Monday, April 6, 2009

`राज` उवाच....

शिवाजी पार्क इथं झालेल्या युतीच्या सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठी बाणा,हिंदुत्व यासारख्या वक्त्यांचा आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला. आपल्यावर केलेल्या या वक्त्यांचा खुलासा करणार नाही,स्पष्टीकरण देणार नाही ते राज ठाकरे कसले...आणि त्यांनाही बोलतं न करणारी प्रसारमाध्यमं,पत्रकार तरी कुठले...अखेर सभेच्या दुसऱ्यांच दिवशी काल मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघानं घेतलेल्या वार्तालापात राज ठाकरे
बोलले...
शिवसेना,भाजप आणि शरद पवारांवर भरपूर बोलले आणि आपल्यापरिनं स्पष्टीकरणंही दिलं...शिवसेनाप्रमुखांनी सामना मुखपत्रातून मराठीचा मुद्दा माझाच असून काहीजण त्याची उचलेगिरी करत असल्याचं म्हटलंय. या टिकेबद्दल बोलतांना राज उवाच... हिंदुत्व हिंदुत्व शिवसेना काय बोलते. हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी संघ,भाजपाकडून उचललाय असं बोललं तर चालणार आहे काय असा प्रतिसवाल केला. मराठीचा मुद्दा कुणाचा हे महत्वाचे नसून मराठीची आंदोलन यशस्वी कोणी केली हे पाहणं गरजेचं असल्याचं ते सांगतात.
शिवसेनेकडं आज मुद्देच त्यांमुळं कधी शरद पवारांची लपून भेट,कधी लपून जेवायला जाण्याची वेळ त्यांचेवर आली असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. बाळासाहेब भाषणात भाजप आणि आघाडीचे उमेदवार असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांचा तसाच भाजपाचा उल्लेख करायला विसरले. मात्र मराठीच्या मुद्यांवर का होईंना त्यांनी माझी आठवण ठेवली हे काय कमी असल्याचं ते सांगतात.
सभेत बाळासाहेबांच्या भाषण अगोदर सभेत दाखवलं असत तर कदाचित सभेला उरली सुरली गर्दीही दिसली नसली...अशी कोपरखळी मारायलाही ते विसरले नाही. शिवसेना-राष्ट्रवादीच छुपा समझोता असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. नेहमीच आपल्या स्पष्टीकरण,बोलण्यानं चर्चेत राहिलेले राज यांनी युती सभेच्या निमित्तानं का होईना पुन्हा एकदा आपल मन मोकळ केलं असंच म्हणता येईल

Sunday, April 5, 2009

संजुबाबाची सायकल पंक्चर


मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेल्या संजयदत्त उर्फ संजुबाबाला न्यायालयानं निवडणूक लढवण्यास मनाई केली. त्यामुळं लखनौमधून उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या संजुबाबाची हवा गुल झाली आहे.एवढेच नव्हे तर ज्या सपाच्या सायकलवर स्वार होऊन तो लढणार होता. त्या सायकलची हवा निघून गेल्यानं ते पंक्चर झालंय.

सुरवातीच्या काळात संजुबाबच्या उमेदवारीवरून कॉग्रेस आणि सपात चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशात दोन्ही पक्ष परस्परांविरोधात दंड थोपटून उभे राहिले. त्यामुळं संजूबाबा कुठल्या पक्षाला स्थान देतात आणि आपलं बाशिंग बांधून घेतात याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. वडील आणि बहिण कॉग्रेसनिष्ठ असल्यानं संजुबाबा कॉग्रेसची निवड करतील. कॉग्रेसकडून लढतील.अशी अपेक्षा होती.मात्र सपाची निवड करत संजुबाबांनी सर्वानांच दे धक्का दिला.

सैफई इथं सपाअध्यक्ष मुलायमसिंह यांच्या सभेत संजुबाबानं हजेरी लावली आणि तिथंच त्यांची पक्षनिवड निश्चित झाली होती. वडील,बहिणीची कॉग्रेसनिष्ठता बाजूला ठेवत संजुबाबानं सपाची निवड करत सपा कसा वेगळा पक्ष आहे याची स्तुतीसुमने उधळण्यास सुरवात केली. याचं मागचे कारण असे आहे की, संजूबाबाला बहिण प्रियादत्तच्या जागेवर निवडणूक लढवायची होती. पण कॉग्रेसश्रेष्ठी प्रियालाच उमेदवारी देण्यात उत्सुक होती. एवढेच नव्हे तर प्रियाच्या उमेदवारी जवळपास निश्चीतही केली होती.

सपात प्रवेश केल्यानंतर अमरसिंहाच्या सांगण्यावरून संजुबाबानं निवडणूक लढवण्याची तयारी केली. तशी न्यायालयाकडं परवानगी मागितली. अशाच एका गुन्ह्यात दोषी असलेल्या क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दूसह इतर संदर्भ गोळा करून ते न्यायालयात सादर करण्यात आले आणि त्याप्रमाणे आपल्याला निवडणूक लढवण्याची परवानगी मागितली. पण न्यायालयानं संजूबाबाला साफ नकार देत चांगलीच चपराक दिली.अर्थात याकामी सीबीआयनं महत्वपुर्ण भूमिका बजावली हे लक्षात घेता येईल.

..कारण काहीही असो पण शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या मुन्नाभाईचं खासदारपदाचे स्वप्न हे भंगलय हे नक्की!

स्वरांचे दादा

गजानन वाटवे...उर्फ बापू...मराठी भावगीत गायनातलं ऋषीतुल्य,आगळंवेगळं व्यक्तिमत्व. स्वातंत्र्यपूर्व काळापासून साठच्या दशकापर्यत गजानन अर्थात सर्वांच्या या बापूंनी भावगीत गायिकीवर आपलं अधिराज्य गाजवलं. एकापेक्षा एक सरस आणि तितक्याच श्रवणीय भावगीत त्यांनी गायलं. भावगीत ऐकावं ते बापूंच्याच तोंडून. त्यांचं गीत ऐकण्याची एक वेगळीच गोडी होती. त्यामुळंच न कंटाळता तासनतास त्यांच्या कार्यक्रमात रममाण होणारं अनेक रसिक आपल्याला पहायला मिळतात.
बापूचं स्वातंत्र्यपुर्व काळातलं योगदान कुणी विसरूच शकत नाही. त्यांच्या भावगीतांच्या प्रत्येक स्वरातलं भावदर्शन ही त्या काळाची खरी गरज होती. नेमके हेच हेरून बापूंनी सर्वांसाठी गायले. केवळ पैशासाठीच काम करणारे अनेक कलावंत आपल्याला पहायला मिळतात. बापूंनी पैशापेक्षा कष्टाला अधिक महत्व दिलं. कष्ट केले कि श्रम,पैसा,प्रतिष्ठा आपोआपच मिळते असं त्याचं प्रामाणिक मत होतं. त्यामुळं शेवटपर्यत ते कष्ट करत राहिले.
पुर्वीच्या काळातल्या गायकांमध्ये बापू तसं टॉपलाच होते. मराठी समाजात अस्स्ल मराठमोळ्या भावगीतांना बापूंनी खऱ्याअर्थानं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. भावगीत आणि तेही बापूंच्या आवाजात ऐकण्याची एक पर्वणीच असते.तरूण पिढीला खिळवून ठेवणं सोपं काम नाही.पण बापूंनी ते समर्थपणे पार पाडलं. त्यामुळेच त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाचा आपण आढावा घेतला तर आलेल्या श्रोतृवर्गात तरूणांची संख्या दखल घेण्यासारखीच होती. तरूणांना खिळवून ठेवणं ही बापूंची वेगळी खासियत.
कवी मनमोहन यांच्या राधे तुझा सैल अंबाडा आणि राजा बडे लिखित नका मारू खडा शिरी भरला घडा...या गीतांनी पुणे- मुंबईसारख्या शहरात खळबळ उडवून दिली. ही दोन्ही गीतं अश्लील असल्याची बोंब संस्कृतीरक्षकांनी उठवून दिली.,रेडीओनेही ही दोन्ही गाणी बॅन केली पण बापूंनी संयम राखला. पुढे पुढे कार्यक्रमात याच दोन गाण्यांना वन्समोअर,टाळ्या मिळू लागल्या आणि बापू लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. चित्रपटातील गाण्याच्या ध्वनिफितीपेक्षाही या दोन गाण्याच्या ध्वनिफितीची सर्वांधिक विक्री झाली. ही बाब निश्चीत लक्षात घेण्यासारखीच आहे.
संगीत क्षेत्रात काळानुरूप अनेक बदल झाले.चित्रपट,दुरदर्शनसारखी माध्यमे आली त्यामुळं भावगीत कार्यक्रमांची मागणी कमी झाली. हेच चाणाक्ष बापूंनी ओळखलं आणि कार्यक्रमांतून दुर झाले....अर्थात बापूंचं वयही झालं होतं...एक काळ गाजवणारे बापू... संगीत क्षेत्रातल्या उदयोन्मुख पिढीसमोर ते आदर्शवतच राहणार हे नक्की!

Saturday, April 4, 2009

जुन्या जाहीरनाम्यांना सोन्याचा नवा मुलामा


निवडणूक मग ती ग्रामपंचायत,बॅंका,पतसंस्था कि विधानसभा,लोकसभा अशी कुठलीही असो,उभा राहणारा प्रत्येक पक्षच नव्हे तर अपक्ष उमेदवार आपण काय सभासद,लोकांसाठी काय करणार हे मांडण्याचा प्रयत्न करतो..त्यासाठी अर्थातच आधार घेतला जातो तो पत्रक,जाहीरनाम्याचा...अपक्ष उमेदवारांच्या जाहीरनाम्यात डोकावलं तर त्यांच्या वैयक्तीक विचारांचा प्रभाव दिसतो. पक्षाच्या जाहीरनाम्यासाठी बुध्दीजीवीची कमिटी नेमली जाते.त्यातूनच अनेक मुद्यांचे एकत्रिकरण त्यात दिसून येते.

वीस पंचवीस वर्षापुर्वीचे काही जाहीरनाम्यावर नजर टाकली तर त्यात जुन्या मुद्यांएवढ्याच ताज्या घडामोडींची दखल घेतलेली दिसते. त्यामुळेच समग्र मुद्यांचा समावेश असलेले असं जाहीरनामे हे वेगळे ठरत होते. निवडणूकीच्यानिमित्तानं काढण्यात येणाऱ्या या जाहीरनाम्यावर नजर टाकली तर त्यात वैविध्यपुर्ण असे काहीच आढळून येत नाही. त्या-त्या काळात गाजत असलेल्या चार पाच मुद्यांचा अपवाद वगळला तर सर्रासपणे जुन्यांचा मुद्यांना जाहीरनाम्यात स्थान दिले जाते.

आताच्या लोकसभा निवडणूकीचं निमित्त साधून कॉग्रेस,भाजप,राष्ट्रवादी आणि तिसऱ्या आघाडीनं आपले जाहीरनामे प्रकाशित केले आहे. या सर्वांच्या जाहीरनाम्यावर नजर टाकली तर त्यात वस्तू स्वस्त दरात देणे,शेतीसाठी सवलत देणे,घरे देणे,प्राप्तीकरात सूट,आर्थिक दुर्बलांना आरक्षण,महिला,विद्यार्थ्यांसाठी योजना....इत्यादी इत्यादी त्याच-त्याच मुद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सत्तेवर आल्यानंतर हे करू,ते मिळवून देऊ, त्यासाठी मदत करू,जुन्या योजनांचा पाठपुरावा करू,बंद पडलेल्या योजना सुरु करू...तेच तेच मुद्दे आणि मतदारांसाठी फक्त अश्वासन आणि अश्वासनच दिलेले आहे. त्यापलिकडं काहीच नाही. मतदारांसाठी जाहीरनाम्यातून नवीन ठोस पहायला मिळालेले नाही.....

काही पक्ष,उमेदवांराचा अपवाद वगळता जाहीरनाम्याकडे किती पक्ष गांभीर्यानं पहातात. किती मुद्दे,विषयांची पुर्तता करतात.हे सर्वश्रृत आहे. त्यामुळं जुन्या जाहीरनाम्यांना नव्याने सोन्याचा मुलामा देण्याचा राजकीय पक्षाचा हा प्रकार हास्यास्पद,फसवाच आहे. स्वातंत्र्यप्राप्तीची साठी आपण ओलांडली आहे. असं असतांनाही पक्ष,उमेदवारांकडून होणारी फसवणूक थांबलेली नाही. पक्ष मग तो कुठलाही असो. अशा पक्षांच्या या भूलथापांना आपण बळी पडायचे का? त्यांनी नागरीकांना वेड्यात काढायचे आपण ते निमूटपणे सहन करायचे,हे आणखी किती दिवस चालणार.... याचा विचार प्रत्येक नागरीकांन करण्याची गरज वाटते....त्यासाठी हा पंक्तीप्रपंच जाहीरनामा सादर केला.