Thursday, October 25, 2012

निराधारांना सागर देतोय जिद्दीचे पंख!

अठरा वर्षे... शिक्षण बारावी... डोक्‍यावर छत नाही... खिशात फुटका पैसा नाही... पोटात अन्नाचा दाणा नाही...
असा हा अनाथ सागर रेड्डी अठरा वर्षांचा झाल्याने त्याला लोणावळ्यातील अनाथ आश्रमातून नियमानुसार मुक्त करण्यात आले. कपडेलत्ते आणि जग जिंकण्याची इच्छाशक्ती याशिवाय त्याच्याकडे काहीही नव्हते. आश्रमाचा दरवाजा कायमचा बंद झाला असला तरी जगण्याची लढाई लढण्याचे धडे तेथून मिळाल्याने आता काही करून दाखवायचे ही जिद्द पुरती त्यात भरली होती. या जोरावर इंजिनिअर झालेल्या सागरने अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्यांना जिद्दीचे पंख देण्यासाठी पुढाकार घेतला असून, एकता निराधार संघाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी धडपडत आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या सागर रेड्डीने पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सागर म्हणाला, ""मी अभियंता होण्याचे स्वप्न उरी बाळगले होते. जगण्याची जिद्द असल्याने रेल्वेस्थानक, बसस्थानक, हॉटेल, टपरीवर जेथे मिळेल तेथे त्याने काम केले. कित्येक दिवस वडापाववर काढावे लागले. मात्र त्याने लढण्याची इच्छाशक्ती अधिक भक्कम होत गेली. पण कधी कधी इच्छाशक्तीलाही पोटाचा पीळ आत्महत्येकडे खेचून न्यायचा. तीनदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. मिळालेल्या कामातून थोडीफार बचत करत कठीण परिस्थितीला सामोरे जात इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. यातच मला एल ऍण्ड टी कंपनीत प्लॅनिंग इंजिनिअरची नोकरी मिळाली. स्वप्न पूर्ण झाले तरीही मन समाधानी नव्हते. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेली. दर वर्षी सुमारे दोन लाख अनाथ मुलामुलींना आश्रमातून बाहेर काढले जाते. हे काय करत असतील, कसे जीवन जगत असतील हा प्रश्‍न माझ्या मनात सतत घोंघावत होता.''
सध्या सागर सत्तावीस वर्षांचा असून, निराधारांना आधार देण्यासाठी त्याने वाशी (मुंबई) फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन 12 मुले व तीन निराधार मुलींना दत्तक घेतले आहे. महाराष्ट्रातील 230 अठरा वर्षांपुढील निराधारांना वेगवेगळ्या माध्यमातून आधार देत आहे.
रागालाही रंग मिळाला...
सागर आश्रमशाळेवर रागावला होता. उमेदीच्या काळात आश्रमशाळेतून बाहेर काढल्याचा रोष त्याच्या मनात होता. मात्र व्यवस्थेने आखून दिल्यामुळे गरज असताना आश्रमशाळेतून बाहेर फेकल्या जाणाऱ्या तरुण-तरुणींची अवस्था काय होत असेल याची सागरला जाणीव होती. त्याने त्याच्या रागाचे जनहिताच्या रंगात रूपांतर केले असून, हीच जाणीव ठेवून अठरा वर्षांपुढच्या निराधारांचा शोध घेत त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करून शिक्षणासाठी मदत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 2008 मध्ये त्याने एकता निराधार संघाची स्थापना करून गरजू निराधार मुलामुलींचे सुयोग्य पुनर्वसन करण्याचा ध्यास घेतला आहे. निराधारांना मदतीसाठी आणि ज्यांना निराधारांना मदत करायची आहे अशांनी 9768117477 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सागर रेड्डी याने केले आहे.

No comments:

Post a Comment