निवडणुकीत कोण कुठल्या पद्वतीचे फंडे वापरून प्रचार करेल, हे सांगता येत नाही. डिजिटल फ्लेक्सच्या जोडीला गेल्या काही वर्षापास्न गाण्याच्या रिमेकचाही वापर होऊ लागलाय. यात घोषणा तरी कशा मागे राहतील. पारंपरिक घोषणा जाऊन त्यांनाही आता अत्याधुनिक`टच` मिळालाय. त्यामुळे शक्कल लढवून तयार केलेल्या या भन्नाट पण तितक्याच गंमतीशीर घोषणामुळे प्रचारात रंगत वाढलीय....
ताई माई अक्का विचार करा आणि पंजा, कमळ, घड्याळ, धनुष्यबाणावर मारा शिक्का... ही पारंपरिक जुनी घोषणा असो की एखाद्याचं नाव घेऊन तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांची घोषणा असो... या घोषणा आता मागे पडल्यात. यंदाच्या महापालिका निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांचा जोशच अधिक दिसून येतोय. पक्ष उमेदवार आणि निशाणी मतदारांपर्यत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांची सध्या एकच लगीनघाई उडालीय. धनुषच्या कोलावरी डी आणि वाट माझी बघतोय रिक्षावाल्याचा आधार भाजपनं घेत गाण्याची सिडी काढली. तर इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रचलेल्या घोषणांही वैशिष्टपूर्ण आहे. या घोषणामध्ये अगदी खाद्यपदार्थ, दैनंदिन वापरावयाच्या वस्तूंबरोबरच देवीदेवतांनाही सोडलं नाहीय.
पाव किलो खारी....भाऊ सब से भारी
एक किलो शिरा...भाऊ है सच्चा हिरा
एक किलो पावडर....भाऊ है ऑलराऊंडर
या काही भन्नाट घोषणांनी उमेदवार कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन प्रचार करतायत...
आई मला भात दे, मनसेला मत दे
एक नारा दिलसे, मनसे मनसे
या घोषणेद्वारे मनसेनं मतदारांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केलाय तर शिवसेनेच्या घोषणांमध्ये....
थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते
विरोधकांचे मिटवू नामोनिशाण, पालिकेवर फडकणार भगवे निशान
बघतोस काय रांगाने,पंजा मारला वाघाने
कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसनंही वेगळ्या घोषणांची रचना करत, खास स्टाईलमध्ये युतीला हटवण्याचं आवाहन मतदारांना केलय त्यात....
बंद करा नाटक, युतीला दाखवा फाटक
हाताला हात साथ द्या, युतीला मात द्या
सेना-भाजप युती बेहाल, पालिका झाली कंगाल
घोषणाबाजीच्या या युद्वात अपक्ष,बंडखोरही मागे नाहीत. त्यांनीही वेगवेगळी शक्कल लढवलेली दिसते
आमची निशानी बॅट, विरोधकांची लावणार वाट..
विरोधकांची वाट लावण्याची अपक्ष,बंडखोरांची ही घोषणा भन्नाटच आहे. प्रचारासाठी तीनच दिवस शिल्लक राहिल्यानं घोषणाबाजीचा कार्यकर्त्याचा जोश आणि होश उडवणारं हे महायुद्व अधिक रंगतदार होण्याची चिन्हय...
No comments:
Post a Comment