Saturday, May 2, 2009

सिरियसली थिंक ओव्हर इट


पंधराव्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशात सरासरी ४० ते ५० टक्के मतदान झाले. मतदानास मिळालेल्या या अत्यल्प प्रतिसादासाठी वेगवेगळी कारणे दिली जात आहे. त्यात रखरखीत उन्हाचा चटका, सलग चार दिवस मिळालेली सुट्टी यासारख्या कारणांचा समावेश आहे. पण खरोखरच मतदारांनी या दोन कारणांमुळं मतदान करणं टाळलं असेल का? कि राजकीय पक्षाबद्दल आपली असलेली नाराजी निवडणूकीत मतदान न करता व्यक्त केली असेल. या मुद्यांचाही राजकीय पक्ष,केंद्र राज्य सरकार आणि निवडणूक आयोगानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे

पाच वर्षानी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीबद्दल सर्वानांच उत्सुकता असते. हे म्हणणं काहीस खरं असलंतरी ते आता मागे पडतांना दिसत आहे. यंदाच्या निवडणूकीपुर्वीही नेते,अभिनेत्यांनी जागो इंडियाची हाक देत किंबहुना तसं अभियान राबवत मतदान करण्याबद्दल समाजालगृती केली होती.विविध जाहिरातीच्या माध्यमातून राजकीय पक्षांनीही मतदान करण्याचं आव्हान केलं होतं मात्र त्याला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचं दिसते.

मतदारांची उत्सुकता नव्हे तर अनुत्सुकताच जास्त दिसून आली.मुलभूत प्रश्न सोडवण्यास सर्व पातळीवर अपयशी ठरत असलेलं सरकारचं धोरण राजकीय पक्षाबद्दलची अनास्था,लायक उमेदवार नसणं यासारखे काही मुद्देही विचार करायला लावणारे आहेत. यंदाच्या निवडणूकीत मुलभूत प्रश्नांबरोबरच देशात झालेले बॉम्बस्फोट,भ्रष्टाचार,जागतिक स्तरावरील मंदी हे मुद्दे राजकीय पक्षांनी प्रचारांसाठी वापरले. तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानांचा मुंबई-ठाण्यापुरताच विचार केला तर उन्हाचा चटका आणि मतदान दिवसाची सुट्टी,कामगार दिन आणि त्यानंतर सलग शनिवार,रविवारची सुट्टी सर्वानांच मिळाली आहे. त्यामुळंच मतदारांनी बाहेर सहलीसाठी जाणं पसतं केलंय असं बोललं जातंय.त्याचीच गडद छाया मतदानावर उमटली हे टाळता येणार नाही.

गेले दोन-अडीच महिने राजकीय पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांनी ज्या मतदारांच्या जिवावार आणि ज्यांच्यासाठीच ही प्रचार मोहिम राबवली. त्यांनीच मतदान न करता मतदानकेंद्राकडं पाठ फिरवल्यानं नेते कार्याकर्त्यांचे चेहरं पाहण्यासारखे झाले होते. मुंबई ठाण्यात मतदानाची सरासरी टक्केवारी ही चाळीस ते ४९ टक्क्यांपर्यत राहीली. काही भागात तर फक्त तीस ते टाळीस टक्के एवढेच मतदान झाले.चार दिवसांच्या सुट्टीमुळं सहलीची ठिकाणी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्रहीने अनेक ठिकाणी पहायला मिळालं.जी मंडळी बाहेर फिरण्यासाठी गेली नाहीत ती उन्हामुळं घराबाहेरही पडली नाही. काही मोजक्याच केंद्रावर रांगा दिसल्या

एरव्ही लोकशाही प्रक्रियेबद्दल फारसा उत्साह न दाखवणाऱ्या सेलिब्रेटींनी मात्र मतदान करून आपण किती सजग असल्याचं दाखवून दिलं. आमच्या प्रश्नांकडं राजकीय पक्ष लक्ष देत नसेल,त्यासाठी पाठपुरावा करत नसेल तर आम्हालाही मतदान करण्याची गरज वाटत नाही....असंच कदाचित मतदारांच्या मनात आलं असावं....पण कारणं काहीही मतदारांच्या या भूमिकेबद्दल सर्वांनीच गांभिर्यानं विचार करायलाच हवा असं वाटतं.

केवळ पुर्वीपासून मतदानाची टक्केवारी कमी आहे,आमच्या भागात मतदान कमीच होतं. असं म्हणून राजकीय पक्षांनी,नेत्यांनी जबाबदारी झटकणं चूकीचं वाटतंय. अशी जबाबदारी झटकणं तो एक अक्षम्य गुन्हाच म्हणता येईल