जगात धर्म,जात,मुर्तीपूजा,पंथ वगैरे काही नाही. मनुष्य हा देखील फक्त निमित्तमात्रा आहे. तो जे काही काम करतो,चालतो,बोलतो,लिहितो,वाचतो या सर्व कृती त्यांच्या आत्म्याकडून होतात. आत्माच मनुष्याकडून सर्वकाही करून घेत असतो. असं सांगणारं हे विश्वविद्यालय. देशविदेशात आठशेहुन अधिक केंद्र आणि जवळपास आठ हजारांहुन अधिक बीके(ब्रम्हाकुमार,ब्रम्हाकुमारी)च्या माध्यमातून चालणारे काम सर्वांनाच थक्क करून सोडणारे आहेत. मला दुसऱ्यांदा या मिडीया कॉन्फरन्सला जाण्याची संधी मिळाली. त्यामुळं हे विश्वविद्यालय अधिक जवळून समजून घेता आलं.
यंदाच्या परिषदेसाठी प्रसारमाध्यमातल्या कर्मचाऱ्याचे अंतरिक सक्षक्तीकरण हा मुख्य विषय ठेवण्यात आला होता. त्याच अनुषंगाने विविध विषय चार दिवस चर्चेले गेले. त्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीची आत्मानुभूती, प्रतिनिधीची अधात्मिक ज्ञान, त्यातला सहभाग आणि अध्यात्मिक क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन, प्रसारमाध्यम क्षेत्रात यशस्वी होण्यासाठीची सुत्र,आनंद प्राप्तीसाठी परमेश्वराशी एकरूपता,जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अंतरिक शक्तीची आवश्यकता,सक्षम प्रसारमाध्यमे समाजासाठी प्रेरक,समय की पुकार या सारख्या विषयांचा समावेश होता. याशिवाय चारही दिवस पहाटे चार ते साडेपाच पर्यत विपश्यना,ध्यानधारणा होत असे. त्यानंतर साडेसहा ते साडेआठ यावेळेत राजयोगावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या चार दिवसीय परिषदेसाठी देशभरातून नावाजलेल्या प्रिंट,इलेक्ट्रानिक मिडीयाचे संपादक,वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. सहभागी वक्तेही संबंधीत विषयाचे तज्ञच होते. त्यामुळं प्रत्येक चर्चाही खुलेपणे आणि बारीकसारीक मुद्यांवर होत असे. पण सर्वच तज्ञ विश्वविद्यालयाशी संबंधीत असल्यानं चर्चेचा सूर हा विश्वविद्यालयांनं आखून दिलेल्या चौकटीत आणि प्रत्येक विषयात अध्यात्मिक टच दिलेला असल्याचे जाणवले.
पहिल्या दिवसाचा शानदार उद्घाटन सोहळा.समारोप समारंभही भव्यदिव्य असाच,त्यानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमानं परिषद संस्मरणीय झाली.परिषदेच्या निमित्तानं प्रतिनिधींना विश्वविद्यालयानं माऊंटअबूवरील नक्कीलेकसह त्यांच्या उपक्रमांपैकी गोल्बल हॉस्पिटल,पांडव भवन,युनिव्हर्सल हॉल,शांती भवन,म्युझियम,पिस पार्क दाखवले. वर्षभर रावबण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहीती दिली.
आरवली पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या आणि ब्रम्हाबाबांनी स्थापन केलेल्या या ईश्वरीय विश्वविद्यालयाचा उपक्रम निश्चितच चांगला आहे. दरवर्षी विविध क्षेत्रातल्या व्यक्तींनी एकत्र आणून त्यांच्या क्षेत्रातल्या बदलांची माहीती देण्याबरोबरच अध्यात्मिक टच देण्याचा प्रयत्न केला जातो. तिथलं निसर्गसौदर्य पाहण्याबरोबरच आदरातिथ्यापासून इतर सर्वचबाबतीतल्या नियोजनाचा इतरांनी आदर्श ध्यावा असाच आहे. हे जरी खरं असलंतरी मला परिषदेत खटकलेले काही मुद्दे अनुत्तरीतच राहिले. त्यात कुठलाही धर्म,जात,पंथ,मुर्तीपूजा न मानणाऱ्या या विश्वविद्यालयालयात प्रतिमापूजनाला स्थान आहे, जगात देव नाही आपला आत्मा सर्व काही करून घेतो , ब्रम्हदेवानं विश्वाची निर्मिती केली आहे म्हणून ब्रम्हा बाबा हेच परमपिता, श्रीकृष्णाने गीता सांगितली नाही,अर्जुनाचे अनुकरण स्वइच्छेवर, संत ज्ञानेश्वर,शंकराचार्यांनी ज्ञानोपदेश केला नाही यासारख्या मुद्यांचा समावेश आहे. प्रत्येक धर्माची शिकवण सदाचार,सत्य,अहिंसेची मग जगात धर्मच नसल्याचे विश्वविद्यालयाचे म्हणणे कितपत योग्य, जगभर पसरलेल्या विश्वविद्यालयाच्या कारभारासाठी आर्थिक मदत संयुक्त राष्ट्र संघासह इतरांकडून केली जाते. याशिवाय विश्वविद्यालयाच्या कार्यासाठी पुर्णवेळ वाहून घेतलेले बीके अर्थात ब्रदर्स अँन्ड सिस्टरर्स आहेत. त्यांच्याच माध्यमातून आज जगभर परमपिता ब्रम्हाबाबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला जात आहे....हे जरी खरं असलं तरी काही प्रश्न हे अनुत्तरितच राहतात. परिषदेदरम्यान मी संयोजकांशी या विषयावर चर्चा करण्याचा,शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.....विश्वविद्यालयाचा आठ दिवसांचा कोर्स करा मग तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआपच मिळतील...एवढंच सांगण्यात आलंय....अखेर हे अनुत्तरित प्रश्नच मनात ठेवून मी पुन्हा नाशिकला परतलो...
No comments:
Post a Comment