Friday, February 27, 2009

व-हाडकार रिअली ग्रेट


मला आठवत साधारणतः ते १९९४-९५ साल होतं. ७४ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन नाशिक इथं भरलं. मराठी,हिंदी चित्रपटसृष्टीत त्यावेळी नव्यानेच फॉर्मात असलेले अभिनेते नाना पाटेकर संमेलनाध्यक्ष होते...याच तीन दिवसीय संमेलनाच्या पहिल्या दिवशी व-हाडकर देशपांडेंना आपलं व-हाड निघालंय लंडनलाचा प्रयोग ठेवण्यात आला होता...

व-हाड निघालंयचा प्रयोग.. नाशिककरांसाठी एक मेजवानीच..म्हणूनच कडाक्यांच्या थंडीतही भालेकर हायस्कूलचं मैदान खच्चून भरलेलं....बबन्या,जानराव,बाप्पा यासारखे एक दोन नव्हे तर बावन्न पात्र त्यांनी सादर केलं. एकापेक्षा एक विनोदी पात्र त्यातील प्रसंगांना टाळ्या..शिट्यांची दाद तर मिळालीच पण व-हाडकरांनी संमेलनातच घडलेल्या ताज्या किस्सांचा आधार घेत आपल्याच नाट्य,चित्रपटसृष्टीतल्या नामवंतावर कोपरखळी केली, त्यांचेसारखेच हुबेहुब आवाज काढत हास्यांची कारंजे फुलवण्याबरोबरच सर्वांनाच अक्षरशः गडबडा लोळायला भाग पाडले...

या रात्रीच्या प्रयोगांचं वार्तांकन करण्यासाठी सकाळ पेपरचा प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळाली. सिंगल कॉलम बातमी साडेअकरालाच देऊन टाकल्यानं बातमी देण्याचं तसं टेन्शन नव्हतं. हा प्रयोग रात्री दिड दोनपर्यत चालला....उशिर झाल्याचं आहे तर मग व-हाडकरांना भेटून जाऊ असं मनाशी ठरवत मी सर्व निघून गेल्यानंतर त्यांच्या मेकअप रूममध्ये गेलो. तिथंही त्यांच्या चाहत्यांची गर्दी खच्चून भरलेली...कुणी त्यांचेबरोबर वैयक्तीक,फॅमिलीसह छायाचित्र काढण्यास,कुणी स्वाक्षरी घेण्यास,कुणी त्यांना आपल्या भेटीचा प्रसंग सांगण्यात व्यस्त होते...यापैकी लगेचच मला काहीही शक्य नसल्यानं मी एका कोप-यात बाजूला उभा होतो...

ब-याच वेळानं माझा नंबर लागला. बाळ बोल तुझं काय काम आहे...असं म्हणतं देशपांडेनी संवाद साधायला सुरवात केली...पत्रकारीतेत नवीनच एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर काय बोलावं, कसं बोलावं आणि काय विचारावं हेच सूचत नव्हतं...क्षणभर स्वतःला सावरलं आणि माझी ओळख करून देत काही नाही गप्पा मारायच्या एवढंच सांगितलं...एखादी व्यक्ती असती तर एवढ्या रात्री आणि गप्पा कशाला उद्या भेटू...बहुधा असंच उत्तर दिलं असतं...पण रात्री तीन-सव्वातीनलाही देशपांडेनी माझ्यासोबत गप्पा मारल्या, होय हे खरं आहे, अगदी खरं आहे. त्यांनी गप्पा मारल्या त्या तेवढ्याच फ्रेश मुडमध्ये, मेकअप,ड्रेस काढत देशपांडे...

माझ्या प्रत्येक प्रश्न काळजीपुर्वक ऐकत उत्तर देत होते....आईचे संस्कार,घडवण्यात असलेला कुटुंबाचा हातभार,शिक्षण,प्राध्यापक असल्यानं आलेले अनुभव...यासारख्या गप्पा झाल्या.नाट्याक्षेत्रातील त्यांचे अनुभव, प्रसंग निवडून तो सादर करण्याची हातोटी खरोखरच ग्रेट. एक शिक्षक म्हणून त्यांच्याकडं असलेला कॉन्फीडेन्स दखल घेण्यासारखाच...साडेतीनपर्यत गप्पाची ही मैफल रंगली...देशपांडे माझ्या एक-एक प्रश्नांना न थकता उत्तर देत होते...अखेर माझे प्रश्न संपले, मला मुलाखत आटोपती घ्यावी लागली.. पण देशपांडे थकले नाही....अजून काही विचारायचे राहून गेले आहे का...असल्यास जरूर विचारा...मी प्रश्नांच उत्तर जरूर देईल..असं म्हणणा-या व-हाडकार खरोखरच ग्रेट आहे....मला त्यांची प्रत्येक गोष्ट भावली...असा हा नाट्यवेडा कलावंत आपल्यातून सोडून गेल्याची हुरहूर सर्वांनाच लागली आहे...त्याच्या जाण्यानं जानराव,बबन्या,बाप्पा यासारखी गाजलेली पात्र मात्र पोरकी झाली हे नक्की...

मंत्र्याचा घरचा आहेर...पण आताच?

अदिवासी समाजाचे नेतृत्व करणा-या मंत्र्यांची संख्या मंत्रीमंडळात मोठी आहे. पण खरोखरच या समाजाचे प्रश्न शासनस्तरावर मांडण्यात हे मंत्रीमहोदय यशस्वी झाले आहे काय...याचं उत्तर इतर जातींपेक्षा याच समाजातील जनता व्यवस्थित देऊ शकतील. अदिवासी समाजाचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांनी राजीनामा देत आपणच या समाजाचे खरे कैवारी आहोत हे दाखवून दिले आहे. त्याचबरोबर इतरही मंत्री,आमदार राजीनामे देतील असं म्हटलं. खर पण पिचडांचा अपवाद वगळता इतर कुणीही राजीनामा दिलेला नाही. एवढेच नाही तर पिचड यांनी नाव उच्चारलेले माजी शिक्षण मंत्री आहे. वसंत पुरके यांनी पळकुटे धोरण स्विकारत. आपण राजीनामा दिलेला नाही. पिचडांना आपल्या राजीनाम्याचं जाहीर वक्तव्य करण्याचा अधिकार कुणी दिला असा प्रश्न उपस्थित केला आहे....एक मात्र नक्की की,अदिवासी समाजाचे मंत्री, आमदार आगामी काळातील लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच राजीनाम्याचे हे नाटक करत आहे.
सर्व जणांनी सरकारला दिलेली ही राजीनाम्याची धमकी म्हणजे घरचा आहेरच आहे असं बोललं जातं...पण त्यांना आताच का ही बुध्दी सुचली...स्वतःला अदिवासी समाजाचे कैवारी म्हणून घेणा-या या मंत्रीमहोदय,आमदारांना आताच का राजीनाम्याची बुध्दी सूचली याचा विचार जनतेनं करणं गरजेचे आहे.अदिवासी मंत्री असतांना पिचड यांनी अनेक महत्वपुर्ण योजना या समाजासाठी राबवल्या आहेत. त्यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले असलेतरी अदिवासी बांधवासाठी हे निर्णय योग्यच होते. शिक्षणमंत्री वसंत पुरके यांचा कार्यकाळ सुध्दा विविध निर्णयांनी गाजला.
मंत्री विजयकुमार गावीत सध्या मंत्रीपद भूषवत चांगली कामगिरी बजावत आहे. त्यांच्याही काळात विकासाच्या अनेक योजना राबवल्या जात आहे. अदिवासी बांधवाच्या प्रश्नांसाठी आमदारांनी विविध प्रश्न उपस्थित करून विधानसभेत आवाजही यापुर्वी उठवला आहे.हे सर्व जरी खरं असलं तरी या मंत्री महोदय, आमदारांना अदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या जागांवर इतरांची बेकायदेशीर नेमणूक झाल्याचा मुद्दा आताच का सूचला आहे.
दोन आठवड्यापुर्वी नाशिकमध्ये अदिवासी संमेलन झालं. या संमेलनात अदिवासी बांधवाच्या सर्वकष बाबींचा विचार करण्यात आला. या संमेलनास बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे लक्षात घेऊन मंत्रीमहोदय,आमदारांनी आपण समाजाच्या प्रश्नांसाठी प्रसंगी राजीनामे देऊ. असं सांगत गर्दीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला...हे सगळ खरं असलंतरी या मंत्री,आमदारांचे राजीनाम्याचे नाटक हे आगामी लोकसभा निवडणूकींत समाजबांधवांची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे...पिचड यांनी राजीनामा देऊन याकामी पुढाकार घेतला आहे पण इतरांनी अजून राजीनामे दिलेले नाही. या सर्वाना समाजाची खरी कदर असेल तर त्यांनी एकाचवेळी राजीनामे सादर करणे आवश्यक होते...पण त्यांच्यातरी आपआपसात मतभेद आहे. कुठल्याही मुद्यांवर एकमत नसल्याचं यानिमित्तानं उघड झाले आहे....

Thursday, February 19, 2009

किस्सा प्रेस कॉन्फरन्सचा....


बांद्रा इथलं हॉटेल ताज लँन्ड....निमित्त बीसीसीआय गुणगौरव सोहळा आणि न्युझीलंड दौ-यापुर्वीच्या पत्रकारपरिषदचं....समोर साक्षात कर्णधार माही अर्थात महेंद्रसिंह धोनी,प्रशिक्षक गॅरी कर्स्टन,एक दिवसीय सामन्याचे व्यवस्थापक निरंजन शहा आणि बीसीसीआयचे सचिव श्रीनिवासन.....सुरु होतो एकापाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार आणि स्वभाविकच पत्रकारांच्या उत्तरांना तोंड देतात ते फक्त माही आणि गॅरी...

न्युझीलंडमध्ये दाखल होण्यापुर्वीच न्युझीलंड संघावर भारत वर्चस्व राखेल का...श्रीलंका,इंग्लंडविरूध्दची विजयी परंपरा कायम राहील का...हवामानाशी जुळवुन घ्याल का...अठरा महिन्याचं कर्णधारपद कसे वाटले...हरभजनसिंगच्या संघातील समावेशानं संघास कितपत फायदा होईल.... यासारखे हलकेफुलके प्रश्न आणि तितकीच हास्यांची कारंजे फुलवणारी उत्तरे

दोन्ही बाजूंनी असा हा हसत खेळत प्रश्नोत्तराचा संवाद सुरु आणि मध्येच माही गॅरी आणि आपल्यातील संवाद बिघडलेय.दुरावा निर्माण झालाय...त्यांचा संघातील कामगिरीवर परिणाम होतोय...क्षणभर विचार करा असा प्रश्न अपेक्षित नसतांना एकदम विचारला गेला तर गॅरी,माहीची मनस्थिती काय झाली असेल....होय हे खरंय हा प्रश्न अनअपेक्षितपणे पत्रकार परिषदेत विचारला गेला....आणि इतके वेळ व्यवस्थित सुरु असलेल्या परिषदेत सर्वच गोंधळले...माहीबरोबरच शहा श्रीनिवासनही चक्रावून गेले...पण हजरजबाबी माहीनं स्वतःला सावरत उत्तर दिले गॅरीचे संघास उत्तम मार्गदर्शन लाभते, वेळोवेळी तो सर्वांशी चर्चा करतो,संघानं सध्या मिळवलेल्या यशात गॅरीचा मोठा वाटा आहे...यासारखे खरे माहीनं सांगत गॅरी आणि भारतीय संघात सलोख्याचे संबंध आहे हेच दाखवून दिले या प्रश्नांतून सावरतोय नाही तोच

यंदा जर्सी बदलण्याचं कारण काय,जर्सी बदल्यानं आतापर्यतच्या कर्णधाराला दौ-यात अपयशच आलेले आहे...आपलं...आपल्या दौ-याचं होणार काय...हा प्रश्न येऊन धडकला....आता जर्सी बदलली आहेच मग बघू दौराच काय होते ते...हे उत्तर देत धोनीनं वेळ मारून नेली. या दोन्ही हजरजबाबी उत्तरानं माहीचं कौतुक करावं तेवढ थोडच आहे

Tuesday, February 17, 2009

राष्ट्रकुलसाठी भरीव तरतूद

स्पर्धपैकी एक असलेली मानाची स्पर्धा म्हणून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ओळखली जाते. ही स्पर्धा पुढील वर्षी दिल्लीत होत आहे. या स्पर्धेसाठी केंद्र सरकार अर्थसंकल्पात किती आर्थीक तरतूद करते. याबद्दल क्रीडाक्षेत्रात उत्सुकता होती. काल सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारनं ९६४.४२ कोटींची तरतूद केली आहे. या तरतूदीत स्टेडियम्सचे नूतनीकरण,खेळाडूंचे प्रशिक्षण, क्रीडांगणांची डागडुजी अशा काही कामांचा समावेश आहे. एक मात्र नक्की की या तरतूदीमुळं दिल्लीत क्रीडाक्षेत्र वाढीसाठी पुरक ठरतील अशा कायमस्वरूपाच्या सुविधा उभ्या राहण्यास मदत होणार आहे.
विविध क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचं काम जवळपास एक वर्षापासून विविध पातळीवर सुरु झाले आहे.संयोजक दिल्लीकर सध्या याच कामात जास्त व्यस्त असल्याचं दिसून येते. दिल्लीवर जबाबदारी असल्यानं खेळापासून तर आदरातिथ्यापर्यत सर्वच पातळीवर आपण कमी पडणार नाही. याची काळजी ते घेतांना दिसत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वच पक्षांनी एकजूट दाखवलेली दिसते.
आपली स्पर्धा असल्यांन त्यात कुठलीच कसर राहता कामा नये हाच प्रत्येकाचा हेतू आहे. त्यामुळंच स्पर्धानिधीला तरतूदीला कुणाचाही विरोध दिसला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या९६४.४२ कोंटीच्या भरीव तरतूदीशिवाय क्रीडा व युवक कल्याणसाठीचा निधीही वाढवण्यात आला आहे. हा निधी गेल्या वर्षी१५९३ कोटी रूपये होता. ती रक्कम आता १७६४ रूपयांच्या घरात गेली आहे. ही देखील चांगली बाब आहे. राष्ट्रकुलच्या रक्कमेतील६०० कोटी रूपये भारतीय क्रीडा प्राधिकरणाला स्टेडियमच्या नुतनीकरणासाठी तर शंभर कोटी रूपये संघाच्या तयारीसाठी देण्यात आले आहे. यात स्टेडियमचे अत्याधुनिकरण करण्याबरोबरच संघास प्रोत्साहन दिले आहे असं म्हणता येईल.
स्टेडियम तर अत्याधुनिक होईल पण आतील क्रीडांगणही मैदानही तितकेच सुसज्ज असायला हवे यासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. हे सर्व राजकीय सपोर्ट मिळाल्याशिवाय करणं शक्य नाही. अर्थात दिल्लीकरांचा त्यासाठी खरोखरच खूप सपोर्ट मिळत आहे. दिल्लीकर आता आठ ते नऊ महिन्याचा कालावधी राहिला आहे... कीप इट अप...

Friday, February 13, 2009

सरांचा दे धक्का....


शिवसेना कार्यकर्ता,नगरसेवक...आमदार...खासदार आणि देशातील मानाचे लोकसभेचे सभापतीपद भूषवण्याची संधी मिळालेले शिवसेना जेष्ठ नेते मनोहर जोशी. शिवसेनेंतच नव्हे तर सर्वांनाच सर म्हणून परिचित असलेल्या सरांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचं जाहीर करत सर्वांनाच दे धक्का दिला आहे.
वक्तृत्वशैली, संघटनकौशल्य, नियोजनबध्द काम आणि शिस्त,संयम आणि शांततेला प्राधान्य देणारे नेते म्हणून ते परिचित आहे. त्यामुळंच बाळासाहेबांच्या निवडक जवळच्या सहका-यांमध्ये जोशीसरांचा नंबर तसा वरचाच. शिवसेनेत बाळासाहेबाचा शब्द हा अंतिम असतो. जोशी सर देखील या अंतिम शब्दाचे प्रामाणिकपणे पालन करतांना नेहमीच दिसतात. अंतर्गत राजकारण,डावपेच तर त्यांना मूळीच पसंत नाही.
कार्यकर्ता हा तळागाळात काम करणारा आणि दिलेल्या कामाशी प्रामाणिकच हवा असं त्यांना मनोमन वाटते. पक्षात त्याचदृष्टीनं तसाच कार्यकर्ता घडवण्यावर त्यांचा भर दिसतो. असे हे सर सध्या त्यांच्या निवडणूकीच्या मुद्यांन चांगलेच चर्चेत आले आहे. सरांना तिकीट मिळणार यात शंकाच नाही. त्यादृष्टीनं कार्यकर्त्यांपासून तर अगदी नातलगापर्यत सर्वांनीच तयारी सुरु केलेली होती.
जोशी सर कुठून निवडणूक लढवता हा प्रश्न किरकोळ होता. पण दोन दिवसांपुर्वी सरांनी अचानक आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. आणि सर्वानांच आश्चर्यांचा धक्का दिला. सर निवडणूक लढवणार आणि आतापर्यतचे सर्व रेकॉर्ड मोडून प्रचंड मतांनी विजयी होणार यात शंका नाही. त्यादृष्टीनंच सर्व नियोजन झालेलं होते. मात्र सरांच्या या निर्णयानं मिडीयावले अचंबित झाले. सर असा निर्णय घेतील अस कुणालाही वाटलं नव्हते
.....युतीतील त्यातही दिल्लीतील राजकारणाची योग्य माहीती असणारे ते एक जबाबदार नेते म्हणून परिचित आहे. त्यामुळं सरांवर सभांतील प्रमुख वक्ते आणि सभा नियोजनांची जबाबदारी त्यांचेवर टाकण्याची शक्यता वर्तवली जातेय विशेषतः मुंबईच्या सभांचा प्रमुख भार त्यांचेवर असेल...आघाडी सरकारच्या अपयशाचा पाढा जनतेसमोर मांडणं. तसंच केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी हातभार लावण्याचं ध्येय असेल. याशिवाय राज्यात युतीचा भगवा फडकावण्याचं आवाहनंही त्यांचेसमोर असेल. त्यादृष्टीनं त्यांना सुत्रबध्द नियोजन करावं लागेल.

दलबदलूंची चलती...

लोकसभा निवडणूकीची तारीख अद्याप निश्चित नाही. पण एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यादृष्टीनं कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस,भाजपा,शिवसेना,बसपा जनता दल अशा सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. पक्षाशी एकनिष्ठ असणा-या जेष्टांबरोबरच तरूणही पक्षाच्याच तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी पुढे येत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, नातेवाईकांच्या माध्यमातून तिकीट मिळवण्यासाठी संपर्क साधला जातोय. वशिला लावला जात आहे. काहींनी निवडणूकींचा चंग इतका बांधला आहे कि पक्षानं तिकीट न दिल्यास प्रसंगी इतर पक्षात जायचे, दुस-या पक्षानंही तिकीट नाकारलं तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचीच असा निश्चय मनाशी केला आहे. अशा दलबदलू कार्यकर्ते,इच्छुकांप्रमाणेच त्यांच्या पाठीराख्यांची तिच अवस्था झाली आहे.
पक्षाशी प्रामाणिक, एकनिष्ठ राहणा-या कार्यकर्ते, नेत्यांची संख्या कमी नाहीत. प्रत्येक पक्षात असे डझनभर नेते,कार्यकर्ते आपल्याला पहायलाही मिळतील. पण पक्षातील एकनिष्ठता,प्रामाणिकपणाचं हे सुत्र गेल्या काही वर्षापासून बदलत चालले आहे. पक्षांपेक्षा स्वतःची पद,प्रतिष्ठा जपणा-या पुढा-यांची संख्याच वाढू लागली ही स्थिती थोड्याफार प्रमाणात सर्वच पक्षात आहे. पक्षांनी भरमसाठ पद निर्माण केल्यानं गल्लोगल्ली नेते,संघटक,पुढारी झालेले आपल्याला दिसतात. वरची पदे मिळायला लागल्यानंतर निवडणूक लढवण्याविषयीच्या त्यांच्या अपेक्षांही वाढणं स्वभाविकच आहे. हे जरी खरं असलं तरी पक्षातील या युवा अथवा बरेचवर्ष काम करणा-यांचा त्रास जेष्ठांना होऊ लागला आहे.
आगामी निवडणूकीतसर्वच पक्षांनी यंगजनरेशनचा अर्थांत तरूणांना संधी देण्याचा राग आळवला आहे. पण त्यांमुळं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील जेष्ठ नेत्यांची मोठी गोची झाली आहे. तरूणांना संधी दिल्यास आपले काय होणार याबद्दल चिंता आहे. दुसरीकडं सर्वच पक्षात तिकीट वाटपावरून गोंधळ होणार हे नक्की आहे. त्यामुळे युवकांचीच नव्हे तर पक्षातील जेष्ठांची नाराजी पत्कारावी लागेल. त्यातून स्वभाविकच पुढे बंडखोरी होणेही शक्य आहे.
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बांशिंग बांधून इच्छुक असलेले उघडपणे बंडखोरीची भाषा करू लागले आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीनं ग्रासणार हे आता नक्की आहे. या अशा स्थितीमुळं सर्वाच मोठी अडचण ही संबंधीत नेत्यांला, पदाधिका-याला पाठींबा देणा-या पाठीराख्यांची होणार आहे. साहेब बाहेर पडतील आणि आपल्या बरोबर हजारो कार्यकर्ते आहे असं सांगत डांगोरा पिटतील. आणि मग त्यांचे पाठीराखेही स्वभाविकपणे म्हणतील.
केवळ साहेबांना(पदाधिकारी,नेत्याला) पक्षानं तिकीट नाकारलं म्हणून ते बाहेर पडले आणि त्यामुळं आम्हाला पक्षातून बाहेर पडणं गरजेचं होतं, अशा पाठीराख्यांची संबंधीत पक्षात काम करण्याची इच्छा असूनही केवळ साहेबांमुळं त्यांना बाहेर पडाव लागणार आहे....हे कार्यकर्ते,स्वयंसेवक स्वतः कधीच काही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच उठण्या-बसण्यापासून सर्व काही साहेबांवरच अवलंबून असते. सारखे एका पक्षातून दुस-या तिस-या पक्षात जाणा-यां, स्वयंघोषित दलबदलू पुढा-यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. त्यावर नियंत्रण ठेवणं पक्षाला शक्य नाही.
पण लोकांनी अशा दलबदलू नेत्यांला त्यांच्या कार्यकर्त्यांना किती जवळ करायचे, त्याला किती साथ द्यायची हे लोकसभेपुर्वीच निश्चीत करायला हवे. आपल्या भागासाठी अशा व्यक्ती, कार्यकर्त्यांचा काही उपयोग नसेल तर त्यांना निवडून देण्यापेक्षा दूर ठेवणेच योग्य वाटते...अखेर हा ज्यांचा-त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे हे नक्की...

Friday, February 6, 2009

देव तारी त्याला....


ठिकाण चर्चगेट रेल्वेस्टेशन....वेळ सकाळी साडेनऊ-दहाची...जिवाची मुंबई अर्थांत मुंबई फिरण्यासाठी औरंगाबादकडील एक जोडपं आपल्या दोन जुळया मुलींसह स्थानकावर उभे होते...कधीही लोकलचा प्रवास न केलेल्या या सुशिक्षित जोडप्यास आपल्या बोरीवली इथल्या नातेवाईकांकडं जायचे असल्यानं ते लोकलची वाट पहात होते... सकाळची वेळ असल्यानं रोजचीच तोबा गर्दी. गर्दी कशाला म्हणता याचा आणि गर्दीतील प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर वेस्टर्न साईटला जरूर जावे असे म्हणतात. अगदी तशीच परिस्थिती येते. हे जोडपं नवीन असल्यानं या भागाची फारशी काहीच माहीती नाही. त्यामुळं इकडं तिकडं चौकशी करून त्यांनी कसातरी प्लँटफॉर्म गाठला खरा पण तोही चूकीचा...त्यांना प्लँप्टफॉर्म संदर्भात चूकीची माहीती देण्यात आली होती. बोरीवलीकडं जाणारी नऊ अडोतीसची लोकल येण्याची उदघोषणा झाली...आपण चूकीच्या प्लॅटफार्मवर उभे आहोत. हे लक्षात आल्यानंतर जोडप्यांची एकच धांदल उडाली. तोबा गर्दीतून वाट काढत जुळ्या मुलींसह ते उभी असलेली गाडी पकडण्यासा जोडपे धावले. प्लॅटफाँर्मवर पोहचले जरूर...लोकलची सवयच नसलेल्या त्या महिलेनं एवढ्या गर्दीतून गाडीही पकडली...एक मुलगी तिच्याबरोबच चढली पण दुसरी मात्र खालीच राहिली....फास्ट लोकल असल्यानं लोकल वेग घेऊ लागली...तोबा गर्दीमुळं पतीला चढण्याची संधीच मिळाली नाही. ती महिला डब्यात चढलेली असल्यांन तिची मोठी पंचाईत झाली....एका मुलींला लोकलमध्ये आत सोडून दुस-या मुलींला घेण्यासाठी खाली उतरणं तिला शक्य नव्हतं...आई गाडीत बसल्यानं प्लॅटफार्मवर उभी असलेली ती मुलगी रडत रडत धावतच सुटली...गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या त्या महिलेनं बाहेर उडी घेण्याचा प्रयत्न केला....गर्दीतून बाहेर अंग झोकून देण्याचा प्रयत्न केला.....तिचं शरीर आत आणि पाय प्लॅप्टफॉर्मवर अशी परिस्थिती होतीर...एवढ्या गर्दीतून मुलींबरोबर धावणा-या तिच्या पतीनं हे दृश्य पाहिलं...त्यांन तिचं बाहेर असलेले हात पाय दोन्हीही आत जोरात ढकलून दिले आणि प्लॅटफॉर्म संपण्याच्या आत स्वतःलाही सावरलं..... चर्चगेट स्टेशनवरही पती आणि त्या दुस-या मुलींची गोंधळलेली स्थिती झाली होती. तिकीट,पर्स आणि मोबाईल, पैसे सर्वजण त्या माणसाकडंच असल्यानं त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. काहीच माहीती नसल्यानं चूकून पुरुषांच्या डब्यात शिरलेली ती महिला आणि तिची मुलगी दोघेही रडायला लागल्या..लोक त्या दोघींची समजूत काढत होते...कुठे जायचे...कुठून आल्यात यासारखी चौकशी करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते....एकापाठोपाठ एक स्टेशन जात होते पण त्या मायलेकीचं रडण काहीच थांबत नव्हते...बोरीवलीला जायचंय एवढेच सांगत त्या दोघीही रडतच होत्या...अखेर त्या गर्दीतील एका माणसानं पतीकडं मोबाईल आहे का..असल्यास नंबर सांगा असं म्हणत त्या महिलेची समजूत काढली...गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या त्या महिलेनं स्वतःला सावरत पतीचा मोबाईल नंबर त्याला व्यक्तीला सांगितला...त्या व्यक्तीनं तातडीनं तो मोबाईल लावत त्या महिलेचं आणि तिच्या पतीचं संभाषण करून दिलं...एकमेकांत बोलण झाल्यानं त्या दोघांनाही आधार वाटला...बोरिवली स्टेशनवर उतरून पोलिसांजवळ थांबण्याच ठरलं...पती आणि तिची दुसरी मुलगी हे दुस-या लोकलनं बोरीवलीला उतरले...तो माणूनस आपल्या पती आणि मुलींचा शोध घेऊ लागला...त्याला दोघीही एका पोलिसांजवळ उभ्या असलेल्या दिसल्या....त्या महिलेनं तातडीनं पतीला मिठी मारली...दुस-या मुलींला जवळ घेत कुरवाळले...आणि आपल्या बोरीवलीच्या नातेवाईकांना फोन करून त्यांनी बोलावून घेत मग त्यानंतर त्याच्याबरोबर घरी गेले.. मोबाईलद्वारे संपर्क करून देणारी ती व्यक्ती देवाच्याच रूपात आली असावी शिवाय देवामुळंच आपण वाचलो असं महिलेला वाटू लागलं. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी...याची अनुभूती या जोडप्याला रेल्वे प्रवासात आली. असे प्रसंग नेहमीच घडतात पण त्यावेळी संबंधीत व्यक्ती परिस्थितीनुसार किती दक्ष आणि आणि सामजस्य भूमिका घेते यावर बरेच काही अवलंबून असते....

रॉय निमित्तानं पुन्हा चर्चा शासन निर्णयाची


राज्यात सत्ता कुणाचीही असो, संबंधीत सत्ताधा-यांच्या कालावधीत घेतलेले निर्णय नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत राहतात. राज्यातील एखादा प्रश्न अथवा क्षुल्लक कारण देखील चर्चेसाठी पुरेसे ठरू शकते. राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि मुंबई बॉम्बस्फोटांच्या सुरक्षेच्या हलगर्जीपणामुळं पोलिस महासंचालक विरोधकांनी अनामी रॉय यांना जबाबदार धरत टिकेची झोड उठवली. एवढेच नव्हे तर नागपूर अधिवेशनातही रॉय यांचाच मुद्दा सर्वीधिक चर्चीला गेला. पुर्ण अधिवेशन संपले पण विरोधकांनी रॉय यांचेवर केलेल्या आरोपासंदर्भात कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळं विरोधक आणखीनच संतप्त झालेले होते.
पोलिस महासंचालकपदी अनामी रॉय यांची गेल्या वर्षी केलेल्या नियुक्तीवरून राज्य शासन पुन्हा अडचणीत आले आहे. किंबहुना त्यांना आता एक वर्षांनी का होईना आपला निर्णय बदलावा लागणार आहे. मुख्य न्यायमुर्ती स्वतंत्रकुमार आणि न्या. शरद बोबडे यांनी राज्यशासनानं विशेषतः गृहमंत्री आर.आर.पाटील यांचेवरही कडक शब्दात ताशेरे ओढले आहे. न्यायालयानं आपल्या निर्णयाला दोन आठवड्याची स्थिगिती दिली आहे. या कालावधीत सरकार आणि रॉय काय भूमिका घेतात. याकडं सर्वांच लक्ष लागलंय.
या दोघांनी सर्वीच्च न्यायालयात जाऊन स्थिगिती न मिळवल्यास रॉय यांना कदाचित पदावरून दूरही व्हावे लागेल. अधिका-यांची नियुक्ती गेल्या काही वर्षापासून चर्चेचा विषय बनली आहेत. आपल्या मर्जीप्रमाणं कृती करतील. किंबहुना आपल्याच तालावर नाचतील, आपली पाठराखण करतील अशाच अधिका-यांना मोठ्या पदावर संधी दिली जात असल्याचं सर्वश्रृत आहे. कारण महत्वाच्या पदावरील हे अधिकारी अडचणींच्या वेळेस आपल्या पाठीशी भक्कम उभे राहतील, आपल्याला सोडवू शकतात अशी मंत्र्यांची भावना असते. पण कधी कधी हेच अधिकारी सरकार,मंत्र्यांसाठी अडचणीचे ठरू शकतातहे देखील टाळता येत नाही.
पोलिस महासंचालकांच्या रेसमध्ये रॉय यांच्यासह एस.एस.विर्क, एस.चक्रवर्ती आणि जीवन वीरकर हे चार वरिष्ठ अधिकारी होते. या तिघांना डावलून रॉय यांची नियुक्ती केली. या नियुक्तीलाच चक्रवर्ती कॅटकडं आव्हानं दिलं होते. न्यायालयानं रॉय यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतल्यानं पुढील कारवाई काय होते याकडं सर्वांच लक्ष लागलय. दुसरीकडं शासनाचा हा निर्णयही वादग्रस्त बनलायं....

Thursday, February 5, 2009

सुरांची अठ्ठाऐंशी



पंडित भिमसेन जोशी...संगीतविश्वातील अनोखं नाव...अशा या स्वरभास्करानं ८८ व्या वर्षात पदार्पण केलं. आपल्या रागदरीच्या अनोख्या सुरांनी अवघ्या विश्वाला वेड लावणा-या पंडितजीच्या जीवनात दोन आनंददायी घटना घडल्या आहेत. एक दिड महिन्यापुर्वीच त्यांना शासनानं पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. त्यानंतर आता त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सारेगामा इं.लिमिटेड कंपनीनं पंडितजीच्या खूप जुन्या दुर्मिळ रेकॉर्ड चाहत्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
या गाण्याच्या निमित्तानं पंडितजींचा जुना खजिनाच हा चाहत्यांना मिळणार आहेत. पंडितजीची मैफल म्हणजे चाहत्यांसाठी एक मेजवाणीच असते. सुरु झालेल्या मैफलीचा समारोप होऊच नये. असंच प्रत्येक चाहत्याला वाटते. गाजलेल्या शास्त्रीय संगीतातील प्रत्येक रागदरींचा अविष्कार हा चाहत्यांना नेहमीच हवाहवासा वाटतो. त्यातही एखादे नवीन रेक़ॉ़र्ड असेल तर चाहते त्यांच्या कॅसेट घेण्यावर तुटुन पडतात. पंडितजींच्या कॅसेट हातोहात संपल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील.
पंडितजींच्या सुरवातीच्या काळातील सर्व शास्त्रय संगीताचे गायन एकत्र झाल्यामुळं रसिकांना हे संगीताचे वैचारिक धन उपलब्ध झाले आहे. प्रत्येक परिवारात या दुर्मिळ ध्यनीफिती हव्याच असं आग्रहानं सांगावास वाटते. पंडितजींनी गायलेली तुम रब साहेब....ही बंदीश सर्वात प्रथम ध्वनिमुद्रीत केली होती. ही बंदिश गाऊन त्यांनी रसिकांना भारावून टाकले होते. त्यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून श्रीनिवास जोशी यांनी तुम रब साहेब....आणि भैरवी रागातील फुलवन गेंद से मैला ना मारो मेरे राजा.... या दोन बंदिशी सादर करून आपले गुरु आणि पिता पंडितजींना अनोखा स्वरभेट दिलेली आहे. ही ध्वनिफित अनोख्या स्वरूपात रसिकांनासाठी उपलब्ध झाली आहे.
या सीडीत प्रामुख्याने पंडितजींच्या १९४६सालच्या पहिल्या रेकॉर्डिंगचा समावेश आहे. यात प्रत्येकी तीन मिनिटांच्या सहा बंदीशी आहेत. पंडितजी जेव्हा आपल्या गुरुकडे गाण्याचे शिक्षण घेत होते. त्यांच्या गायनावर गुरुंची छाप दिसते. यानंतरच्या पुढच्या काळात त्यांनी गायनात काय बदल केले. याचा अंदाज रसिकांना या सीडीमधून येऊ शकतो. पंडितजींच्या गायनाचे हे अनोखे दालन रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सारेगामा इ.लिमिटेडच्या सर्व कंपनीचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते...

Tuesday, February 3, 2009

कॉग्रेसनं आळवला यंग जनरेशनचा राग


कॉग्रेसनं आळवला यंग जनरेशनचा राग
लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच काँग्रेसनं राष्ट्रीय स्तरावर एकला चलो.....चं धोरण जाहीर केलंय. असं करून समाजवादी पक्षाला धक्का देतांनाच, पक्षानं तरूणाईचा रागही आळवलायं. कॉग्रेसनं युवा नेते राहुल गांधींना तरूणांचे आयकॉन म्हणून पुढे करायला पक्षानं सुरूवात केलीय.
आगामी निवडणूकीमध्ये पस्तीशीच्या आत असलेले सुमारे आठ टक्यांवरचे तरूण मतदार पुढचं सरकार निवडणार आहेत. या पार्श्वभूमीवर कॉग्रेसला तरूणांना आकर्षीत करत तीस टक्के जागा देण्याचं अश्वासन देणं भाग पडलयं. एकीकडं कॉग्रेस तरूणांना साद घालत आहे. तर दुसरीकडं अर्जुनसिंगासारखे ऐंशीतले जेष्ठ नेते खुर्ची अडवून आहे. त्यामुळं कॉग्रेसचीच नाही तर तरूणाईची गोची झाली आहे.
अर्जुनसिंगासह निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या जेष्ठांना समजवायचे कसे. त्यांची मनधरणी करायची कशी हाच कॉग्रेससमोरील मुख्य प्रश्न आहे. जेष्ठांना पक्षातील सन्मानाची पदे देण्याचं नियोजन कॉग्रेसनं केव्हाच सुरु केलंय. त्याप्रमाणं जेष्ठांवर जबाबदारीही सोपवली जात आहे. या विसंगत पार्श्वभूमीवर कॉग्रेसनं यंग जनरेशनचा राग आळवलाय. एकीकडे तरूण तुर्कांना साद घालतांना कॉग्रेसनं कोणत्याही घटकपक्षाबरोबर राष्ट्रीय पातळीवर समझोता न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय युपीएतल्या घटकपक्षांना दे धक्काच म्हणता येईल. समाजवादी पक्ष जागा वाटपाबाबत दबाव आणत आहे.
त्यापार्श्वभूमीवर कॉग्रेसनं एकला चलो...चं पाऊल उचलत घटक पक्षांसाठी सूचक इशारा दिला असल्याच मानलं जातंय. कॉग्रेस कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. हे कॉग्रेस दाखवू इच्छित असलीतरी, ज्या राज्यात कॉग्रेसची शक्ती क्षीण आहे. तिथं स्वबळावर लढण म्हणजे आत्मघात ठरेल. असा कयास राजकीय वर्तुळात वर्तवला जातोय.

साहेबांचा इलेक्शन मूड

साहेबांचा इलेक्शन मूड
एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणूका होणार हे आता स्पष्ट झालयं. त्यादृष्टीनंच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यानियोजनाला सरकारी कार्यालय तरी कसं अपवाद असू शकत. या कार्यालयाच्या स्तरावरही नियोजनाची धामधुम सुरु झाली आहे. आपल्या कार्यालयातून नेहमीच घरी लवकर जाणारे साहेब(कधी अर्धेसुट्टी घेऊन), सध्या एका फार मोठ्या कामात व्यस्त आहेतअर्थांतच त्यांचेवर ही जबाबदारी वरिष्ठांनी टाकलीआहे. साहेब(कुठल्याही व्यक्तीगत कामापासून ते आर्थिक देवाणघेवाणपर्यत सर्वच कामांचे उत्तम नियोजन करण्यात माहिर आहे.
आपल्यावर टाकलेली टाकलेली जबाबदारीही ते यशस्वीपणे पार पाडतात. साहेबाचं मार्गदर्शन आणि नियोजनांखाली झालेले अनेक कार्यक्रम उल्लेखनीय झाले आहे. याची दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीही नोंद घेत त्यांचं कौतुक केलय. साहेब सरकारी अधिका-यांच्या श्रेणीतही वरचे समजले जातात. आपण साहेब असल्यानं जिल्ह्याची जबाबदारी स्वभाविकपणे आपल्यावरच येणार आहे. हे त्यांना माहीत आहे. त्यामुळंच त्यांनी इलेक्शनची सर्वप्रकारची तयारी सुरु केली आहे.
दररोज अकरा बाराला कार्यालयात हजर होणारे साहेब आता नऊ-साडेनऊलाच कामावर हजर होतात, घरी जाण्याची पुर्वीची चार-साडेचारची वेळ आता त्यांनी बदलू टाकलीय. गेल्या आठ दहा दिवसांपासून ते रात्री साडेआठनंतरच घरी परतात. साहेबांचा मूड सध्या इलेक्शनचा असल्यानं त्यांच प्रतिबिंब त्यांच्या कामांत उमटतय हे खरं असलं तरी त्यांचा त्रास कर्मचा-यांना होऊ लागलाय. साहेब आता दररोजच लवकर कार्यालयात येतात आणि उशिरानं घरी जातात त्यामुळें साहेबांप्रमाणं नेहमीच कार्यालयात उशिरानं येणारे तसंच लवकर घरी जाणा-या कर्मचा-यांची चांगलीच गोची झाली आहे.
दैनंदिन कामाचा ताण तर वाढला आहेच पण त्याही कर्मचा-याचं अधिक शोषण होऊ लागलंय.शिस्तप्रिय असणा-या साहेबांनी केलेल इलेक्शनचं नियोजन फत्ते करण्याची जबाबदारी कर्मचा-यांची आहे. चांगल्या कामांनंतर खात्याचा पर्यायानं साहेबांचा गौरव होईल, पण कर्मचा-यांना काय, असा प्रश्न कार्यालयाच्या स्तरावर उपस्थित होऊ लागलाय, इलेक्शनपुर्वीच सरकारी कार्यालयातील या अतिरिक्त कामानं कर्मचारी हैराण झालेय....सरकारी नोकरी आणि साहेबांचा इलेक्शन मूड असल्यानं कामाची जबाबदारी कर्मचा-यांना टाळता येणार नाही हे मात्र नक्की...

फेल्प्स चर्चेत पण वेगळ्या....


फेल्प्स चर्चेत पण वेगळ्या....
बिजींग आँलिम्पिक स्पर्धेत सर्वीधिक आठ सुवर्ण पदकांची कमाई करणारा आणि जलतरणातील विक्रम आपल्याच नावे नोंदवणारा जलतरणपटू ओळखा कोण असेल तो...अर्थातच अमेरिकेचा मायकेल फेल्प्सस्....बिजींगमध्ये तेवीस वर्षीय फेल्पसनं कधी नव्हे एवढे जादुई चमत्कार घडवले. आपल्या कामगिरीद्वारे त्यानं जलतरणात एकाग्रता आणि संयम किती महत्वाचा आहे हेच जणू दाखवून दिले आहे. बिजींगस्पर्धेमुळं मायकेल फेल्प्स सर्वाधिक प्रकाशझोतात आला...एका सर्व्हेक्षणानुसार बिजींग स्पर्धेनंतर त्यांच्या केवळ अमेरिकनच नव्हे तर इतरही देशाच्या चाहत्यांच्या संख्येत कितीतरी पटीनं वाढ झाली आहे. दिवसागणिक चाहत्यांची ही संख्या वाढतच आहे. हाच अमेरिकेचा विश्वविक्रमी जलतरणपटू सध्या वादाच्या भोव-यात सापडलाय. न्युज आँफ द वल्र्ड या ब्रिटिश दैनिकात फेल्प्सन गांजासेवनाची नळी तोंडाला लावण्याचा छायाचित्र प्रसिध्द झालंय. त्यामुळं नामांकित खेळाडूंच्या मादकद्रव्य सेवनाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आपला परफाँरमन्स चांगला व्हावा यासाठी स्पर्धेपुर्वी, स्पर्धेदरम्यान मादक द्रव्य सेवन करणा-यां खेळाडूंची संख्या कमी नाही. अँथलेटिक्स,शरीरसौष्ठव या क्रीडाप्रकारांनी तर कमालच केली आहे. फेल्प्सला मैत्रीण नाही तसेच त्यानं कठोर मेहनत केली. त्यामुळं त्याला बिजींग आँलिम्पिकमध्ये घवघवीत यश संपादन करता आलंय. फेल्प्सच्या गांजा सेवनाच्या वृत्तानं पुन्हा एकदा क्रीडाक्षेत्रात खळबळ उडाली आहे. आपण गांजा सेवन केल्याची कबूली फेल्प्सनं दिलीय. माझे वर्तन खेदजनक होते आणि मी चूकीचे कृत्य केले. मी जलतरणात यश मिळविले असले, तरी माझे वर्तन वाईट झाले. लोकांना माझेकडून अशी अपेक्षा नाही...अशी प्रांजळ कबूली देत यापुढील काळात असं घडणार नाही असे वचनही त्यांन चाहते आणि लोकांना दिलेय...हे खरं असलं तरी गांजा सेवनामुळं फेल्प्सवर झालेली टिका भरून येणार आहे का असाही प्रश्नही उपस्थित होत आहे. याशिवाय केवळ वचन दिलं आणि पुढील काळात काही न सेवन करण्याची ग्वाही दिलं म्हणजे सर्व संपत का...असंही बोललं जात आहे. म्हणतात ना यशाचं शिखर गाठण्यासाठी खूप श्रम घ्यावे लागतात मात्र अपयश अथवा निंदा नालस्ती होण्यासाठी एखादी कारणही पुरेस ठरतं...अवघ्या तेवीस वर्षी जागतिकस्तरावर जलतरणात चमत्कार घडवणा-या फेल्प्सच्या बाबतीत वरील विधान तंतोतंत खरे ठरले असं म्हटल तर वावग ठरणार नाही....

गो हेड इंडिया....


दिल्ली टेनिसपटू युकी भांब्री यानं ज्युनिअर आँस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावून भारतीय टेनिसमध्ये नवा ठसा उमटवला आहे. या कामगिरीची ऐतिहासिक कामगिरी म्हणूनही भारतीयांना नोंद घेता येईल. याच स्पर्धेत मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा- महेश भूपतीनं यश नोंदवत भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. हा एक नवा इतिहासच रचला आहे असंही म्हणता येईल. भूपतीचे दुहेरी, मिश्रदुहेरीतील हे अकरावे ग्रँन्डस्लम आहे. या अकरापैकी सात विजेतेपद हे मिश्र दुहेरीतले आहे. त्यामुळं त्यांच्या कामगिरीचा आलेख निश्चीतच उंचावत आहे. दुसरीकडं दुखापत आणि इतर कारणांमुळं सानिया गेल्या काहि दिवसांपासून फार्मात नाही. तिला प्रत्येक सामन्यात अपयश येऊ लागले आहे.

वर्षाच्या सुरवातीलाच थेट ग्रँन्डस्लँम टेनिस स्पर्धेत महेशच्या साथीनं तीनं नोंदवलेले हे यश तिला पुढील कामगिरीसाठी निश्चीतच उभारी,प्रोत्साहन देणारं ठरेल असं वाटत. ग्रँन्ड स्लँमवर नाव कोरणारी ती पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे. पण भूपतीनं भारतीय टेनिसपटूच्या अर्थात सानियाच्या साथीनं नोंदवलेलं हे ग्रँन्ड स्लम प्रथमच होय. यापुर्वी महेश भूपतीला मार्क नोल्सच्या साथीनं खेळतांना पुरुष दुहेरीच्या अजिंक्यपदाने हुलकावणी दिली होती. पण मिश्र दुहेरीत त्यानं सानियाबरोबर जेतेपदाची ही संधी अचूक हेरली आणि तमाम टेनिसचाहत्यांना खुश केल.सानिया सुखावली आहे.

विशेषतः या तिघांच्या यशामुळं भारतीय टेनिसपटूच्या वाटचालींला नवी दिशा मिळण्यास ते पुरेसे ठरणार आहे. या तिघांच्याही खेळाचं वेगळे वैशिष्ठ आहे. त्यामुळं अप्रतिम, अफलातून यासारखे शब्द त्यांच्या खेळाचे वर्णन करतांना तोकडे पडतात. हे जरी खरे असले तरी भूपतीच्या वेगवान सर्व्हीसला सानियाच्या पॉवरफुल फोरहॅन्डच्या फटक्यांची उत्तम साथ लाभली हे लक्षात घेता येईल. सानियाला महेश बरोबरच्या सामन्यातून महत्वाच्या काही टिप्स मिळाल्या असतीलच. त्या तिला पुढील कामगिरीसाठी निश्चीत कामा येतील. एखाद्या टेनिसपटूनं सामना खेळतांना किती संयम राखला पाहिजे, संतुलन ढळू न देता किती आत्मविश्वासानं खेळले पाहिजे हे युंकी भ्रांब्रीच्या खेळानं दाखवून दिलं. संपुर्ण सामन्यात तो आत्मविश्वासानं खेळला. सेटमध्ये चूका झाल्या म्हणून आपले संतुलन ढळू न देता पुढील सेटमध्ये त्यावर मात करत त्यानं आपला खेळ सुधारण्यावर भर दिला. चांगला खेळ दाखवत संपुर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. ज्या नवोदित टेंनिसपटूंनी या तिघांचा सामना पाहण्याचा आनंद घेतला. त्याचेसाठी या सामन्यातून नक्कीच काही महत्वाच्या टिप्स मिळाल्या असतील असं म्हणता येईल....टेनिस हंगामाला सुरवात झाली आणि त्याबरोबरच युंकी,महेश आणि सानियानं भारतीयांना ग्रँन्डस्लँमच्या रूपानं अजिंक्यपद मिळवून दिलय.....

या यशाचं एकाच वाक्यात वर्णन करता येईल गो हेड इंडिया...गो हेड इंडिया....