पर्यावरण….हवामान,जलवायु,माती,वनस्पती यासारख्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व नैसर्गिक घटकांचा एकत्रित संगम होय,
असं म्हटलं तर वावगं ठरू नये. बदलते हवामान आणि सिमेंट
कॉंक्रीटीकरणाच्या वाढत्या जंगलामुळे विजेसह इतर खूप सारे आपल्या समोर प्रश्न उभे
राहिले आहे. अक्षय (सौर),पवन, रासायनिक,
यांत्रिक ऊर्जा, अणु, गुरुत्वाकर्षण, प्रकाश,
तेजस्वी, ध्वनी,
गति, औष्णिक आणि विद्युत यासारख्या
ऊर्जाप्रकारांद्वारे संचय करण्याचा प्रयत्न केंद्र-राज्य शासन,स्वायत्त,खाजगी
संस्था अशा विविधस्तरावर सुरु आहेत. केवळ संचय नाही तर दिर्घकालीन उपाययोजनां, नियोजनही होऊ लागले आहे. पर्यावरण
संवर्धन,रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अर्थ जर्नालिझम
नेटवर्क(इजीएन)ने कोल्हापूरमध्ये याच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या
संवादक,संपादकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा घेतली. तिन्ही दिवस ऊर्जाविषयावर सकारात्मक विचारमंथन होऊन
भविष्यात एकत्रित काम करण्याचा संकल्प करण्यात आला. याच अनोख्या कार्यशाळेविषयी.......प्रा.श्रीकृष्ण कुलकर्णी
----------------------------
पर्यावरण रक्षण,संवर्धन,हवामान बदलासारख्या
ज्वलंत विषयावर काम करणाऱ्या अनेक सरकारी,खाजगी संस्था, कार्यकर्ते भारतात कार्यरत
आहे. सर्वांगांने पर्यावरणाचा समतोल कसा साधला जाईल, यादृष्टीने सारेचजण
वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करत असतात. पण समाजात हवी त्याप्रमाणात
जनजागृती,प्रबोधन होतांना दिसत नाही, त्यामुळे पर्यावरण,ऊर्जा,हवामान यासारखे विषय
हे मर्यादित राहतात. आजच्या युगात पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या
ऱ्हासामुळे मानवी कृती जबाबदार ठरत असल्याचे काही उदाहरणांवरून आपल् लक्षात येते.
ऊर्जा संवर्धन,जलसंवर्धन,कचऱ्यांचे योग्य पध्दतीने
निस्तारण(विल्हेवाट),प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टींमुळे पर्यावरणाचा समतोल
चांगल्या पध्दतीन साधता येऊ शकतो. यासाठी अर्थ जर्नालिझम नेटवर्क(इजीएन) ने व्यापक
चर्चेसाठी हे तीनदिवसीय खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.
ऊर्जा,जलसंवर्धन अन् कचऱ्यांद्वारे बायोगॅस निर्मिती
प्रत्येक वर्षी २२ एप्रिलला पृथ्वी
दिन आपण साजरा करतो. या दिवशी पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी
विविध कार्यक्रम होतात. पण हे सर्व प्रबोधन,जनजागृती त्या दिवसापुरतीच मर्यादित
असते. वास्तविक पर्यावरण संरक्षण, संवर्धन हा व्यापक विषय असून ती प्रत्येकाची
जबाबदारी आहे. दैनंदिन जीवनातील विविध घटक,बाबींचा सुत्रबध्द पध्दतीने नियोजन
केल्यास याच छोट्या छोट्या बदलांद्वारे मोठे परिणाम,परिवर्तन होऊ शकते. या तीन
दिवसीय कार्यशाळेत याच क्षेत्रांतील तज्ञांनी विविध बाबींवर विशेष भर दिला.
पहिल्या दिवशी पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावंकर यांनी सर्व संवादक,संपादकाचे स्वागत
करत इजीएनची पर्यावरण व ऊर्जा क्षेत्रातील वाटचाल विषद केली. `इजीएन` ची भारताची जबाबदारी सांभाळणारे व्यवस्थापक जॉयदिप
सेन गुप्ता यांनी भारतातील अक्षय (रिन्युएबल एनर्जी) ऊर्जेची स्थिती आणि ग्रीन
हायड्रो प्रकल्पांवर आकडेवारीसह सविस्तर प्रकाशझोत टाकला.
हवामान बदलाचा कोकणावर मोठा परिणाम
पर्यावरण अभ्यासक लेखक सतिश कामत
यांनी हवामान बदलाचा कोकण परिसरावर होणारा परिणाम मांडला. या बदलामुळे पांरपारिक
शेती,व्यवसाय सोडून लोक पर्यटन,मत्स व पुरक उद्योगासारख्या अन्यत्र व्यवसायांकडे वळाले
आहे. त्याचप्रमाणे जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी कोकणात येणाऱ्या मोठ्या
प्रकल्पांना विरोध होत असल्याची कोकणवासियांची मानसिकता त्यांनी नमूद केली.
हवामान,पर्यावरण क्षेत्रात कामाची उभारणी करणारे सामाजिक कार्यकर्ते उदय गायकवाड
यांनी नव्या काळात हवामान बदल होत असतांना उर्जा टिकविण्याची आव्हाने मांडली.
दुसऱ्या दिवसाच्या सत्रात अणुउर्जा तज्ञ रमेश माथम यांनी अणूउर्जानिर्मिती ही
छोट्या स्वरूपाच्या प्रकल्पांसाठी कशापध्दतीने( स्मॉल मॉड्युलर रिअँक्टर) पुरक ठरू
शकते याबद्दल विश्लेषण केले.