त्या वेळेस रोजीरोटीचा प्रश्‍न होता मात्र मनोरंजन इंडस्ट्री बनल्याने हे स्वरूप भव्यदिव्य, व्यापक झाले आहे. या इंडस्ट्रीला खऱ्या अर्थाने नावारूपास आणण्याबरोबरच कलागुणांना वाव देण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण 25 विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित न ठेवता या क्षेत्रांकडे "करिअर' करू इच्छिणाऱ्यांसाठी "कनेक्‍शन इन्स्टिट्यूशन विथ द नेशन' ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार "एनएसडी' प्रयत्न करत आहे. बंगळूर, सिक्कीम आणि आगरतळा येथे केंद्र सुरू केले असून, लवकरच दोन केंद्रे कार्यरत होतील. त्यातील एक महाराष्ट्रात असेल. त्या त्या भाषेत स्थानिक उदयोन्मुख कलावंतांना प्रशिक्षण मिळावे, त्याची पाळेमुळे त्या त्या भाषेत रुजवावीत हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

गावागावापर्यंत पोचणार
ते म्हणाले, की "एनएसडी'चे काम गावापर्यत वैश्‍विकस्तरावर पोचविण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळेच या महिन्यात बारा महोत्सव आम्ही घेत असून, त्यातीलच एक नाशिकला होत आहे. जात, भाषा, प्रांताच्या पलीकडे नाटक, सिनेमा पोचला पाहिजे. या क्षेत्रातील उदयोन्मुख कलावंत, संस्थांना यानिमित्ताने पोचण्याचा "एनएसडी'चा प्रयत्न तर आहेच पण त्याहीपेक्षा नाटकांचे संहिता, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजनांसह नेमके सादरीकरण कसे असावे, या बाबींची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित प्रयोगांचे सादरीकरण होत आहे. आगामी काळात प्रशिक्षण, कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे.

चौकट
राज्य नाट्य स्पर्धा स्तुत्य उपक्रम
सांस्कृतिक संचालनालयातर्फे महाराष्ट्रात होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. नाट्यमहोत्सवाचे आयोजन करणारे देशात महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. ही एक सार्वत्रिक (युनिक) बाब असून, जगात अशा प्रकारचे कुठेच आयोजन केले जात नाही. चारशे ते साडेचारशे नाटकांचे सादरीकरण करणे हे मोठे आव्हान नाट्यसंस्था, कलावंत खंबीरपणे पार पाडत आहेत. अशाच नाटकांमधून चांगले दिग्गज कलावंत, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञान निर्माण झाले असून, त्यामुळे प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीस हातभार लागत असल्याचे केंद्रे यांनी नमूद केले.

Wednesday, March 6, 2013

दुष्काळामुळे खंडोबाचे स्नान टॅंकरने


येत्या सोमवारी अमावास्या आल्याने जेजुरीत खंडोबाची सोमवती यात्रा भरणार असून, दुपारी बारा वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. यंदा महाशिवरात्रीला जोडून सोमवती आल्याने जेजुरी दोन दिवस भाविकांच्या गर्दीने गजबजणार आहे.

सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास कऱ्हा नदीवर स्नानाचा कार्यक्रम होणार आहे. यंदा नाझरे धरणात पाणी अत्यल्प असल्याने उत्सवमूर्तींना टॅंकरच्या पाण्याने स्नान घालण्यात येणार आहे.

सोमवती यात्रेच्या तयारीसाठी देवसंस्थान व ग्रामस्थ मंडळाची बैठक झाली. त्या वेळी देवसंस्थानचे मुख्य विश्‍वस्त सुधीर गोडसे, खांदेकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे आदी उपस्थित होते.

सोमवती यात्रेवर दुष्काळाचा परिणाम जाणवण्याची शक्‍यता आहे. त्यात सोमवती स्नानाची मोठी समस्या असणार आहे. देवसंस्थानने भरउन्हात पालखी सोहळा असल्याने जागोजागी खांदेकऱ्यांसाठी सरबत व पिण्याच्या पाण्याची सोय केल्याचे गोडसे यांनी सांगितले. खांदेकऱ्यांना पायाला चटके बसू नयेत, म्हणून पालखी मार्गावर काही ठिकाणी पाण्याचा शिडकावा केला जाणार आहे.

तिरूपतीच्या हुंडीत पाचशे कोटी


देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान असे बिरुद मिरवणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या हुंडीत आगामी वर्षभरात भाविकांच्या दानशूर हातून तब्बल 859 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. तिरुपती भगवंताने मनोकामना पूर्ण केल्यानंतर भाविकांकडून सढळ हाताने हुंड्यांमध्ये गुप्तदान करण्याची प्रथा आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तिरुपती देवस्थानच्या अमाप उत्पन्नावर नुकताच प्रश्‍न उपस्थित केला होता. देशावर आणि आंध्र प्रदेशातील "आयटी' कंपन्यांवर मंदीचे सावट असताना तिरुपती देवस्थानाच्या हुंडीमध्ये गेल्या वर्षी तब्बल 731 कोटींचे दान पडले होते. त्यामुळेच देवस्थानाने 2013 मध्ये हुंडीदानातून सुमारे साडेआठशे कोटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
देवस्थानच्या प्रशासकीय मंडळाने अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. देवस्थानने यंदा दोन हजार 248 कोटींचा अर्थसंकल्प तयार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 258 कोटींची वाढ करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात देवस्थानचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. भाविकांकडून मुंडण झाल्यानंतर जमा होणारे केस आणि लड्डू प्रसादम या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश करण्यात आला आहे. देवस्थानला गेल्या वर्षभरात हंडीमधून 73 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले.
भाविकांमध्ये वाढता सामाजिक तणाव आणि अनिश्‍चिततेतून या निधीत वाढ होत असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षी विशेष दर्शनासाठी प्रतिभाविक तीनशे रुपये आकारण्यात आले. यातून 181 कोटींचा निधी जमा झाला होता. तोच निधी आगामी वर्षात 250 कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यातून देवस्थानला अधिक गतीने सामाजिक कामे करता येऊ शकतील, असा विश्‍वास देवस्थानाचे मुख्य पुजारी डॉ. ए. व्ही. रामना दीक्षितुलु यांनी व्यक्त केला.

"स्वीस'चे विशेष घड्याळ उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधत देवस्थानने जगविख्यात स्वीस कंपनीसोबत करार केला आहे. या कंपनीकडून तिरुमला तिरुपतीचे चित्र असलेली मर्यादित 333 आलिशान घड्याळे तयार करण्यात येणार आहेत. प्रतिघड्याळ 27 लाख रुपये किंमत निश्‍चित करण्यात आली असून, यातून देवस्थान निधी गोळा जमवणार आहे. 

गरीबांच्या बेटीला वाचवा

 उल्हासनगरमधील गरीब कुटुंबातील सात वर्षांच्या मुलीवर हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. शस्त्रक्रियेसाठी सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम उभी करणे या कुटुंबासाठी अशक्‍यप्राय बाब असल्याने या मुलीवरील शस्त्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते, सजग नागरिक आणि काही सामाजिक संस्था या चिमुरडीच्या मदतीसाठी पुढे आल्या असून, आतापर्यंत सुमारे एक लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. उर्वरित रक्कम उभारण्यासाठी नागरिकांनी साह्य करावे, असे आवाहन तिच्या आई-वडिलांनी केले आहे. 
उदरनिर्वाहासाठी भटकंती करून खुर्च्या रंगविण्याचे काम करणाऱ्या निळू थोरात आणि निर्मला थोरात यांच्या सात वर्षांच्या मयूरीची ही कहाणी आहे. ती टेट्रॉलॉजी ऑफ फॅलो या सायअनॉटिक कंजेनायटल हार्ट डिसीझने (जन्मजात हृदयाचा आजार) ग्रस्त आहे. तिच्यावर पुण्यातील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तातडीने हृदय शस्त्रक्रिया (इंट्रा कार्डिऍक रिपेअर ओपन हार्ट सर्जरी) करावी लागणार आहे. अंदाजे अडीच लाख रुपये खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रियेसाठी 9 फेब्रुवारी हा दिवस ठरला होता; मात्र तेवढी रक्कम जमविणे कठीण असल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती थोरात यांनी डॉक्‍टरांना केली. 

खारीचा वाटा 
मयूरीच्या आई-वडिलांची व्यथा मिलिंद मोरे आणि नंदा नांद्रकर या गायकांना आणि प्रफुल्ल केदारे, प्रकाश जाधव या सामाजिक कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी पुढाकार घेऊन मदत जमा करण्यासाठी संगीत मैफल आयोजित केली. साहित्यिक प्रा. विठ्ठल शिंदे यांनी 10 हजार रुपये आणि महापालिकेचे "बुलडोझर मॅन' युवराज भदाणे यांनी 5 हजार रुपये मदत दिली. मिलिंद सेळमकर, अण्णा रोकडे, राजू धावारे, प्रकाश थोरात, मुरलीधर शिर्के, जसवंत ढकोलिया, सरस्वती ऐवळे, प्रवीण वाघमारे यांनीही खारीचा वाटा उचलला. असे एकूण 40 हजार रुपये जमवून थोरात यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे सिद्धिविनायक ट्रस्टने 25 हजार रुपये, साईबाबा शिर्डी संस्थानने 25 हजार रुपये आणि ठाणे मेडिकल असोसिएशन यांनी 10 हजार रुपये असा मदतीचा हात दिला. अशा प्रकारे आतापर्यंत एक लाख रुपये जमा झाले असले, तरी आणखी दीड लाख रुपयांची गरज आहे. 

Thursday, October 25, 2012

निराधारांना सागर देतोय जिद्दीचे पंख!

अठरा वर्षे... शिक्षण बारावी... डोक्‍यावर छत नाही... खिशात फुटका पैसा नाही... पोटात अन्नाचा दाणा नाही...
असा हा अनाथ सागर रेड्डी अठरा वर्षांचा झाल्याने त्याला लोणावळ्यातील अनाथ आश्रमातून नियमानुसार मुक्त करण्यात आले. कपडेलत्ते आणि जग जिंकण्याची इच्छाशक्ती याशिवाय त्याच्याकडे काहीही नव्हते. आश्रमाचा दरवाजा कायमचा बंद झाला असला तरी जगण्याची लढाई लढण्याचे धडे तेथून मिळाल्याने आता काही करून दाखवायचे ही जिद्द पुरती त्यात भरली होती. या जोरावर इंजिनिअर झालेल्या सागरने अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्यांना जिद्दीचे पंख देण्यासाठी पुढाकार घेतला असून, एकता निराधार संघाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी धडपडत आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या सागर रेड्डीने पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सागर म्हणाला, ""मी अभियंता होण्याचे स्वप्न उरी बाळगले होते. जगण्याची जिद्द असल्याने रेल्वेस्थानक, बसस्थानक, हॉटेल, टपरीवर जेथे मिळेल तेथे त्याने काम केले. कित्येक दिवस वडापाववर काढावे लागले. मात्र त्याने लढण्याची इच्छाशक्ती अधिक भक्कम होत गेली. पण कधी कधी इच्छाशक्तीलाही पोटाचा पीळ आत्महत्येकडे खेचून न्यायचा. तीनदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. मिळालेल्या कामातून थोडीफार बचत करत कठीण परिस्थितीला सामोरे जात इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. यातच मला एल ऍण्ड टी कंपनीत प्लॅनिंग इंजिनिअरची नोकरी मिळाली. स्वप्न पूर्ण झाले तरीही मन समाधानी नव्हते. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेली. दर वर्षी सुमारे दोन लाख अनाथ मुलामुलींना आश्रमातून बाहेर काढले जाते. हे काय करत असतील, कसे जीवन जगत असतील हा प्रश्‍न माझ्या मनात सतत घोंघावत होता.''
सध्या सागर सत्तावीस वर्षांचा असून, निराधारांना आधार देण्यासाठी त्याने वाशी (मुंबई) फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन 12 मुले व तीन निराधार मुलींना दत्तक घेतले आहे. महाराष्ट्रातील 230 अठरा वर्षांपुढील निराधारांना वेगवेगळ्या माध्यमातून आधार देत आहे.
रागालाही रंग मिळाला...
सागर आश्रमशाळेवर रागावला होता. उमेदीच्या काळात आश्रमशाळेतून बाहेर काढल्याचा रोष त्याच्या मनात होता. मात्र व्यवस्थेने आखून दिल्यामुळे गरज असताना आश्रमशाळेतून बाहेर फेकल्या जाणाऱ्या तरुण-तरुणींची अवस्था काय होत असेल याची सागरला जाणीव होती. त्याने त्याच्या रागाचे जनहिताच्या रंगात रूपांतर केले असून, हीच जाणीव ठेवून अठरा वर्षांपुढच्या निराधारांचा शोध घेत त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करून शिक्षणासाठी मदत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 2008 मध्ये त्याने एकता निराधार संघाची स्थापना करून गरजू निराधार मुलामुलींचे सुयोग्य पुनर्वसन करण्याचा ध्यास घेतला आहे. निराधारांना मदतीसाठी आणि ज्यांना निराधारांना मदत करायची आहे अशांनी 9768117477 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सागर रेड्डी याने केले आहे.

Wednesday, March 7, 2012

किमयाची खरीच `किमया`...

आकुर्डी इथे राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबावर दोन दिवसांपूर्वी दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची दोन महिन्यांची चिमुरडी किमया त्यांना सोडून गेली. मात्र या किमयाने हे जग सोडताना एक किमया केली. किमयाचं नेत्रदान तिच्या आईवडिलांनी केलंय. २ जानेवारीला किमया या चिमुरडीचा कुलकर्णी कुटूंबात जन्म झाला. मात्र जन्मापासूनच किमया आजारी होती. तीन मार्चला किमयाने या जगाचा निरोप घेतला. किमयाला आयुष्य मिळालं अवघं दोन महिन्यांचं.. कुलकर्णी कुटूंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. मात्र या दुःखातूनही खंबीरपणे कुलकर्णींनी किमयाचं नेत्रदान कऱण्याचा निर्णय घेतला. तिचं अस्तित्व तिच्या डोळ्यांच्या माध्यमातून टिकून आहे.

पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी किमयाला निरोप दिला असला तरीही किमयाचे डोळे कोणाला तरी आनंदी जीवन देतील. किमयाची आत्या आपल्या दोन महिन्यांच्या बाळाचं नेत्रदान करणं हा कठीण निर्णय आहे. मात्र कुलकर्णी कुटूंबाच्या या निर्णयामुळे माणुसकीचा नवा आदर्श निर्माण झालाय.