Monday, August 10, 2026

विकासही अन् वारसाही!

 


   स्वतःचे राहते घर काही काळापूर्वी खूपच मेंटेनन्सचा खर्च काढत होते. दर महिन्यात काही ना काही दुरुस्तीचे काम सुरूच असायचे; अगदी वैतागलो होतो आम्ही सगळे. त्यातच मुलाचे लग्न ठरत आले, अन् त्या निमित्ताने अनेक पाहुणे प्रथमच घरी मुक्कामी येणार होते. शेवटी मनाची खूप तयारी करून घराचे संपूर्ण नूतनीकरण (Renovation) करायचेच असे ठरवले. कॉन्ट्रॅक्टरने कमीत कमी दोन महिने लागतील असे सांगितले. सुरुवातीला वाटले दोन महिन्यांसाठी दुसरीकडे भाड्याने शिफ्ट व्हावे, पण तितक्या सामान हलवण्याच्या व्यापापेक्षा इथेच थांबून हे काम पूर्ण करून घ्यावे असे सर्वानुमते ठरले......सौ.ज्योती वैद्य (जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन विभाग,भोंसला मिलिटरी कॉलेज)

      सुरू झाली मनस्ताप देणारी, रोज धूळ आणि आवाजात चालणारी कसरत! रोज उठून कामगारांच्या मागे लागणे, घराची उडालेली दैना पाहणे त्रासदायक होते. पण अडीच महिन्यांनंतर जेव्हा आमच्या २० वर्षे जुन्या घराने जणू काही कातच टाकली, तेव्हा तो सगळा त्रास क्षणात विसरला गेला. त्या नवीन, आल्हाददायक आणि उबदार घरात वावरताना मन कसे मोहरून गेले, प्रसन्न झाले.....

आपल्या लाडक्या नाशिक शहराचीही हुबेहूब हीच परिस्थिती आहे....!

कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात मोठमोठी विकासकामे सुरू झाली आहेत. कामांचा व्याप पाहता अपेक्षेपेक्षा जास्त काळ हे प्रकल्प लांबत चालले आहेत. आज नाशिकमध्ये कुठेही जा; सगळीकडे वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे, पावसाळ्यात साचणारा चिखल, दिवसरात्र सुरू असलेले खोदकाम आणि रस्त्यावर उभी असलेली अवजड वाहने... या सर्वांमुळे रोजचा प्रवास म्हणजे नाशिककरांसाठी एक मोठी कसोटी ठरत आहे. त्यातच वाढणारे रस्ते अपघात आणि निष्पाप जीवांची होणारी हानी पाहून सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे. या त्रासाला कंटाळून आजकाल शहरात हळूहळू एक सूर कानावर पडू लागला आहे— "नको तो कुंभमेळा!"

अन् हा सूर ऐकून मी मात्र आतून पार हादरले.....

  आपल्या नाशिक शहराची खरी सांस्कृतिक, पौराणिक आणि आध्यात्मिक ओळख आहे, तिलाच आपण नाकारायचे? ज्या कुंभपर्वाच्या निमित्ताने नाशिकची एक भव्य-दिव्य ओळख जागतिक पटलावर कोरली गेली आहे, तीच ओळख आपण पुसून टाकायची का? मी स्वतः आजवर कितीतरी दूरच्या नातेवाईकांना, मित्रांना या कुंभमेळ्यासाठी नाशिकला येण्याचे वैयक्तिक आमंत्रण दिले आहे. मग आज त्रास होतोय म्हणून आपणच आपल्या घराचे दार बंद करायचे का?

नवा आयाम आणि दिशा देणारा सोहळा....

 घ्या, कुंभमेळा म्हणजे केवळ गर्दी किंवा साधू-संतांचा मेळावा नाही. या पर्वात होणारी सामाजिक, वैचारिक आणि आध्यात्मिक घुसळण ही नाशिकच्या संस्कृतीला एक नवा आयाम, एक नवी दिशा देणारी ठरणार आहे. या निमित्ताने होणारे उड्डाणपूल, रुंद रस्ते, गोदावरी घाटाचे सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांचे जाळे पुढील अनेक दशकांसाठी आपल्याच पुढच्या पिढीच्या कामी येणार आहे. जुन्या तुटपुंज्या चौकटीतून बाहेर पडून एका आधुनिक, सक्षम आणि समृद्ध नाशिकचा जन्म होतोय.

श्रध्दा,सबुरी तितकीच महत्वाची   

धूळ-मातीचा, खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा त्रास कायमचा नाही. ही तात्पुरती कसरत लवकरच संपेल. उद्या जेव्हा नाशिक पूर्णपणे कात टाकेल, जेव्हा इथले रस्ते चकचकीत होतील आणि जगभरातून आलेले भाविक नाशिकच्या या नव्या रूपाचे कौतुक करतील, तेव्हा आपणच अतिशय अभिमानाने आणि छाती ठोकून सांगू— "हे माझे नाशिक आहे!"  घराचे नूतनीकरण चालू असताना जसा आपण थोडा धीर धरतो, तसाच थोडा संयम आज आपल्या शहरासाठी दाखवूया. विकास आणि वारसा यांची ही सुंदर सांगड घालताना होणारा हा बदल घडण्यासाठी... जरा सबुरी!

No comments:

Post a Comment