Wednesday, February 22, 2012

`नवाबा`चा असाही तोरा


कुलाबा येथील हॉटेल ताजमधील "वसाबी' रेस्टॉरंटमध्ये दोनच दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन साथीदारांनी दक्षिण आफ्रिका सरकारच्या वाणिज्य आणि गुंतवणूक विभागाचे माजी उपमहासंचालक आणि त्यांचे "बायपास' शस्त्रक्रिया झालेले सासरे यांना मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सैफ आज दिवसभर पोलिसांना सापडला नाही; अखेर सायंकाळी उशिरा त्याला नरिमन पॉइंट येथून कुलाबा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अटक करून रात्री जामिनावर सोडून दिले. हॉटेल ताजमधील "वसाबी' रेस्टॉरंटमध्ये काल मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सैफ, करिना कपूर, करिष्मा कपूर, मलायका अरोरा खान, अमृता अरोरा आणि अन्य सहा जण बसले होते. त्यांच्या शेजारच्या टेबलावर इक्‍बाल नवीन शर्मा (43) त्यांच्या पत्नी, सासू-सासरे आणि दोन मित्र भोजन घेत होते. अनिवासी भारतीय असलेले शर्मा व्यवसायानिमित्त नेहमी भारतात येतात. यापूर्वी ते दक्षिण आफ्रिकेच्या वाणिज्य दूतावासात 10 वर्षे कार्यरत होते. मुंबईत आल्यावर ते "वसाबी' येथे भोजनासाठी आले होते. त्या वेळी शेजारच्या टेबलाभोवती बसलेले सैफ आणि त्याची मित्रमंडळी मोठ्या आवाजात बोलत असल्याने शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ लागला. त्याबाबत शर्मा यांनी दोनतीनदा रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली; मात्र त्यानंतरही सैफ आणि त्याच्या मित्रमंडळींचा गोंधळ कमी न झाल्याने शर्मा यांनी दुसऱ्या टेबलाकडे जाण्याचे ठरवले. खालच्या मजल्यावरील टेबलाकडे खाद्यपदार्थ घेऊन येण्याची सूचना त्यांनी व्यवस्थापकाला दिली. शर्मा कुटुंब तिथून निघत असताना आधीच बाहेर गेलेला सैफ दारातच त्यांच्या समोर आला. 'माझी तक्रार हॉटेल व्यवस्थापनाकडे करता काय? मी कोण ते ओळखत नाही का? रेस्टॉरंटमध्ये आवाज होणारच, शांतता हवी तर वाचनालयात जा'', असे म्हणत सैफने त्यांना धक्काबुक्की केली. त्याच्या दोन साथीदारांनीही शर्मा यांना मारहाण सुरू केली. सैफचा ठोसा बसल्याने शर्मा यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. हा प्रकार पाहून त्यांच्या सासऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ठोसा तोंडावर बसून तेसुद्धा खाली पडले. रेस्टॉरंटचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटांना रोखले. त्यानंतर काही वेळातच सैफ मित्रमंडळींसह निघून गेला. जखमी झालेले शर्मा कुटुंबीयांसोबत गोकुळदास तेजपाल रुग्णालयात गेले. नाकाचे हाड मोडल्याचे समजल्यावर आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात जाऊन सैफ आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सैफ आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे आज सकाळपासूनच हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. सैफला अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके वांद्रे, जुहू आणि खार येथे गेली; मात्र सैफ घरात नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. संपूर्ण दिवसभर पोलिसांना न सापडलेला सैफ सायंकाळी उशिरा कुलाबा पोलिसांना शरण जाणार होता. त्यासाठी सायंकाळी 6.30 वाजता तो या परिसरात आला; मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून तो पुन्हा नरिमन पॉइंट येथील त्याच्या वकिलांच्या कार्यालयात गेला. तेथे तो वकिलांसोबत चर्चा करीत असतानाच कुलाबा पोलिसांचे पथक पोचले. त्यांनी सैफला पोलिसांच्या गाडीतून कुलाबा पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात त्याचा जबाब नोंदविल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळत असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा त्याची जामिनावर सुटका केली.

No comments:

Post a Comment