Thursday, June 25, 2009

रबडी महात्म्य ढोली आणि ठेपला

वेळ पहाटे चार साडेचारची...ठिकाण अबू रोड अर्थात माऊंट अबू रेल्वेस्टेशन...रणकपूर एक्सप्रेस स्थानकावर थांबते आणि बाहेर एकच गोंधळ सुरु होतो...साहब ले लो अबू की फेमस रबडी...एक बार लेंगे तो बार बार मागोंगे..मुक्त मै घर ले जायेंगे...पसंद आयी तो दोन बार आयेंगे..अच्छी नही लगी तो दाम ले जावोंगे...यासारख्या विक्रेत्यांच्या घोषणांनी प्लॅटफार्म गजबजून जातो....कुल्लाहात असलेली रबडी...प्रत्येक बोगी आणि खिडकीजवळ जाऊन विक्रीचा त्यांचा सपाटा सुरु होतो...प्रवाशांना पटवून रबडीचा कुल्लाह त्यांच्या हातात देत पैसे घेतल्यानंतरच विक्रेत्याचं समाधान होते...एवढ्या पहाटेही विक्रीचा हा अनोखा फंडा लक्षात घ्यावा असाच वाटला...इंटरनॅशनल मिडीया कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्या राहणीमानाबरोबरच अस्सल खवैय्यगिरी जपणारेही अनेकजण पहायला मिळाले.
बारा पंधरा तासांच्या प्रवासानंतर अबू स्टेशनवर पहाटे उतरलेल्या कुठल्याही प्रवाशाला आपला थकवा दूर करण्यासाठी चहा प्यावासा वाटेल. त्यातही महाराष्ट्रीयन व्यक्ती असेल तर ती रबडीपेक्षा चहालाच अधिक प्राधान्य देईल. त्याप्रमाणे आम्ही चहा घ्यायचं ठरवलं. पण पहाटेची वेळ असूनही संपुर्ण स्टेशनवर आम्हाला कुठेच चहा मिळाली नाही. विक्रेत्यांकडे चहाबद्दल विचारणा केली तर ते तिरस्काराच्या भावनेनंच आमच्याकडे बघत.
काही विक्रेत्यांनी तर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत इतर ग्राहकांना रबडी देणं पसंत केल. स्टेशनवर सर्वत्र रबडी विकली जात होती. आमच्यापैकी काहींनी चाय नही तो रबडी सही...असं म्हणतं रबडी खायचं ठरवलं तर काहींनी रबडी आणि एवढ्या पहाटे असं म्हणतं खाण्यास नकार दिला. दहा रूपये देत रबडी घेत काहींनी स्वाद चाखायला सुरुवात केली. त्यांनी रबडी घेतल्यानंतरही विक्रेता समोर जाण्यास तयार नव्हता. तो आपल्या खास शैलीत रबडी महात्म्य सांगत इतरांना आग्रह करत होता. अखेर आम्हांलाही त्यानं रबडी घेण्यास भाग पाडले...आणि आम्ही पहाटेच्या वेळी चाखलेली रबडीची चव खरोखरच लक्षात रहावी अशीच होती...याबद्दल विक्रेता आणि सुरवातीस रबडी खाणाऱ्यां मित्रांचे आभार मानावे तेवढे थोडेच..त्यांचे चाय नही तो रबडी सही... हे वाक्यही माझ्या लक्षात राहिले.
पाच दिवसीय परिषद आटोपून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा प्रजापिता ईश्वरिय विश्वविद्यालयातर्फे आम्हाला मका चिवडा,शंकरपाळे पाकिट आणि काजू बर्फी ही ईश्वरीयभेट म्हणून देण्यात आली. या भेटीलाच ढोली अर्थात एकत्रित प्रसाद म्हणतात हे आम्हाला पाहिल्यांदा समजलं. सहभागी प्रतिनिधींना प्रवासात सहभोजनासाठी पुरी,खाकरा,बटाटा चिप्स आणि त्याजोडीला लोणच्याचे विविध प्रकार असलेले पाकिट देण्यात आले. या खानासुमारीला ठेपला असं म्हणतात. रबडीवगळता ढोली,ठेपला ही वाक्ये आमच्यासाठी नवीनच होती...या सर्व नव्या खाद्यपदार्थाचा परतीच्या प्रवासात आम्ही आस्वाद घेतला..या पदार्थाची चव ओठावर ठेवतच आम्ही घरी परतलो पण राज्य बदलल्यानंतर जात,धर्म,पंथ आणि खानपानही बदलते आणि ते कसं असू शकत याचा प्रत्यय आम्हाला राजस्थान जयपूर दौऱ्यादरम्यान आला...

Tuesday, June 23, 2009

ओमशांती...थिंक ओव्हर इट

मै एक आत्मा हु...ज्योती बिंदू स्वरूप आत्मा हु...आप के मस्तिष्क के बाजू मै ब्रुगटीके पास मेरा वास्तव है....हम सब परम् परमात्मा की संतान है...यासारखे काहीसे जड परंतु अध्यात्मिक शब्द कानावर पडले की,क्षणभर कुणालाही ही काय भानगड आहे. असंच वाटणं स्वभाविक आहे. पण ही भानगड वगैरे काही नाही, तर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होत असलेल्या भारतात अध्यात्मिक विचाराचा डोस(संदेश) देण्याचा एक प्रकार म्हणता येईल. एक अध्यात्मिक चळवळ म्हणून परिचित असलेल्या प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे माऊंटअबू राजस्थान इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी इनर इम्पावरमेंट आँफ मिडीया पर्सन ही राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेत ओम शांती....या वरील डोसची जणू अनुभूती आली.
जगात धर्म,जात,मुर्तीपूजा,पंथ वगैरे काही नाही. मनुष्य हा देखील फक्त निमित्तमात्रा आहे. तो जे काही काम करतो,चालतो,बोलतो,लिहितो,वाचतो या सर्व कृती त्यांच्या आत्म्याकडून होतात. आत्माच मनुष्याकडून सर्वकाही करून घेत असतो. असं सांगणारं हे विश्वविद्यालय. देशविदेशात आठशेहुन अधिक केंद्र आणि जवळपास आठ हजारांहुन अधिक बीके(ब्रम्हाकुमार,ब्रम्हाकुमारी)च्या माध्यमातून चालणारे काम सर्वांनाच थक्क करून सोडणारे आहेत. मला दुसऱ्यांदा या मिडीया कॉन्फरन्सला जाण्याची संधी मिळाली. त्यामुळं हे विश्वविद्यालय अधिक जवळून समजून घेता आलं.

यंदाच्या परिषदेसाठी प्रसारमाध्यमातल्या कर्मचाऱ्याचे अंतरिक सक्षक्तीकरण हा मुख्य विषय ठेवण्यात आला होता. त्याच अनुषंगाने विविध विषय चार दिवस चर्चेले गेले. त्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीची आत्मानुभूती, प्रतिनिधीची अधात्मिक ज्ञान, त्यातला सहभाग आणि अध्यात्मिक क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन, प्रसारमाध्यम क्षेत्रात यशस्वी होण्यासाठीची सुत्र,आनंद प्राप्तीसाठी परमेश्वराशी एकरूपता,जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अंतरिक शक्तीची आवश्यकता,सक्षम प्रसारमाध्यमे समाजासाठी प्रेरक,समय की पुकार या सारख्या विषयांचा समावेश होता. याशिवाय चारही दिवस पहाटे चार ते साडेपाच पर्यत विपश्यना,ध्यानधारणा होत असे. त्यानंतर साडेसहा ते साडेआठ यावेळेत राजयोगावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या चार दिवसीय परिषदेसाठी देशभरातून नावाजलेल्या प्रिंट,इलेक्ट्रानिक मिडीयाचे संपादक,वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. सहभागी वक्तेही संबंधीत विषयाचे तज्ञच होते. त्यामुळं प्रत्येक चर्चाही खुलेपणे आणि बारीकसारीक मुद्यांवर होत असे. पण सर्वच तज्ञ विश्वविद्यालयाशी संबंधीत असल्यानं चर्चेचा सूर हा विश्वविद्यालयांनं आखून दिलेल्या चौकटीत आणि प्रत्येक विषयात अध्यात्मिक टच दिलेला असल्याचे जाणवले.
पहिल्या दिवसाचा शानदार उद्घाटन सोहळा.समारोप समारंभही भव्यदिव्य असाच,त्यानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमानं परिषद संस्मरणीय झाली.परिषदेच्या निमित्तानं प्रतिनिधींना विश्वविद्यालयानं माऊंटअबूवरील नक्कीलेकसह त्यांच्या उपक्रमांपैकी गोल्बल हॉस्पिटल,पांडव भवन,युनिव्हर्सल हॉल,शांती भवन,म्युझियम,पिस पार्क दाखवले. वर्षभर रावबण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहीती दिली.
आरवली पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या आणि ब्रम्हाबाबांनी स्थापन केलेल्या या ईश्वरीय विश्वविद्यालयाचा उपक्रम निश्चितच चांगला आहे. दरवर्षी विविध क्षेत्रातल्या व्यक्तींनी एकत्र आणून त्यांच्या क्षेत्रातल्या बदलांची माहीती देण्याबरोबरच अध्यात्मिक टच देण्याचा प्रयत्न केला जातो. तिथलं निसर्गसौदर्य पाहण्याबरोबरच आदरातिथ्यापासून इतर सर्वचबाबतीतल्या नियोजनाचा इतरांनी आदर्श ध्यावा असाच आहे. हे जरी खरं असलंतरी मला परिषदेत खटकलेले काही मुद्दे अनुत्तरीतच राहिले. त्यात कुठलाही धर्म,जात,पंथ,मुर्तीपूजा न मानणाऱ्या या विश्वविद्यालयालयात प्रतिमापूजनाला स्थान आहे, जगात देव नाही आपला आत्मा सर्व काही करून घेतो , ब्रम्हदेवानं विश्वाची निर्मिती केली आहे म्हणून ब्रम्हा बाबा हेच परमपिता, श्रीकृष्णाने गीता सांगितली नाही,अर्जुनाचे अनुकरण स्वइच्छेवर, संत ज्ञानेश्वर,शंकराचार्यांनी ज्ञानोपदेश केला नाही यासारख्या मुद्यांचा समावेश आहे. प्रत्येक धर्माची शिकवण सदाचार,सत्य,अहिंसेची मग जगात धर्मच नसल्याचे विश्वविद्यालयाचे म्हणणे कितपत योग्य, जगभर पसरलेल्या विश्वविद्यालयाच्या कारभारासाठी आर्थिक मदत संयुक्त राष्ट्र संघासह इतरांकडून केली जाते. याशिवाय विश्वविद्यालयाच्या कार्यासाठी पुर्णवेळ वाहून घेतलेले बीके अर्थात ब्रदर्स अँन्ड सिस्टरर्स आहेत. त्यांच्याच माध्यमातून आज जगभर परमपिता ब्रम्हाबाबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला जात आहे....हे जरी खरं असलं तरी काही प्रश्न हे अनुत्तरितच राहतात. परिषदेदरम्यान मी संयोजकांशी या विषयावर चर्चा करण्याचा,शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.....विश्वविद्यालयाचा आठ दिवसांचा कोर्स करा मग तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआपच मिळतील...एवढंच सांगण्यात आलंय....अखेर हे अनुत्तरित प्रश्नच मनात ठेवून मी पुन्हा नाशिकला परतलो...

Tuesday, June 9, 2009

(टेबलटेनिसचे राष्ट्रीय खेळाडू व पंच कमलेश मेहता यांनी सकाळ साम टिव्हीला विशेष मुलाखत दिली. ही मुलाखत सकाळच्या सर्व आवृत्यांसह ई सकाळवर प्रसिध्दी झाली. माझ्या मित्रांना वाचनासाठी पुन्हा देत आहे....)
खेळाडू विकासासाठी क्रीडा धोरणाची योग्य अंमलबजावणी हवी
श्रीकृष्ण कुलकर्णी
मुंबई - दरवर्षी केंद्र, राज्य शासन क्रीडा विकास डोळ्यांसमोर ठेवून आपल्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करते. ही रक्कम मोठी असल्याने त्याच प्रमाणात घोषणाही केल्या जातात; पण या तरतुदीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी निश्‍चित केलेला निधी कितपत खर्च होतो की तसाच राहतो, हे कुणालाही समजत नाही. त्यासाठी शासकीय स्तरावर योग्य अंमलबजावणी व्हायला हवी. अशी अपेक्षा टेबलटेनिसचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक कमलेश मेहता यांनी व्यक्त केली. सध्या सर्वच खेळाडू विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. सरकारचे योग्य पाठबळही मिळायलाच हवे, असेही त्यांनी नमूद केले.


जलतरणपटू वीरधवल खाडे याने कर्नाटककडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर कमलेश मेहता यांची माटुंगा जिमखाना येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वीरधवलच्या निर्णयाबरोबरच इतर विषयावर 'साम मराठी'शी संवाद साधला. केंद्र, राज्य शासनाचे क्रीडा धोरण हे खेळाडू विकास डोळ्यांसमोर ठेवून व्हायला हवे. केवळ अंदाजपत्रकात भरीव तरतुदी करून भागणार नाही. तसेच योग्य तरतुदीबरोबरच अंमलबजावणी होण्यासाठीही नियोजन केले पाहिजे. आमच्या वेळी विशेष पुरस्कार वगैरे काही नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश नोंदविल्यानंतर कधी तरी सत्कार केला जाई. मला तर एकदाच रोख रक्कम मिळाली होती. आज सर्वच क्रीडा प्रकारांत नामवंत खेळाडू पुढे येत आहेत. आपल्या कामगिरीने महाराष्ट्राचा नावलौकिकही वाढविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत; पण त्यांच्या या कामगिरीच्या तुलनेत त्यांना देण्यात येणारी रक्कम इतर राज्यांच्या तुलनेत फार तुटपुंजी आहे. त्या बक्षिसांच्या रकमेत वाढ व्हायला हवी.समस्यांच्या गर्तेत खेळाडूते म्हणाले, "प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, क्रीडा संस्था, क्‍लबची संख्या वाढली आहे. या संस्था, क्‍लबकडे पुरेसे साहित्य नाही. खेळाडूही उपलब्ध होत नाहीत. संस्था, क्‍लबच्या स्तरावर चांगली वातावरणनिर्मिती होत आहे; पण महागडे क्रीडासाहित्य आणि संस्था, क्‍लबचे शुल्क देणे खेळाडूंना परवडत नाही, त्यामुळे काही खेळाडू स्वतंत्रपणे खेळण्यास प्राधान्य देतात. त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नाही. शासन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून या सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन खेळाडूंना उपलब्ध करून देऊ शकते. फक्त क्रीडा खात्याने कामाची मानसिकता बदलून खेळाडूंचा हुरूप वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.''शेवटी कौटुंबिक जबाबदारी महत्त्वाचीकुठलाही खेळाडू हा लहानपणापासून एखाद्या खेळाची निवड करून त्यात नैपुण्य मिळवतो, असे सांगत ते म्हणाले, बारा-पंधरा वयापर्यंत खेळल्यानंतर त्याला बक्षिसे मिळतात. तो प्रसिद्धीच्या झोतात कायम राहतो. त्यामुळे त्यांचा हुरूप जरूर वाढतो; मात्र सतरा-अठरा वर्षांनंतर त्यांना नोकरीचे वेध लागतात. कौटुंबिक जबाबदारी येऊन पडल्याने आपल्याला खेळांच्या माध्यमातून नोकरी मिळावी, असे त्यांना वाटते. यात चूकही काही नाही; पण त्यांना नोकरी मिळत नाही. आज एअर इंडिया, बॅंका, पोलिस, रेल्वेचा अपवाद वगळता इतर ठिकाणी खेळाडूला नोकरीची संधी नाही. सरकारी पातळीवर तर पूर्णपणे अनास्था आहे. सर्वच खेळाडूंना नव्हे; पण राष्ट्रीयस्तर गाजविणाऱ्या खेळाडूंच्या नोकरीचा प्रश्‍न मार्गी लावल्यास इतरही खेळाडू क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होण्यास मदत होईल, असे वाटते.


अपेक्षापूर्ती हवी, अपेक्षाभंग नको...सरावासाठी योग्य मैदान, चांगला खेळ होण्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शक, कुटुंब उदरनिर्वाहासाठी नोकरी, खेळाच्या आर्थिक मदतीसाठी प्रायोजक... अशा काही समस्या प्रत्येक खेळाडूंच्या आहेत. किंबहुना सर्वच खेळाडू हेच मुद्दे लक्षात घेऊन आपल्या खेळाची निवड करतात. चांगली कामगिरी बजावितात. त्यामुळे त्यांच्या क्‍लब, संस्था आणि शासनाकडून अपेक्षा वाढतात. आपल्या मागण्या क्‍लब, शासनाने ऐकूण घ्याव्यात. त्याप्रमाणे अंमलबजावणी करून आपल्याला चांगली मदत करावी, असं प्रत्येक खेळाडूला वाटते. खेळाडूंच्या अशा अपेक्षांची पूर्तीच व्हायला हवी. उगीचच पोकळ अश्‍वासने देऊन खेळाडूंचा अपेक्षाभंग करू नये, असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

Wednesday, June 3, 2009

दातृत्व आणि सचिन

आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हा उदात्त हेतू समोर ठेवून गरीब, पिडीतांसाठी मदत करणारे आणि कायम प्रकाशझोतात राहणाऱ्यांची संख्या मोठीच. मात्र गाजावाजा न करता इतरांना सतत मदत करणारी व्यक्ती म्हणजे आपला लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर.... त्यानं 'गिव्ह इंडिया' या संस्थेला गरीब, पिडीतांसाठी ७० हजार ७०० रूपयांची मदत केलीय. याशिवाय दोनशे अनाथ मुलांचा शिक्षण, पालनपोषणाचा खर्चही तो उचलणार आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं गिव्ह इंडिया ही संस्था गेल्या नऊ वर्षापासून काम करतेय. ही संस्था मुंबई,दिल्ली मॅरेथाँनचं यशस्वी नियोजन करते. तसंच त्यातून जमा होणारा निधी विविध स्वयंसेवी संस्थांना गरिब,पिडीत कुटुंबांसाठी उपलब्ध करून देते. गिव्ह इंडिया या संस्थेतर्फे यंदा२७सप्टेंबर ते तीन आँक्टोबर या कालावधीत देणगी द्या आणि आनंद मिळवा अर्थात जॉय आँफ गिव्हींग विक हा आठवडा पाळला जाणार आहे. या आठवडयात लहान मुलं,कुटुंब,पालक,पिडीतांना समोर ठेवून विविध कार्यक्रम होणार आहे.
सचिननं मदत देत या आठवड्यांची औपचारिक सुरवात केलीय. समाजात गरिब,पिडीत माणसांची संख्या मोठी आहे. पण त्यांच्यासाठी काम करणारे कमी आहेत. एक भारतीय नागरीक म्हणून इतरांसाठी मदत करणं हे आपलं कर्तव्यच असल्याचं त्यानं सांगितलं. इतरांना मदत करण्याची प्रेरणा आपल्याला वडील आणि पत्नी यांचेकडून मिळाली.असं सांगायला तो विसरला नाही.
वंचितांसाठी काम करायला वेळ कुणालाच नाही. पण सहानुभूती ठेवून अन्न,कप़डे,प्राथमिक उपचारांसाठी मदत आपण करू शकतो.असं अभिनेत्री नंदिता दास हिनं सांगत. वंचितांसाठी प्रत्येक व्यक्तींन मदत करून खारीचा वाटा उचलावा.असं आवाहन तिनं केलं.
मदत करण्याची इच्छा असूनही केवळ योग्य व्यासपीठ न मिळाल्यानं अनेकजण देणगी देणं टाळतात. याच लोकांना समोर ठेवून ना नफा ना तोटा या तत्वावर काम करणाऱ्या गिवनं इंडियानं वंचित,पिडीतांसाठी घेतलेला पुढाकार घेतलाय. देणगी द्या आणि आनंद घ्या...अशा घोषवाक्यांद्वारे संस्था पुढे आली. बघूया या संस्थाना दात्यांकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो

Monday, June 1, 2009

मंत्रिमहोदयाचे सर्व काही छंदासाठी.....

प्रत्येक माणसाला काहीतरी छंद असतो. याला मंत्री, खासदार तरी कसे अपवाद असतील... व्यक्तिमत्व आकर्षक दिसण्यासाठी चांगला पेहराव घालणं, खाणंपिणं, वाचन, पर्यटनाचा छंद जोपासणारे अनेक खासदार आहेत. प्रत्येकांची 'पसंत अपनी अपनी' असली तरी धावपळीच्या काळातही ते छंद जपतात. मंत्र्यांच्या या अजब छंदांवर टाकलेला एक दृष्टीक्षेप......
व्यक्ती मग ती कुठलीही असो, आपल्याला एखादा छंद जडला अथवा एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली तर ती पुर्ण करण्यासाठी धडपड करतात. अर्थात त्यातून मिळणारा आनंदही मोठाच असतो. खासदारांच्या आवडीनिवडी अशाच वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवलेले एस. एम. कृष्णा परराष्ट्रमंत्री झालेत. परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार आणि कपड्यांचं डिझाइन करणं याचा परस्परांशी काही संबंध आहे का? तर याचं उत्तर कृष्णा यांच्या बाबतीत निश्चीत -होय-असं आहे. कृष्णा यांना फावल्या वेळेत पुरुषांच्या कपड्याचं डीझाइन करण्याचा छंद आहे. अर्थात आता किती वेळ मिळतो हा प्रश्नच आहे. याशिवाय ते वाचनातही रमतात.
राष्ट्रवादीचे नेते,कॅबीनेट मंत्री शरद पवार यांना कार्यकर्ते आणि परिवारासोबत वेळ द्यायला जास्त आवडतं. क्रिकेटच्या गप्पा आणि क्रिकेट पाहण्यातही ते अनेकदा रमून जातात. त्यांचे विविध विषयांवरील वाचन दांडगे आहेत. याशिवाय संस्था आणि शेतीला भेट देऊन नवनवीन माहीती घ्यायला त्यांना आवडतं. आपला शाकाहारी आहारही ते जपतात.
कॉग्रेस कार्यकर्तापासनं राज्यपाल, कॅबीनेटमंत्रीपदापर्यतचा जेष्ठ नेते सुशिलकुमार शिंदेचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांना लिखानाची विशेष आवड आहे. काव्यवाचन करायलाही त्यांना आवडते. याशिवाय स्वतःनाटकात काम केलेले असल्यानं परिवारासोबत नाटक,चित्रपट पहायला त्यांना आवडते. क्रिकेट सामना पाहण्यास ते प्राधान्य देतात.
बंगालमध्ये डाव्यांना धूळ चारणाऱ्या रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांचं व्यक्तीमत्व धडाडीचं आहे. त्यांना गाणी गायला आवडतं.आपली आवड व्यक्तीगत असल्यानं इतरांना त्रास होणार नाही. याची काळजी त्या घेतात. भविष्यात त्यांना पुस्तक लिहिण्याची इच्छा आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं वाचन अफाट आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. फावल्या वेळेत आपल्या जिल्ह्यात जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. दैनंदिन कामातून थोडा वेळ परिवाराला देतात.जुने चित्रपट पहायला त्यांना आवडते. रूचकर शाकाहारी, मांसाहारी जेवणाची त्यांना विशेष आवड आहे.
कॉग्रेसच्या मुख्य फळीतले जेष्ठ नेते वीरप्पा मोईली हे तर, राजकारणी असूनही प्रतिभावंत लेखक आहे. कन्नड भाषेत त्यांनी रामायण महानिर्वाणम् हे महाकाव्य लिहिलंय. ४२हजार२९५ ओळींचं हे महाकाव्य कर्नाटकांत लोकप्रिय आहे. त्याचा इंग्रजी अनुवादही झालेला आहे.सध्या ते २०२०मध्ये महासत्ता होणारी भारताची अर्थव्यवस्था हा इंग्रजी ग्रंथ लिहीत आहेत.
गांधीवादी विचारसरणी माननारे कॉग्रेस नेते मुरली देवरा महाराष्ट्रात मुरलीभाई नावानं ओळखलं जातात. मितभाषी असलेले देवरा २५ वर्ष मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष होते. वेळेत काम पुर्ण करणे ही त्यांची खासियत, फावल्या वेळेत एखाद्या विषयाचं प्लॅनिंग करणं अथवा परिवाराला वेळ द्यायला त्यांना आवडतं.
स्वतंत्र कारभार सांभाणारे पृथ्वीराज चव्हाण लहानपणापासनं दिल्लीत. गांधी घराण्यांशी जवळीकतेचा फायदा झाला.परदेशात शिक्षण घेऊनही लहानपणापासूनं गावच्या मतदारांशी नाळ जोडलेला कार्यकर्ता म्हणून परिचित. वाचनांबरोबरच चविष्ट शाकाहारी पदार्थ खायला आवडते.
कार्पोरेट कल्चरशी जोडलेले,क्रिकेटवेडे प्रफुल्ल पटेल अत्यंत हुशार,देशविदेशातल्या उद्योजकांशी दांडगा संपर्क असलेले नेते आहेत. क्रिकेट सामना, चित्रपट, फॅशन शो पाहायला त्यांना आवडतं. उच्चविद्याविभूषित गुरुदास कामत परिवारांला सर्वाधिक वेळ देतात. कार्यकर्ते,मतदारांशी दांडगा संपर्क हे त्यांचं वैशिष्ठ. फावल्या वेळेत आगामी कार्यक्रमाचं नियोजन करायला त्यांना आवडतं. वसंतदादाच्या पुण्याईनं मंत्रीपद मिळालेले प्रतिक पाटीलयांना वाचन,टिव्ही पाहणं,कार्यकर्त्यांशी संवाद साधायला आवडते.वर्षातून दोन-तीनदा परिवारासोबत बाहेर फिरायला ते जातात. काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा त्यांचा उद्देश आहे
मागच्या सरकारच्या काळात माहीती प्रसारणमंत्री असलेले आनंद शर्मा फावल्या वेळेत क्रिकेट खेळतात. याशिवाय थोडा अधिक वेळ असेल तर हायकिंगला जाणे ते चूकवत नाही. तरूण वयात ते नियमित हायकिंगला जात मात्र व्यस्ततेमुळं सध्या त्यांना मुरड घालावी लागत आहे.

हॉकी खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी धनराजचा पुढाकार

सोमवार,०१ जून,२००९ (ई-सकाळसह महाराष्ट्रातल्या सकाळच्या सर्व आवृत्यांला प्रसिध्द झालेली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते धनराज पिल्ले यांची मुलाखत आणि त्यासंदर्भात वाचकांच्या प्रतिक्रीया...खास ब्लॉगच्या मित्रांसाठी)
क्रीडा
हॉकी खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी धनराजचा पुढाकार
श्रीकृष्ण कुलकर्णी
Sunday, May 31st, 2009 AT 10:05 PM
मुंबई - हॉकी खेळाने भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत आठ वेळा अजिंक्‍यपद मिळवून दिले. हॉकी संघाची ही संस्मरणीय कामगिरी कुणीही भारतीय विसरू शकत नाही; पण गेल्या काही दिवसांपासून हॉकी मागे पडली आहे, असे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेता धनराज पिल्ले याने मान्य केले. हॉकीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण हॉकी ऍकेडमी सुरू करणार आहोत. ऍकेडमीद्वारे खेळाडूंना मार्गदर्शन करून चांगले खेळाडू तयार करणार असल्याचे त्याने "साम मराठी'शी बोलताना सांगितले.

पनवेल येथे कालपासून राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठी धनराज पिल्ले आला होता. त्यावेळी त्याने विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकला पात्र झाला नाही. याबद्दल बोलताना तो म्हणाला, ""ऑलिम्पिकमध्ये संघ पात्र झाला नाही म्हणून संघाची कामगिरी खराब आहे, संघाची पीछेहाट होत आहे, असे म्हणणे मला मान्य नाही. गेल्या सात-आठ महिन्यांपासून संघाची कामगिरी सुधारत आहे. आता परदेशी प्रशिक्षक मिळाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ वाटचाल करीत आहे. याच कामगिरीच्या जोरावर संघ उद्या (1 जून) पासून होत असलेल्या कनिष्ठ हॉकी स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. मला दोन वेळा संघाबरोबर व्यवस्थापक म्हणून जाण्याची संधी मिळाली. माझ्या मार्गदर्शनाखाली सुलतान अझलम शहा हॉकी संघाने चांगली कामगिरी केली.''...म्हणून पुढाकार घेत आहे
सध्या हॉकी संघाची कामगिरी खालावत चालली आहे असे मान्य करीत तो म्हणाला, ""आपल्याकडे नावाजलेले खेळाडू नाहीत. त्याचप्रमाणे त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नाही. हे लक्षात घेऊनच हॉकीच्या प्रचार-प्रसारासाठी मी पुढाकार घेतला आहे. लवकरच हॉकी खेळाची स्वतंत्र ऍकेडमी सुरू करीत आहे. या ऍकेडमीद्वारे खेळाडूंना सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाईल.
''प्रसारमाध्यमांनी इतर खेळांकडे लक्ष द्यावे
तो म्हणाला, सर्व प्रसारमाध्यमे क्रिकेट खेळाला सर्वाधिक प्रसिद्धी देतात. क्रिकेटपटूंच्या प्रत्येक बारीक हालचालींना ठळक प्रसिद्धी दिली जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर दोन दिवसांपूर्वी रवाना झालेल्या भारतीय संघातल्या युवराज सिंगने बदललेल्या हेअरस्टाईलला सर्वांनी पसंती दिली. हे चुकीचे आहे. हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळालाही जास्त प्रसिद्धी द्यायला हवी. प्रसारमाध्यमांनी क्रिकेट, टेनिस, फुटबॉलबरोबरच इतर खेळांकडे लक्ष द्यावे, असे त्याने सुचविले. शासनाने खेळाडूंना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्याने एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. हॉकी महासंघाचे अध्यक्ष के. पी. गिल यांना मंडळावरून हटविले. त्यांच्याबद्दल बोलण्यासही त्याने नकार दिला.
हॉकीच मरते दम तक...
हॉकीची पीछेहाट आणि त्याविरुद्ध क्रिकेटची लोकप्रियता हे लक्षात घेऊन क्रिकेटला राष्ट्रीय खेळाची मान्यता द्यावी का, या प्रश्‍नाला उत्तर देताना तो म्हणाला, हॉकी हॉकी आहे, हॉकीची तुलना अन्य खेळांबरोबर करणे गैर वाटते. प्रत्येक खेळ आपापल्या ठिकाणी आहे. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असून मरते दम तक हा खेळच राष्ट्रीय खेळ राहील यात शंका नसल्याच त्याने नमूद केले.
वाचकांच्या प्रतिक्रिया
On June 01st 9:06 AM, ashok vayavare said:
indian hocky barobarch maharashtra team kade leksh dayave hi eacha, dhanraj chagle kam kara
On June 01st 8:06 AM, nanasahab katre said:
hocky match pahavi ti india-pak,india_germany ya team chi pan aata purvicha khal pahayala milat nahi,changle player tayar hove, hich eicha
On June 01st 8:06 AM, keshiv deo said:
chan dhanraj...changli indian team tayar kara, best of luck
On June 01st 8:06 AM, vaishali said:
dhanraj, changla nirnay, pan, tumi khup agaodar pude aane aapkshit hote...thik aahe aata changle kam kara
On June 01st 8:06 AM, vijay jagtap said:
dhanraj, tumi paisa, prasidhache khup pude gelea aahat, aata maharashtra hocky kade laksh daya vi vinayanti...
On June 01st 8:06 AM, damyanti said:
dhanraj, tu eter vadat padu nako.fakth changle player ghadav, speciallly maharashtra kade aadik laksh de...hich shunbhacha
On June 01st 8:06 AM, ramesh kale said:
हॉकीला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी धनराजचा पुढाकार चांगली गोष्ट आहे. पुन्हा हॉकी खेळ चुरशीचा पहायला मिळणार
On June 01st 8:06 AM, avinash jadhav said:
great dhanraj, aage bado,changle player ghadva, jai ho...