Wednesday, February 22, 2012
`नवाबा`चा असाही तोरा
कुलाबा येथील हॉटेल ताजमधील "वसाबी' रेस्टॉरंटमध्ये दोनच दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन साथीदारांनी दक्षिण आफ्रिका सरकारच्या वाणिज्य आणि गुंतवणूक विभागाचे माजी उपमहासंचालक आणि त्यांचे "बायपास' शस्त्रक्रिया झालेले सासरे यांना मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सैफ आज दिवसभर पोलिसांना सापडला नाही; अखेर सायंकाळी उशिरा त्याला नरिमन पॉइंट येथून कुलाबा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अटक करून रात्री जामिनावर सोडून दिले. हॉटेल ताजमधील "वसाबी' रेस्टॉरंटमध्ये काल मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सैफ, करिना कपूर, करिष्मा कपूर, मलायका अरोरा खान, अमृता अरोरा आणि अन्य सहा जण बसले होते. त्यांच्या शेजारच्या टेबलावर इक्बाल नवीन शर्मा (43) त्यांच्या पत्नी, सासू-सासरे आणि दोन मित्र भोजन घेत होते. अनिवासी भारतीय असलेले शर्मा व्यवसायानिमित्त नेहमी भारतात येतात. यापूर्वी ते दक्षिण आफ्रिकेच्या वाणिज्य दूतावासात 10 वर्षे कार्यरत होते. मुंबईत आल्यावर ते "वसाबी' येथे भोजनासाठी आले होते. त्या वेळी शेजारच्या टेबलाभोवती बसलेले सैफ आणि त्याची मित्रमंडळी मोठ्या आवाजात बोलत असल्याने शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ लागला. त्याबाबत शर्मा यांनी दोनतीनदा रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली; मात्र त्यानंतरही सैफ आणि त्याच्या मित्रमंडळींचा गोंधळ कमी न झाल्याने शर्मा यांनी दुसऱ्या टेबलाकडे जाण्याचे ठरवले. खालच्या मजल्यावरील टेबलाकडे खाद्यपदार्थ घेऊन येण्याची सूचना त्यांनी व्यवस्थापकाला दिली. शर्मा कुटुंब तिथून निघत असताना आधीच बाहेर गेलेला सैफ दारातच त्यांच्या समोर आला. 'माझी तक्रार हॉटेल व्यवस्थापनाकडे करता काय? मी कोण ते ओळखत नाही का? रेस्टॉरंटमध्ये आवाज होणारच, शांतता हवी तर वाचनालयात जा'', असे म्हणत सैफने त्यांना धक्काबुक्की केली. त्याच्या दोन साथीदारांनीही शर्मा यांना मारहाण सुरू केली. सैफचा ठोसा बसल्याने शर्मा यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. हा प्रकार पाहून त्यांच्या सासऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ठोसा तोंडावर बसून तेसुद्धा खाली पडले. रेस्टॉरंटचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटांना रोखले. त्यानंतर काही वेळातच सैफ मित्रमंडळींसह निघून गेला. जखमी झालेले शर्मा कुटुंबीयांसोबत गोकुळदास तेजपाल रुग्णालयात गेले. नाकाचे हाड मोडल्याचे समजल्यावर आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात जाऊन सैफ आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सैफ आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे आज सकाळपासूनच हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. सैफला अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके वांद्रे, जुहू आणि खार येथे गेली; मात्र सैफ घरात नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. संपूर्ण दिवसभर पोलिसांना न सापडलेला सैफ सायंकाळी उशिरा कुलाबा पोलिसांना शरण जाणार होता. त्यासाठी सायंकाळी 6.30 वाजता तो या परिसरात आला; मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून तो पुन्हा नरिमन पॉइंट येथील त्याच्या वकिलांच्या कार्यालयात गेला. तेथे तो वकिलांसोबत चर्चा करीत असतानाच कुलाबा पोलिसांचे पथक पोचले. त्यांनी सैफला पोलिसांच्या गाडीतून कुलाबा पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात त्याचा जबाब नोंदविल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळत असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा त्याची जामिनावर सुटका केली.
विद्यार्थ्यांना दिलासा
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवरील प्रवेशाचे दडपण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलताना केंद्रीय मनुष्यबळ विभागाने सर्व विभागांसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विविध राज्यांच्या शिक्षण मंडळांच्या गुणांकन पद्धतीमध्ये फरक असल्याने निकालामध्ये होणारी तफावत दूर करण्यासाठी ही प्रवेश परीक्षा महत्त्वाची असेल. डॉ. रामस्वामी यांच्या समितीने दिलेल्या अहवालावर या शिफारशी आधारित आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांबरोबर बुधवारी बैठक घेतली. राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांना राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक परीक्षेत (सीईटी) समान मूल्य असेल. या परीक्षेच्या माध्यमातून "कॅपिटेशन फी'च्या प्रकारात घट होईल. तसेच, विविध प्रवेश परीक्षांसाठी तयारी करण्याचे दडपणही विद्यार्थ्यांवर येणार नाही, असे सिब्बल यांनी सांगितले. मात्र, राज्य पातळीवरील शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी राज्यातील शिक्षण मंडळाचे गुण आणि "सीईटी'चे गुण यांचे मूल्य काय असेल, हे ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला असेल. सध्या दिल्ली, उत्तराखंड, हरियाना आणि चंडिगड यांनी या नव्या परीक्षा पद्धतीला मान्यता दिली आहे, तर तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगाल यांनी या प्रस्तावावर अधिक विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे.
अशी असेल परीक्षा - या "सीईटी'साठी शिक्षण मंडळातील गुणांना 40 टक्के "मूल्य' - उर्वरित गुण हे दोन टप्प्यांत घेतल्या जाणाऱ्या "सीईटी'मधील - "सीईटी'तील पहिला टप्पा हा मुख्य परीक्षेचा, तर दुसऱ्या टप्प्यात "ऍडव्हान्स्ड' परीक्षा - या तीनही टप्प्यांतील गुण एकत्र करून राष्ट्रीय "मेरीट लिस्ट' तयार करणार - राष्ट्रीय पातळीवरील अशा प्रकारची पहिली परीक्षा पुढील वर्षी होणार - पहिल्या परीक्षेत 100 महाविद्यालयांचा समावेश
जीवनप्रवास मांडण्याचा प्रयत्न
रमाबाई आंबेडकर, सिंधूताई सपकाळ, अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर उलगडण्यात आला होता. त्या चित्रपटांना रसिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला होता. त्यानंतर आता
मराठी चित्रपटसृष्टीत अशा प्रकारच्या चरित्रपटांनी जणू काही आता लाट येणाराच.
थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले आणि तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनपट दोन दोन चित्रपटांद्वारे रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणाराय. या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट मनोरंजक आणि उद्बोधक ठरेल हे लवकरच स्पष्ट होईल. रेन्बो प्रॉडक्शन हाऊसतर्फे विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित "विठाबाई नारायणगावकर' हा चित्रपट बनवण्यात येतोय. संतोष राऊत हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. दुसरा विठा हा चित्रपट "नम्रता एण्टरटेन्मेंटतर्फे तयार होतोय. दिनेश अग्रवाल आणि प्रीतम अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहे. या चित्रपटात ऊर्मिला कानेटकर विठाबाईची भूमिका करणारांय.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरही दोन चित्रपट येतायत. त्यापैकी एक चित्रपटाचे आहेत निर्माते दीपक चव्हाण हे तर दुसरा चित्रपट निर्मात्या सुचिता मालणकर काढत आहे. या चित्रपटात सावित्रीबाईंची भूमिका स्मिता शेवाळे करणार आहे. तर महात्मा फुलेंच्या भूमिकेत डॉ अमोल कोल्हे असतील.
Saturday, February 11, 2012
हक्काचं मॅनिज बंद....
१९४८ पासून एकाच ठिकाणी असलेले मॅनिज हे पुस्तकांचं दुकान तब्बल ६३ वर्षांनंतर बंद होणार आहे. वर्षानुवर्ष वाचकांमध्ये प्रसिध्द असलेल्या या दुकानासोबत अनेक जण जोडले गेले आहेत. त्यामुळे या सगळ्या वाचकांसाठी एक चांगला मित्र दुरावल्याची भावना आहे.
मॅनिज...63 वर्षांची परंपरा असलेलं हे दुकान... 1948 ला मानिक मनी यांच्या वडिलांनी पुस्तकाच्या एका छोट्या दुकानापासून सुरुवात केली. मानिक यांच्या वडिलांना लष्कर, सुरक्षा तसंच इंग्लिश लिटरेचरची आवड होती. सुरुवातीला मल्टिनॅशनल कंपनीत काम केल्यानंतर १९७० मध्ये मानिक यांनी या व्यवसायात लक्ष घालायला सुरूवात केली....सतत बाजारात काय हवं आहे, काय नाही याचा अभ्यास करत वाचकांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांनी आपल्या कलेक्शनमध्ये बदल केले.
मानिक मनी यांनी आपल्या दुकानाच्या कामात पूर्ण झोकून दिल्याने त्यांचं कौटुंबिक जीवन थोडं हरवलं. म्हणूनच आता इतक्या वर्षांनंतर त्यांनी आणि त्यांची पत्नी बिना यांनी आता कामातून रजा घेऊन घरच्यांबरोबर वेळ घालवायचा निर्णय घेतलाय.
मॅनिजबरोबर एक वेगळाच ऋणानुबंध जुळलेल्या वाचकांचं मन मात्र या बातमीने भरून आलं. मॅनिज बंद झालं तर पुढे काय हा प्रश्न त्यांना भेडसावतोय.
मॅनिज हे बुक शॉप हे जणू वाचकांसाठी ऑलटाईम फेव्हरिट कथा आहे...पण या कथेचा असा शेवट त्यांना नक्कीच चटका लावून जातोय..
अशाही नव्या घोषणा
निवडणुकीत कोण कुठल्या पद्वतीचे फंडे वापरून प्रचार करेल, हे सांगता येत नाही. डिजिटल फ्लेक्सच्या जोडीला गेल्या काही वर्षापास्न गाण्याच्या रिमेकचाही वापर होऊ लागलाय. यात घोषणा तरी कशा मागे राहतील. पारंपरिक घोषणा जाऊन त्यांनाही आता अत्याधुनिक`टच` मिळालाय. त्यामुळे शक्कल लढवून तयार केलेल्या या भन्नाट पण तितक्याच गंमतीशीर घोषणामुळे प्रचारात रंगत वाढलीय....
ताई माई अक्का विचार करा आणि पंजा, कमळ, घड्याळ, धनुष्यबाणावर मारा शिक्का... ही पारंपरिक जुनी घोषणा असो की एखाद्याचं नाव घेऊन तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांची घोषणा असो... या घोषणा आता मागे पडल्यात. यंदाच्या महापालिका निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांचा जोशच अधिक दिसून येतोय. पक्ष उमेदवार आणि निशाणी मतदारांपर्यत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांची सध्या एकच लगीनघाई उडालीय. धनुषच्या कोलावरी डी आणि वाट माझी बघतोय रिक्षावाल्याचा आधार भाजपनं घेत गाण्याची सिडी काढली. तर इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रचलेल्या घोषणांही वैशिष्टपूर्ण आहे. या घोषणामध्ये अगदी खाद्यपदार्थ, दैनंदिन वापरावयाच्या वस्तूंबरोबरच देवीदेवतांनाही सोडलं नाहीय.
पाव किलो खारी....भाऊ सब से भारी
एक किलो शिरा...भाऊ है सच्चा हिरा
एक किलो पावडर....भाऊ है ऑलराऊंडर
या काही भन्नाट घोषणांनी उमेदवार कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन प्रचार करतायत...
आई मला भात दे, मनसेला मत दे
एक नारा दिलसे, मनसे मनसे
या घोषणेद्वारे मनसेनं मतदारांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केलाय तर शिवसेनेच्या घोषणांमध्ये....
थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते
विरोधकांचे मिटवू नामोनिशाण, पालिकेवर फडकणार भगवे निशान
बघतोस काय रांगाने,पंजा मारला वाघाने
कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसनंही वेगळ्या घोषणांची रचना करत, खास स्टाईलमध्ये युतीला हटवण्याचं आवाहन मतदारांना केलय त्यात....
बंद करा नाटक, युतीला दाखवा फाटक
हाताला हात साथ द्या, युतीला मात द्या
सेना-भाजप युती बेहाल, पालिका झाली कंगाल
घोषणाबाजीच्या या युद्वात अपक्ष,बंडखोरही मागे नाहीत. त्यांनीही वेगवेगळी शक्कल लढवलेली दिसते
आमची निशानी बॅट, विरोधकांची लावणार वाट..
विरोधकांची वाट लावण्याची अपक्ष,बंडखोरांची ही घोषणा भन्नाटच आहे. प्रचारासाठी तीनच दिवस शिल्लक राहिल्यानं घोषणाबाजीचा कार्यकर्त्याचा जोश आणि होश उडवणारं हे महायुद्व अधिक रंगतदार होण्याची चिन्हय...
Subscribe to:
Posts (Atom)