Wednesday, March 6, 2013

तिरूपतीच्या हुंडीत पाचशे कोटी


देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान असे बिरुद मिरवणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या हुंडीत आगामी वर्षभरात भाविकांच्या दानशूर हातून तब्बल 859 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. तिरुपती भगवंताने मनोकामना पूर्ण केल्यानंतर भाविकांकडून सढळ हाताने हुंड्यांमध्ये गुप्तदान करण्याची प्रथा आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तिरुपती देवस्थानच्या अमाप उत्पन्नावर नुकताच प्रश्‍न उपस्थित केला होता. देशावर आणि आंध्र प्रदेशातील "आयटी' कंपन्यांवर मंदीचे सावट असताना तिरुपती देवस्थानाच्या हुंडीमध्ये गेल्या वर्षी तब्बल 731 कोटींचे दान पडले होते. त्यामुळेच देवस्थानाने 2013 मध्ये हुंडीदानातून सुमारे साडेआठशे कोटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
देवस्थानच्या प्रशासकीय मंडळाने अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. देवस्थानने यंदा दोन हजार 248 कोटींचा अर्थसंकल्प तयार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 258 कोटींची वाढ करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात देवस्थानचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. भाविकांकडून मुंडण झाल्यानंतर जमा होणारे केस आणि लड्डू प्रसादम या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश करण्यात आला आहे. देवस्थानला गेल्या वर्षभरात हंडीमधून 73 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले.
भाविकांमध्ये वाढता सामाजिक तणाव आणि अनिश्‍चिततेतून या निधीत वाढ होत असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षी विशेष दर्शनासाठी प्रतिभाविक तीनशे रुपये आकारण्यात आले. यातून 181 कोटींचा निधी जमा झाला होता. तोच निधी आगामी वर्षात 250 कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यातून देवस्थानला अधिक गतीने सामाजिक कामे करता येऊ शकतील, असा विश्‍वास देवस्थानाचे मुख्य पुजारी डॉ. ए. व्ही. रामना दीक्षितुलु यांनी व्यक्त केला.

"स्वीस'चे विशेष घड्याळ उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधत देवस्थानने जगविख्यात स्वीस कंपनीसोबत करार केला आहे. या कंपनीकडून तिरुमला तिरुपतीचे चित्र असलेली मर्यादित 333 आलिशान घड्याळे तयार करण्यात येणार आहेत. प्रतिघड्याळ 27 लाख रुपये किंमत निश्‍चित करण्यात आली असून, यातून देवस्थान निधी गोळा जमवणार आहे. 

No comments:

Post a Comment