Friday, February 27, 2009

व-हाडकार रिअली ग्रेट


मला आठवत साधारणतः ते १९९४-९५ साल होतं. ७४ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन नाशिक इथं भरलं. मराठी,हिंदी चित्रपटसृष्टीत त्यावेळी नव्यानेच फॉर्मात असलेले अभिनेते नाना पाटेकर संमेलनाध्यक्ष होते...याच तीन दिवसीय संमेलनाच्या पहिल्या दिवशी व-हाडकर देशपांडेंना आपलं व-हाड निघालंय लंडनलाचा प्रयोग ठेवण्यात आला होता...

व-हाड निघालंयचा प्रयोग.. नाशिककरांसाठी एक मेजवानीच..म्हणूनच कडाक्यांच्या थंडीतही भालेकर हायस्कूलचं मैदान खच्चून भरलेलं....बबन्या,जानराव,बाप्पा यासारखे एक दोन नव्हे तर बावन्न पात्र त्यांनी सादर केलं. एकापेक्षा एक विनोदी पात्र त्यातील प्रसंगांना टाळ्या..शिट्यांची दाद तर मिळालीच पण व-हाडकरांनी संमेलनातच घडलेल्या ताज्या किस्सांचा आधार घेत आपल्याच नाट्य,चित्रपटसृष्टीतल्या नामवंतावर कोपरखळी केली, त्यांचेसारखेच हुबेहुब आवाज काढत हास्यांची कारंजे फुलवण्याबरोबरच सर्वांनाच अक्षरशः गडबडा लोळायला भाग पाडले...

या रात्रीच्या प्रयोगांचं वार्तांकन करण्यासाठी सकाळ पेपरचा प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळाली. सिंगल कॉलम बातमी साडेअकरालाच देऊन टाकल्यानं बातमी देण्याचं तसं टेन्शन नव्हतं. हा प्रयोग रात्री दिड दोनपर्यत चालला....उशिर झाल्याचं आहे तर मग व-हाडकरांना भेटून जाऊ असं मनाशी ठरवत मी सर्व निघून गेल्यानंतर त्यांच्या मेकअप रूममध्ये गेलो. तिथंही त्यांच्या चाहत्यांची गर्दी खच्चून भरलेली...कुणी त्यांचेबरोबर वैयक्तीक,फॅमिलीसह छायाचित्र काढण्यास,कुणी स्वाक्षरी घेण्यास,कुणी त्यांना आपल्या भेटीचा प्रसंग सांगण्यात व्यस्त होते...यापैकी लगेचच मला काहीही शक्य नसल्यानं मी एका कोप-यात बाजूला उभा होतो...

ब-याच वेळानं माझा नंबर लागला. बाळ बोल तुझं काय काम आहे...असं म्हणतं देशपांडेनी संवाद साधायला सुरवात केली...पत्रकारीतेत नवीनच एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर काय बोलावं, कसं बोलावं आणि काय विचारावं हेच सूचत नव्हतं...क्षणभर स्वतःला सावरलं आणि माझी ओळख करून देत काही नाही गप्पा मारायच्या एवढंच सांगितलं...एखादी व्यक्ती असती तर एवढ्या रात्री आणि गप्पा कशाला उद्या भेटू...बहुधा असंच उत्तर दिलं असतं...पण रात्री तीन-सव्वातीनलाही देशपांडेनी माझ्यासोबत गप्पा मारल्या, होय हे खरं आहे, अगदी खरं आहे. त्यांनी गप्पा मारल्या त्या तेवढ्याच फ्रेश मुडमध्ये, मेकअप,ड्रेस काढत देशपांडे...

माझ्या प्रत्येक प्रश्न काळजीपुर्वक ऐकत उत्तर देत होते....आईचे संस्कार,घडवण्यात असलेला कुटुंबाचा हातभार,शिक्षण,प्राध्यापक असल्यानं आलेले अनुभव...यासारख्या गप्पा झाल्या.नाट्याक्षेत्रातील त्यांचे अनुभव, प्रसंग निवडून तो सादर करण्याची हातोटी खरोखरच ग्रेट. एक शिक्षक म्हणून त्यांच्याकडं असलेला कॉन्फीडेन्स दखल घेण्यासारखाच...साडेतीनपर्यत गप्पाची ही मैफल रंगली...देशपांडे माझ्या एक-एक प्रश्नांना न थकता उत्तर देत होते...अखेर माझे प्रश्न संपले, मला मुलाखत आटोपती घ्यावी लागली.. पण देशपांडे थकले नाही....अजून काही विचारायचे राहून गेले आहे का...असल्यास जरूर विचारा...मी प्रश्नांच उत्तर जरूर देईल..असं म्हणणा-या व-हाडकार खरोखरच ग्रेट आहे....मला त्यांची प्रत्येक गोष्ट भावली...असा हा नाट्यवेडा कलावंत आपल्यातून सोडून गेल्याची हुरहूर सर्वांनाच लागली आहे...त्याच्या जाण्यानं जानराव,बबन्या,बाप्पा यासारखी गाजलेली पात्र मात्र पोरकी झाली हे नक्की...

No comments:

Post a Comment