Thursday, July 14, 2016

मधुमेहावर नियंत्रण ठेवता येणे शक्‍य


 मधुमेह हा कधीही बरा न होणारा रोग आहे, असे सांगितले जाते. मधुमेहामुळे अन्य व्याधी, आजार रुग्णाला होण्याची शक्‍यता असते. मात्र, आता संगणकाच्या मदतीने
मधुमेहावर नियंत्रण ठेवता येणे शक्‍य होणार असून, मधुमेहींचे आयुष्यमानही वाढू शकते, असा दावा यावर संशोधन करणाऱ्या आरोग्यविषयक संस्थांनी केला आहे. 

भारतातील "एम्स‘, "पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया‘, "रोलिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ‘ आणि अमेरिकेतील अटलांटा येथील इमोरी विद्यापीठ या संस्थांनी या संदर्भात अभ्यास केला आहे. संगणकाच्या साह्याने त्यांनी एक प्रारूप तयार केले असून, त्याद्वारे मधुमेहींना शरीरातील रक्त व साखरेचे प्रमाण योग्य राखण्यास व रोगावर नियंत्रण ठेवता येणार आहे. हे सर्व त्यांना स्वतः करणे शक्‍य होणार असून, डॉक्‍टरकडे जाण्याचीही गरज उरणार नाही, असे सांगण्यात आले. ही पद्धती खर्चिक नसल्याने गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी उपयुक्त आहे. 

भारत व पाकिस्तानमधील दहा आरोग्य केंद्रांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. मधुमेहावर नियंत्रित व ज्यांचे मधुमेहावर फारसे नियंत्रण नाही, अशी हृदयरुग्णांची तपासणी करण्यात आली. सामान्य व परंपरागत उपाय करणाऱ्यापेक्षा आधुनिक उपायांनी मधुमेह नियंत्रणात ठेवणाऱ्या गट या अभ्यासाच्या उद्दिष्टांपर्यंत अधिक जवळ पोचला असल्याचे व त्यांना धोका कमी असल्याचे या चाचणीत निदर्शनास आले. "एम्स‘मधील अंतस्त्रावशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निखिल टंडन यांनी ही माहिती दिली. या प्रकारात नवीन किंवा महागड्या औषधांची गरज नसते. तरीही रोगावर स्वतःच नियंत्रण ठेवण्याची रुग्णाची शक्ती वाढते, असे त्यांना सांगितले. 

यासंदर्भातील शोधनिबंध "ऍनाल्स ऑफ इंटरनल मेडिसीन‘च्या बाराव्या आवृत्तीत प्रसिद्ध झाला आहे. टंडन हे याचे वरिष्ठ लेखक आहेत. जेथे स्रोत कमी आहेत आणि मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे, अशा दक्षिण आशियात "बहुघटक मधुमेह योजना‘ (यात अवैद्यकीय उपचार समन्वयक व निर्णय सहायक इलेक्‍ट्रॉनिक आरोग्य नोंदणी सॉफ्टवेअर यांचा समावेश आहे.) विरुद्ध परंपरागत उपचार यांचा अभ्यास करून त्याचे परिणाम या अभ्यासगटाने नोंदविले आहेत, असे टंडन यांनी सांगितले. या प्रकारे एक हजार 150 रुग्णांवर अडीच वर्षे उपचार करण्यात आले. कमी व मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये अशा प्रकारची व्यापक मधुमेह व्यवस्थापनाची प्रथमच चाचणी घेण्यात आली. 

आधुनिक पद्धतीचे निष्कर्ष - रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्टेरॉलवर नियंत्रण शक्‍य 
- शरीरातील विषमता कमी होते 
- हृदयरोग, नेत्ररोग, मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका कमी होतो. 

वाढता विळखा... 41 कोटी 50 लाख  जगभरात 
07 कोटी  भारतात 
75 टक्के  कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये

No comments:

Post a Comment