Wednesday, May 5, 2021

निशब्द करून गेले दोन ध्येयवेडे मित्र...

  

     मला आठवतं, बरोबर दोन-अडीच वर्षापूर्वी सिन्नरमध्ये युवानेते उदय सांगळे,शितल सांगळे,माजी आमदार जयंत जाधव यांच्या पुढाकारातून अ.भा.कबड्डी स्पर्धा झाली. या स्पर्धेचे वार्ताकनं मी करावं अशी मराठमोळ्या कबड्डीला वाहुन घेतलेल्या संघटक,प्रशिक्षक कै.प्रशांत भाबड आणि विलास पाटील या दोन्हीही माझ्या प्रिय मित्रांची इच्छा होती, माझी भेट घेत त्यांनी स्पर्धा सिन्नरला येऊन कवर करण्याची गळही घातली आणि मैत्रीमुळे मलाही त्याचा शब्द टाळता आला नाही आणि मग कार्यालयीन परवानगी घेऊन मीही दिवसभर काम करून सायंकाळी पाचनंतर आठवडाभर सिन्नरला या दोन्ही मित्रांबरोबर गेलो,सोबत कैलास ठाकरे आणि आणखी एक दोन हौशी कबड्डी शिक्षक असायचे,हे सारे जण आपला दिवसभराचा व्याप,कामे सांभाळून सीबीएसला एकत्रित येत आणि मग आम्ही सारे तिकडे जात होते. अर्थात तिकडे गेल्यापासून रात्री अकराला वेळापत्रकाप्रमाणे सामने पूर्ण होईपर्यत सांगळे यांनी ध्येयवेड्या प्रशांत,विलास सर ग्राऊंडवर जातीने हजर राहून कामात व्यस्त होतं, अगदी मैदानाची आखणी, पंचाची नेमणूक,इलेक्ट्रीक टायमर सेट करण्यापासून मैदानावरील वादांचे प्रसंग मिटविण्यापर्यतची मध्यस्थी त्यांना करावी लागत असे. जयंत जाधव,सांगळे यांचा या प्रशांत,विलास या द्वयींवर विश्वास असल्याने दैनंदिन सामन्यांच्या नियोजनांची आणि कार्यक्रमांच्या तयारीची मोठी जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर देण्यात आलेली होती. त्यामुळे रात्री नाशिकला बारा-साडेबाराला आल्यानंतरही तितक्याच उत्साहाने  दुसऱ्या दिवशीही सिन्नरला जाण्यासाठीचा त्याचा उत्साह अवर्णनीयच...     

     


कबड्डीसाठी काहीही करण्यास तयार असलेल्या या दोघांची तळमळ ही कामे करतांना पार पाडतांना क्षणोक्षणी जाणवत होती. नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात कुठेही कबड्डीचे सामने असो हे दोघेही जातीने हजर राहून जिल्हा,राज्य संघटनेने दिलेली जबाबदारी पार पाडत आपला खारीचा वाटा उचलत,योगदान देत असतं. शाळेतील खेळाडूंसाठी असो की मैदानावरील कबड्डीच्या संघासाठी असो ते घडविण्यासाठी त्यांची कष्ट करण्याची कायमच तयारी होती. स्वतः खेळाडू म्हणून पुढे आल्याने त्यांना खेळाडू,प्रशिक्षक,संघटकांना येणाऱ्या अडचणींची जाणीव होती, अगदी त्यांच्याशी संवाद साधतांना त्याची ही भावना कायमच जाणवत असे, खेळाडू मोठे झाले पाहिजे, त्यांना नोकरी लागली पाहिजे, यासारख्या मुद्यांवर काहीही करण्यास ते नेहमी तत्पर असतं,महापौर कबड्डी स्पर्धा,एनकेपीएल असो कि हौशी निमंत्रितांची स्पर्धा सर्वच नियोजनात जिल्हा कबड्डी संघटनेच्या नियोजनात त्यांचा सक्रीय सहभाग जाणवत होता.या दोन मित्रांशी प्रत्येकानेच मैत्री करावी असेच त्याचे वागणे,बोलणे, चालणे होते. त्यामुळेच त्यांच्या संपर्कात आलेले प्रत्येकजणच त्यांचे मित्र झाले आणि हे मैत्रीपण त्यांनीपण जपले, आयुष्यात सतत कबड्डीतील संघविजयाचाच विचार करणाऱ्या हे दोन मित्र कोरोनाच्या लढाईत मात्र हरले आणि  अवघ्या दहा दिवसांच्या फरकाने त्यांना मृत्युने कवटाळले. अशा या मैत्रीच्या दुनियेतील दोन राजांना भावपूर्ण श्रध्दांजली....  

No comments:

Post a Comment