Thursday, June 25, 2009

रबडी महात्म्य ढोली आणि ठेपला

वेळ पहाटे चार साडेचारची...ठिकाण अबू रोड अर्थात माऊंट अबू रेल्वेस्टेशन...रणकपूर एक्सप्रेस स्थानकावर थांबते आणि बाहेर एकच गोंधळ सुरु होतो...साहब ले लो अबू की फेमस रबडी...एक बार लेंगे तो बार बार मागोंगे..मुक्त मै घर ले जायेंगे...पसंद आयी तो दोन बार आयेंगे..अच्छी नही लगी तो दाम ले जावोंगे...यासारख्या विक्रेत्यांच्या घोषणांनी प्लॅटफार्म गजबजून जातो....कुल्लाहात असलेली रबडी...प्रत्येक बोगी आणि खिडकीजवळ जाऊन विक्रीचा त्यांचा सपाटा सुरु होतो...प्रवाशांना पटवून रबडीचा कुल्लाह त्यांच्या हातात देत पैसे घेतल्यानंतरच विक्रेत्याचं समाधान होते...एवढ्या पहाटेही विक्रीचा हा अनोखा फंडा लक्षात घ्यावा असाच वाटला...इंटरनॅशनल मिडीया कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्या राहणीमानाबरोबरच अस्सल खवैय्यगिरी जपणारेही अनेकजण पहायला मिळाले.
बारा पंधरा तासांच्या प्रवासानंतर अबू स्टेशनवर पहाटे उतरलेल्या कुठल्याही प्रवाशाला आपला थकवा दूर करण्यासाठी चहा प्यावासा वाटेल. त्यातही महाराष्ट्रीयन व्यक्ती असेल तर ती रबडीपेक्षा चहालाच अधिक प्राधान्य देईल. त्याप्रमाणे आम्ही चहा घ्यायचं ठरवलं. पण पहाटेची वेळ असूनही संपुर्ण स्टेशनवर आम्हाला कुठेच चहा मिळाली नाही. विक्रेत्यांकडे चहाबद्दल विचारणा केली तर ते तिरस्काराच्या भावनेनंच आमच्याकडे बघत.
काही विक्रेत्यांनी तर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत इतर ग्राहकांना रबडी देणं पसंत केल. स्टेशनवर सर्वत्र रबडी विकली जात होती. आमच्यापैकी काहींनी चाय नही तो रबडी सही...असं म्हणतं रबडी खायचं ठरवलं तर काहींनी रबडी आणि एवढ्या पहाटे असं म्हणतं खाण्यास नकार दिला. दहा रूपये देत रबडी घेत काहींनी स्वाद चाखायला सुरुवात केली. त्यांनी रबडी घेतल्यानंतरही विक्रेता समोर जाण्यास तयार नव्हता. तो आपल्या खास शैलीत रबडी महात्म्य सांगत इतरांना आग्रह करत होता. अखेर आम्हांलाही त्यानं रबडी घेण्यास भाग पाडले...आणि आम्ही पहाटेच्या वेळी चाखलेली रबडीची चव खरोखरच लक्षात रहावी अशीच होती...याबद्दल विक्रेता आणि सुरवातीस रबडी खाणाऱ्यां मित्रांचे आभार मानावे तेवढे थोडेच..त्यांचे चाय नही तो रबडी सही... हे वाक्यही माझ्या लक्षात राहिले.
पाच दिवसीय परिषद आटोपून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा प्रजापिता ईश्वरिय विश्वविद्यालयातर्फे आम्हाला मका चिवडा,शंकरपाळे पाकिट आणि काजू बर्फी ही ईश्वरीयभेट म्हणून देण्यात आली. या भेटीलाच ढोली अर्थात एकत्रित प्रसाद म्हणतात हे आम्हाला पाहिल्यांदा समजलं. सहभागी प्रतिनिधींना प्रवासात सहभोजनासाठी पुरी,खाकरा,बटाटा चिप्स आणि त्याजोडीला लोणच्याचे विविध प्रकार असलेले पाकिट देण्यात आले. या खानासुमारीला ठेपला असं म्हणतात. रबडीवगळता ढोली,ठेपला ही वाक्ये आमच्यासाठी नवीनच होती...या सर्व नव्या खाद्यपदार्थाचा परतीच्या प्रवासात आम्ही आस्वाद घेतला..या पदार्थाची चव ओठावर ठेवतच आम्ही घरी परतलो पण राज्य बदलल्यानंतर जात,धर्म,पंथ आणि खानपानही बदलते आणि ते कसं असू शकत याचा प्रत्यय आम्हाला राजस्थान जयपूर दौऱ्यादरम्यान आला...

No comments:

Post a Comment