Saturday, April 4, 2009

जुन्या जाहीरनाम्यांना सोन्याचा नवा मुलामा


निवडणूक मग ती ग्रामपंचायत,बॅंका,पतसंस्था कि विधानसभा,लोकसभा अशी कुठलीही असो,उभा राहणारा प्रत्येक पक्षच नव्हे तर अपक्ष उमेदवार आपण काय सभासद,लोकांसाठी काय करणार हे मांडण्याचा प्रयत्न करतो..त्यासाठी अर्थातच आधार घेतला जातो तो पत्रक,जाहीरनाम्याचा...अपक्ष उमेदवारांच्या जाहीरनाम्यात डोकावलं तर त्यांच्या वैयक्तीक विचारांचा प्रभाव दिसतो. पक्षाच्या जाहीरनाम्यासाठी बुध्दीजीवीची कमिटी नेमली जाते.त्यातूनच अनेक मुद्यांचे एकत्रिकरण त्यात दिसून येते.

वीस पंचवीस वर्षापुर्वीचे काही जाहीरनाम्यावर नजर टाकली तर त्यात जुन्या मुद्यांएवढ्याच ताज्या घडामोडींची दखल घेतलेली दिसते. त्यामुळेच समग्र मुद्यांचा समावेश असलेले असं जाहीरनामे हे वेगळे ठरत होते. निवडणूकीच्यानिमित्तानं काढण्यात येणाऱ्या या जाहीरनाम्यावर नजर टाकली तर त्यात वैविध्यपुर्ण असे काहीच आढळून येत नाही. त्या-त्या काळात गाजत असलेल्या चार पाच मुद्यांचा अपवाद वगळला तर सर्रासपणे जुन्यांचा मुद्यांना जाहीरनाम्यात स्थान दिले जाते.

आताच्या लोकसभा निवडणूकीचं निमित्त साधून कॉग्रेस,भाजप,राष्ट्रवादी आणि तिसऱ्या आघाडीनं आपले जाहीरनामे प्रकाशित केले आहे. या सर्वांच्या जाहीरनाम्यावर नजर टाकली तर त्यात वस्तू स्वस्त दरात देणे,शेतीसाठी सवलत देणे,घरे देणे,प्राप्तीकरात सूट,आर्थिक दुर्बलांना आरक्षण,महिला,विद्यार्थ्यांसाठी योजना....इत्यादी इत्यादी त्याच-त्याच मुद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सत्तेवर आल्यानंतर हे करू,ते मिळवून देऊ, त्यासाठी मदत करू,जुन्या योजनांचा पाठपुरावा करू,बंद पडलेल्या योजना सुरु करू...तेच तेच मुद्दे आणि मतदारांसाठी फक्त अश्वासन आणि अश्वासनच दिलेले आहे. त्यापलिकडं काहीच नाही. मतदारांसाठी जाहीरनाम्यातून नवीन ठोस पहायला मिळालेले नाही.....

काही पक्ष,उमेदवांराचा अपवाद वगळता जाहीरनाम्याकडे किती पक्ष गांभीर्यानं पहातात. किती मुद्दे,विषयांची पुर्तता करतात.हे सर्वश्रृत आहे. त्यामुळं जुन्या जाहीरनाम्यांना नव्याने सोन्याचा मुलामा देण्याचा राजकीय पक्षाचा हा प्रकार हास्यास्पद,फसवाच आहे. स्वातंत्र्यप्राप्तीची साठी आपण ओलांडली आहे. असं असतांनाही पक्ष,उमेदवारांकडून होणारी फसवणूक थांबलेली नाही. पक्ष मग तो कुठलाही असो. अशा पक्षांच्या या भूलथापांना आपण बळी पडायचे का? त्यांनी नागरीकांना वेड्यात काढायचे आपण ते निमूटपणे सहन करायचे,हे आणखी किती दिवस चालणार.... याचा विचार प्रत्येक नागरीकांन करण्याची गरज वाटते....त्यासाठी हा पंक्तीप्रपंच जाहीरनामा सादर केला.

No comments:

Post a Comment