कुठल्याही स्पर्धेचा उद्घाटन, पारितोषिक वितरण समारंभ म्हटला की,राजकारण्यांचा सहभाग असतोच,किंबहुना त्यांच्या सहभागाशिवाय असे सोहळे पार पाडणं म्हणजं जरा जिकरीचंच....याला राष्ट्रकुल स्पर्धेची क्विन्स बॅटन तरी कशी अपवाद असू शकते...राज्याच्या दौ-यावर असलेल्या या बॅटनच्या निमित्तानं सध्या राजकारण्यांची चमकूगिरी हा सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय.
खेळ, खेळाडू, संघ आणि पुढारी...हे एक एकमेकांशी संबंधीत घनिष्ट नातचं. त्यामुळंच स्थानिक,राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच खेळांच्या संघटनावर खेळाडू, प्रशिक्षकांपेक्षा पुढारीच पदाधिकारी दिसतात. किंबहुना त्यांच्या आर्शिवाद, मार्गदर्शनाशिवाय संघटनांचं कार्य चालणं तसं अवघडच. आणि मग स्वभाविकच त्यांना स्पर्धा मग ती गल्लीतली असो कि दिल्लीतली प्रत्येक कार्यक्रमांसाठी बोलवणं अपरिहार्यच... कार्यक्रमास न बोलवणं, सत्कारासह योग्य आदरातिथ्य न ठेवल्यास त्यांचे रूसवे-फुगवे आणि संबंधितांवर काट धरत उट्टे काढणं आलेच....
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा बिगुल आता जोरात वाजू लागलंय. बॅटन रिले या स्पर्धेच्या संयोजन आणि उद्घाटन सोहळ्याचा महत्वपूर्ण भाग आहे, त्यामुळेच खेळाडू, प्रशिक्षक आणि संयोजक या बॅटनची सर्वजण काळजी घेतांना दिसताय, हे खरं असलंतरी बॅटन स्वागताच्या निमित्तानं राजकारण्यांची चमकूगिरी दिसून येतेय. खेळाडूंपेक्षा बॅटन हातात घेऊन धावतांना आपलीच छबी वृत्तपत्रात, वाहिन्यांवर कशी झळकेल याची काळजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापौरांसह इतर पुढारी घेतांना दिसतात. त्यासाठी अगदी खेळाडूं, जेष्ठ प्रशिक्षकांनाही मागे हटवून स्वतः पुढे येण्यासाठी चढाओढच पहायला मिळते, अगंदी आपणच स्पर्धेचं मुख्य संयोजक, यजमान आहोत, अशा थाटात हे सर्व पध्दतशीर सुरुय.
बॅटनचा कोल्हापूर, पुण्यामार्ग मुंबईत प्रवास सुरु झाला. या तिन्ही ठिकाणी राजकारण्यांच्या चमकूगिरी पहायला मिळाली. बॅटनचे जल्लोषात स्वागत झाले.सोहळा आटोपला आणि आपले फोटोसेशन कम्पिलट झाल्याची खात्री झाली की, हे सगळे चमकू पुढारी झाले एकदाचे मोकळे.....मग खेळाडू, प्रशिक्षक बॅटन पुढे घेऊन गेलेत की नाही, बॅटनचा प्रवास व्यवस्थित सुरुय की नाही, याचं त्यांना काही देणं घेणं नाही.
स्वतःच्या प्रसिध्दी नव्हे तर आपल्या शहर, जिल्ह्यात ही बॅटन आल्यानं तिचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्यच, असं स्वागताच्या कार्यक्रमातच ठामपणे सांगायलाही हे पुढारी विसरत नाही. प्रत्येकजण स्वागताच्या कार्यक्रमांशी संबंधीत आपलं मत ते ही अगदी सोयीस्करपणे मांडतांना सध्या दिसत आहे. ईद, गणेशोत्सवासारखे उत्सव असल्यानं बॅटनचा मुंबईतला प्रवास कमी केला. अन्यथा मुंबईत प्रत्येक भागातल्या पुढा-यांनं आपल्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाद्वारे बॅटनच स्वागत केलं असतं, एवढ्यावरच न थांबता आपली छबी चमकेल कशी याकडं केंद्रीत केलं असतं. बॅटननं २५ जूनला भारतात प्रवेश केला. आतापर्यत १६ हजार ६५२ किलोमिटरचा प्रवास पूर्ण झालाय. सर्व राज्यात खेळाडू, प्रशिक्षक,संघटनापेक्षा राजकारण्यांची चमकूगिरीच पहायला मिळाली. अनेक ठिकाणी बॅटनबरोबरच राष्ट्रकुलमध्ये झालेल्या गैरव्यवहारांवर टीका झाली. पण त्यांला सोयीस्कर बगल देण्याचाही प्रयत्न संयोजकांच्या माध्यमातून पहायला मिळाला. बॅटन स्वागताच्या निमित्तानं अगदी महाराष्ट्रातसुध्दा हा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांला पध्दतशीरपणे टाळले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रचार प्रसारास सर्वाधिक प्राधान्य संयोजन समितीनं दिलं, बॅटनच्या जोडीला आता कॉमनवेल्थ ट्रेनचाही प्रवास सुरु झालाय़. या प्रवासातही क्रीडाप्रेमींच्या जोडीला पुढा-यांची चमकूगिरी पहायला मिळतेय...पुढा-यांशिवाय क्रीडासंघटना, संस्थाचं पान हलत नाही...हे जरी खरं असलंतरी पुढा-यांनी खेळाडू, प्रशिक्षकांचा असलेल्या बॅटन स्वागताच्या कार्यक्रमात किती चमकूगिरी करावी हा एक प्रश्नच आहे.