यंदाची विश्वकरंडक स्पर्धा मातब्बर संघाबरोबरच नवख्या संघाच्या सहभागामुळं वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. क्रिकेट स्पर्धेला दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानं आणि यजमान भारत-बांग्लादेश दरम्यानच्या धडाकेबाज सामन्यानं सुरुवात झालीय. स्पर्धेतल्या काही लढती शेवटपर्यंत उत्कंठावर्धक होतील, तर काही कंटाळवाण्या होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही स्पर्धा संपेल त्यावेळेस एकीकडं विजेता संघ जल्लोषात बुडालेला असेल, तर दुसरीकडं काही दिग्गज खेळाडू अखेरचा वर्ल्डकप म्हणून जुन्या आठवणीत रमलेले असतील. वाढत्या वयामुळं सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पाँटिंग अशा मातब्बरांसाठी हा वर्ल्डकप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळंच या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याबरोबर रेकॉर्ड नोंदवण्याचं टार्गेट या खेळाडूंसमोर असेल.
पाँटिंगनं १९९९, २००३ आणि २००७ च्या वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाच्या स्पर्धेतही तोच कर्णधार आहे. मुरलीधरन १९९६च्या वर्ल्डकप विजेत्या संघात खेळला होता. यावेळी हे दोघेही पुन्हा एकदा वर्ल्डकप हातात घेण्यास उत्सुक आहेत. सचिन तेंडुलकरची गोष्ट थोडी वेगळी आहे. सचिनचा हा सहावा वर्ल्डकप आहे. पण त्याच्या कारकीर्दीत भारताला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. ती कसर भरून काढण्यासाठी यंदा त्याला ही बहुधा अखेरची संधी आहे. कॅलिसचंही यापेक्षा वेगळं नाही. त्यानंही आतापर्यंत वर्ल्डकप विजयाचा आनंद घेतलेला नाही.
भारतासाठी केवळ तेंडुलकरसाठीच हा वर्ल्डकप कदाचित अखेरचा ठरणार नाही, तर विरेंद्र सेहवाग, झहीर खान यांचाही बहुतेक हा वर्ल्डकप अखेरचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुखापती आणि वाढलेल्या वयामुळं त्यांना २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ते सहभागी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर पाँटिंगबरोबरच वेगवान गोलंदाज ब्रेट लीलासुद्धा वर्ल्डकपमध्ये खेळण्याची ही अखेरची संधी आहे. आता तो ३४ वर्षांचा आहे. त्यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याअगोदरच निवृत्ती जाहीर केलीय. पुढील वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक संख्येनं ज्यांचे खेळाडू दिसणार नाहीत तो संघ म्हणजे श्रीलंका. या संघातले कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान हे तिघेही तिशीच्या पुढचे आहेत. यांच्यासाठी हा वर्ल्डकप अखेरचाच असेल. पाकिस्तानचे शोएब अख्तर, कसोटी कर्णधार मिसबाह उल हक, युनूस खान हेदेखील तेहतीसच्यावर आहे. तेसुध्दा या वर्ल्डकपनंतर पुढील स्पर्धेत दिसणार नाहीत. वेस्ट इंडिजमध्ये ख्रिस गेल, शिवनारायण चंदरपॉल, रामनरेश सरवान हे बत्तीसच्या पुढे असल्यानं त्यांच्यासाठीही हा बहुधा शेवटचा वर्ल्डकप असेल. इंग्लिश संघात कर्णधार अँड्र्यू स्ट्राऊस, पॉल कॉलिंगवूड हे अनुक्रमे चौतीस आणि पस्तीशीचे आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हिटोरी, अष्टपैलू स्कॉट स्टायरिस, जेकब ओराम हे देखील २०१५ मध्ये खेळण्याची शक्यता नाही.
श्रीकृष्ण कुलकर्णी, साम मराठी मुंबई
No comments:
Post a Comment