Tuesday, June 9, 2009

(टेबलटेनिसचे राष्ट्रीय खेळाडू व पंच कमलेश मेहता यांनी सकाळ साम टिव्हीला विशेष मुलाखत दिली. ही मुलाखत सकाळच्या सर्व आवृत्यांसह ई सकाळवर प्रसिध्दी झाली. माझ्या मित्रांना वाचनासाठी पुन्हा देत आहे....)
खेळाडू विकासासाठी क्रीडा धोरणाची योग्य अंमलबजावणी हवी
श्रीकृष्ण कुलकर्णी
मुंबई - दरवर्षी केंद्र, राज्य शासन क्रीडा विकास डोळ्यांसमोर ठेवून आपल्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करते. ही रक्कम मोठी असल्याने त्याच प्रमाणात घोषणाही केल्या जातात; पण या तरतुदीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी निश्‍चित केलेला निधी कितपत खर्च होतो की तसाच राहतो, हे कुणालाही समजत नाही. त्यासाठी शासकीय स्तरावर योग्य अंमलबजावणी व्हायला हवी. अशी अपेक्षा टेबलटेनिसचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक कमलेश मेहता यांनी व्यक्त केली. सध्या सर्वच खेळाडू विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. सरकारचे योग्य पाठबळही मिळायलाच हवे, असेही त्यांनी नमूद केले.


जलतरणपटू वीरधवल खाडे याने कर्नाटककडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर कमलेश मेहता यांची माटुंगा जिमखाना येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वीरधवलच्या निर्णयाबरोबरच इतर विषयावर 'साम मराठी'शी संवाद साधला. केंद्र, राज्य शासनाचे क्रीडा धोरण हे खेळाडू विकास डोळ्यांसमोर ठेवून व्हायला हवे. केवळ अंदाजपत्रकात भरीव तरतुदी करून भागणार नाही. तसेच योग्य तरतुदीबरोबरच अंमलबजावणी होण्यासाठीही नियोजन केले पाहिजे. आमच्या वेळी विशेष पुरस्कार वगैरे काही नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश नोंदविल्यानंतर कधी तरी सत्कार केला जाई. मला तर एकदाच रोख रक्कम मिळाली होती. आज सर्वच क्रीडा प्रकारांत नामवंत खेळाडू पुढे येत आहेत. आपल्या कामगिरीने महाराष्ट्राचा नावलौकिकही वाढविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत; पण त्यांच्या या कामगिरीच्या तुलनेत त्यांना देण्यात येणारी रक्कम इतर राज्यांच्या तुलनेत फार तुटपुंजी आहे. त्या बक्षिसांच्या रकमेत वाढ व्हायला हवी.समस्यांच्या गर्तेत खेळाडूते म्हणाले, "प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, क्रीडा संस्था, क्‍लबची संख्या वाढली आहे. या संस्था, क्‍लबकडे पुरेसे साहित्य नाही. खेळाडूही उपलब्ध होत नाहीत. संस्था, क्‍लबच्या स्तरावर चांगली वातावरणनिर्मिती होत आहे; पण महागडे क्रीडासाहित्य आणि संस्था, क्‍लबचे शुल्क देणे खेळाडूंना परवडत नाही, त्यामुळे काही खेळाडू स्वतंत्रपणे खेळण्यास प्राधान्य देतात. त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नाही. शासन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून या सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन खेळाडूंना उपलब्ध करून देऊ शकते. फक्त क्रीडा खात्याने कामाची मानसिकता बदलून खेळाडूंचा हुरूप वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.''शेवटी कौटुंबिक जबाबदारी महत्त्वाचीकुठलाही खेळाडू हा लहानपणापासून एखाद्या खेळाची निवड करून त्यात नैपुण्य मिळवतो, असे सांगत ते म्हणाले, बारा-पंधरा वयापर्यंत खेळल्यानंतर त्याला बक्षिसे मिळतात. तो प्रसिद्धीच्या झोतात कायम राहतो. त्यामुळे त्यांचा हुरूप जरूर वाढतो; मात्र सतरा-अठरा वर्षांनंतर त्यांना नोकरीचे वेध लागतात. कौटुंबिक जबाबदारी येऊन पडल्याने आपल्याला खेळांच्या माध्यमातून नोकरी मिळावी, असे त्यांना वाटते. यात चूकही काही नाही; पण त्यांना नोकरी मिळत नाही. आज एअर इंडिया, बॅंका, पोलिस, रेल्वेचा अपवाद वगळता इतर ठिकाणी खेळाडूला नोकरीची संधी नाही. सरकारी पातळीवर तर पूर्णपणे अनास्था आहे. सर्वच खेळाडूंना नव्हे; पण राष्ट्रीयस्तर गाजविणाऱ्या खेळाडूंच्या नोकरीचा प्रश्‍न मार्गी लावल्यास इतरही खेळाडू क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होण्यास मदत होईल, असे वाटते.


अपेक्षापूर्ती हवी, अपेक्षाभंग नको...सरावासाठी योग्य मैदान, चांगला खेळ होण्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शक, कुटुंब उदरनिर्वाहासाठी नोकरी, खेळाच्या आर्थिक मदतीसाठी प्रायोजक... अशा काही समस्या प्रत्येक खेळाडूंच्या आहेत. किंबहुना सर्वच खेळाडू हेच मुद्दे लक्षात घेऊन आपल्या खेळाची निवड करतात. चांगली कामगिरी बजावितात. त्यामुळे त्यांच्या क्‍लब, संस्था आणि शासनाकडून अपेक्षा वाढतात. आपल्या मागण्या क्‍लब, शासनाने ऐकूण घ्याव्यात. त्याप्रमाणे अंमलबजावणी करून आपल्याला चांगली मदत करावी, असं प्रत्येक खेळाडूला वाटते. खेळाडूंच्या अशा अपेक्षांची पूर्तीच व्हायला हवी. उगीचच पोकळ अश्‍वासने देऊन खेळाडूंचा अपेक्षाभंग करू नये, असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment